कुण्या जन्माचे रुदन, सांगे कपारीत गाव...

manikgad.
manikgad.

निसर्ग माणसाला सतत भुरळ घालत असतो. दक्षिण चंद्रपूरचा सर्वाधिक भाग वनांनी आच्छादलेला आहे. तेलंगणची सीमा महाराष्ट्राला लागून असल्याने तेलुगू भाषिकांची संख्या विपूल. जिवती तालुक्‍यातील डोंगरावर माणिकगडचा किल्ला डौलात उभा आहे. किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर जंगल आणि डोंगरांनी व्यापलेला. मराठी भाषेसोबतच कोलामी, बंजारा, गोंडी इत्यादी बोली त्या भागात मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात. मराठवाड्यातून स्थलांतरित झालेले मराठा, बंजारा, महादेवकोळी, आंध, मांग इत्यादींचे वास्तव्य माणिकगड पहाडावर आहे. शंकरलोधीची गुहा, जंगोदेवीचे मंदिर, माराईपाटणचे आदिम मंदिर, विष्णू-शिव मंदिर, माणिकगडचा गोंडकालीन भव्य किल्ला, भारीचे फरशी पहाड, गुरुद्वारा, अमलनाला अशा नैसर्गिक आणि पौराणिक संदर्भांनी नटलेला हा परिसर माणसाला सतत खुणावत असतो.
हजार वर्षांपूर्वी माना राजा गहिलू यांच्या काळात माणिकगडचा किल्ला बांधला गेला. माना नागवंशीय होते. त्यांचे आराध्यदैवत माणिक्‍यदेवी असल्याने किल्ल्याचे नाव माणिकगड ठेवले. किल्ल्याचा भव्य दरवाजा, न्हाणी घर, अत्यंत खोल व आख्यायिकेचा स्पर्श असणारी पाताळ विहीर, बुरूज, फांजी, विष्णू मंदिर, तोफ, तळघर, किल्ल्यातील घनदाट जंगल, सारं काही तासन्‌तास न्याहाळावं असं सौंदर्य लाभलं आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा किल्ला जमिनीपासून उंच डोंगरावर बांधल्या गेला आहे.
काही दिवसांपूर्वी किल्ल्यावर जाण्याचा योग आला. दगडांच्या भिंतींना स्पर्श करताच एक अलौकिक अनुभूती अंतरंगात संचारली. अबोल भिंतीतली प्रश्‍नांकित संवेदना माझ्या मनापर्यंत पोहोचली. इतक्‍या उंच डोंगरावर, इतकी मोठी दगडं कशी आणली असावी? डोंगरावर पाताळ विहीर सोडली, तर पाण्याचा दुसरा स्रोत नाही. तिथे दगड-चुन्याची भिंत कशी उभारली असावी? हे सर्व वैभव उभी करणारी कोणती माणसं असावी? असे नानाविध प्रश्‍न माझ्या डोक्‍यात पिंगा घालू लागले. तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ज्यांनी अशा वास्तू उभ्या केल्यात त्यांनी स्वतःच्या नावाचा नामोल्लेख असलेला एकही दगड कोरला नाही. दगडांवर राजाची व राज्याची नाममुद्रा, मनात उचंबळून येणारे भाव, कसदार नक्षी, अभिजात स्थापत्यशैली आदींना मूर्तरूप दिले. आमच्या अनेक आदिम पिढ्या केवळ पोटभर अन्नासाठी रक्‍ताचं पाणी करून उन्ह-पावसात राबल्या. कित्येकांचा दगडांच्या चिऱ्यात दबून मृत्यू झाला असावा. तेथील स्त्री-पुरुषांच्या समागमनाच्या प्रतिमा बघितल्या म्हणजे कुणाचीतरी भूक अपूर्ण राहिल्याचा अंदाज येतो. मानवी विकृतीला आळा बसावा म्हणून शापशिळाही तयार झाल्यात. समर्पण आणि त्यागाचे मूर्तिमंत रूप या कलाकृतीत दडले आहे. भारतात कलेचा इतिहास दिसतो तसा कलावंतांचा दिसत नाही. राजदरबारी असणाऱ्या कलावंतांची नोंद इतिहासाच्या पानावर झाली. पण, बहुजन संस्कृतीचा कलात्मक इतिहास व्यापक स्वरूपात दिसत नाही. कारण बहुजन हे संस्कृतीचे मालवाहू जहाज होते. शोषणाच्या व्यवस्थेत सतत नागावले, शोषल्या गेले. याचा इतिहास कोण लिहिणार? वास्तूंची पडझड म्हणजे आमच्या श्रमसंस्कृतीची पडझड आहे. समाजासाठी सौंदर्य उभं करताना त्यांनी एकही दगड आपल्या अस्तित्वाची खूण म्हणून मागे ठेवला नाही.
नव्यापिढीला पूर्वजांच्या कर्तृत्वाचा विसर पडला. प्रतिमांचे विकृतीकरण आणि बाह्यवस्तूंचे प्रदूषण, ऐतिहासिक वास्तूंना इजा पोहोचवत आहेत. वास्तूच्या दगडांवर बदामाचे चिन्ह कोरून, त्यावर आपले नाव कुणाशीतरी जोडून अक्षरं कोरलेली दिसतात. किल्ल्यांचा इतिहास चर्चेत येण्याऐवजी, भय आणि विकृत कृत्यांची चर्चा सर्वत्र होते. हे पिढी-पिढीतले अंतर आहे. कुणालातरी संपवण्यासाठी किंवा बलात्काराचे स्पॉट म्हणूनही अशी ठिकाणं चर्चेत येतात. आजच्या पिढीला ऐतिहासिक जाणीव निर्माण करून द्यायला आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत. आम्हाला आता दोन जातींची अथवा धर्मांची लढाई शिकवायची नाही, तर विचारांची लढाई विवेकाने कशी जिंकायची याचे कौशल्य नव्या पिढीला अवगत करण्याचे ज्ञान द्यायचे आहे. सामाजिक सौंदर्यदृष्टी विकसित करणारा, कलात्मक इतिहास शिकवायचा आहे. नुसती ही दगडं नसतात, त्यांनाही भावना असते याची अनुभूती घडवायची आहे. अभिजात आदिम जाणीव समजून घ्यायची आहे. ऐतिहासिक वारसा निर्माण केला म्हणून कृतज्ञतेचा भाव व्यक्‍त करायचा आहे. हा वारसा पुढल्या पिढीला हस्तांतरित करायचा आहे.
विद्यार्थी प्रवेशभरतीच्या निमित्ताने एका कोलामगुड्यावर गेलो. तिथे छोट्या-छोट्या वस्त्यांत विखुरलेली घरे बघितली. पूर्वी या वस्त्या म्हणजे एकच गाव होतं. पण, गावात मरी आली आणि मूळ वस्ती सोडून अशी लांब लांब शेताच्या जवळ घरं उभी झाली. आता ही माणसे स्थिरावली; पण पूर्वी एखाद्या ठिकाणी अघटित प्रकार घडला की, ती जागा सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायची. साथीच्या रोगात माती आणि माणसांपासून विलग होण्याचं विज्ञान त्यांना निसर्गानं शिकवल होतं. आज आधुनिक म्हणवून घेणाऱ्या संस्कृत माणसाला साथरोगात विलगीकरणाचे महत्त्व कंठ फोडू फोडू सांगावे लागते. ही आदिम माणसं शरीराने तिथे आली; पण त्यांचे मातृप्रतिमांकित लाकडी देव, मारोती तिथेच राहिले. कृतज्ञतेचा भाव म्हणून जुन्या गावाच्या रिठावर आदिम देवाची पूजा करताना उपकाराची परतफेड म्हणून एखादा दिवा जाळला जातो. पूर्वजांचा हात मातीला लागलेले आठवांचे स्थळ. आजवर हा सारा पसारा शाबूत ठेवला म्हणून पूर्वजांचे आभार मानतो. निर्जीव प्रतिमांप्रति आविष्कृत होणारा कृतभाव त्यांच्या डोळ्यांत सदैव जपलेला असतो. एखाद्या विपरीत काळात ही माणसं पूर्वजांच्या स्पर्शभूमीकडे का वळतात? याचे गमक त्यांच्या कृतभावात दडले आहे.
भूक आदिम होऊन
भटकली डोंगरात
जिथे थांबले उसासे
तिथे पेटवली वात.
कुण्या जन्माचे रुदन
सांगे कपारीत गाव
भुई बदलण्या झाले
पाय दगडाची नाव...
आदिम समाज निसर्गपूजक आहे. भाकरीच्या शोधात चाललेली भटकंती आता काहीअंशी थांबली आहे. झाडाची फांदी वासरांसाठी तोडणार; पण अख्ख झाड तोडणार नाही. गाईचं दूध वासराला पाजणार; पण आपल्या लेकराला पाजणार नाही. स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा त्यांच्या रक्‍तात भिनला आहे. त्यांनी जंगलाचे रक्षण करून निसर्गाचे अस्तित्व कायम ठेवले. आता त्यांच्याच जंगल, जमिनीवरती औद्योगिकीकरणाचा नांगर फिरतो आहे. शहरी कोलाहलात, जागतिक विकासाच्या गर्तेत आटत चाललेली आदिम कृतज्ञता, माणसाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी गरजेची आहे. आम्हाला निसर्गातील प्रत्येक घटकांचे अस्तित्व समजून, त्यांचे संरक्षण करूनच, आमच्या असंख्य पूर्वजांकरिता कृतज्ञतेचा भाव व्यक्‍त करता येऊ शकतो. ही संधी कुणीही दवडू नये; अन्यथा येणारी पिढी आम्हाला कधीही माफ करणार नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com