मृत्यूच्या विळख्यातील तीन तास

मनोहर बेट्टिगिरी
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

चहा प्यायला गाडीतून खाली उतरलो आणि गाडी सुटली. कसाबसा शेवटच्या डब्याच्या फूटबोर्डवर दांडी घट्ट पकडून उभा राहिलो. जमिनीचा तुकडा दिसताच अंग लोटले. तीन तास मृत्यूसमवेत घालवल्यावर लष्करी पोलिसांनी वाचवले.

चहा प्यायला गाडीतून खाली उतरलो आणि गाडी सुटली. कसाबसा शेवटच्या डब्याच्या फूटबोर्डवर दांडी घट्ट पकडून उभा राहिलो. जमिनीचा तुकडा दिसताच अंग लोटले. तीन तास मृत्यूसमवेत घालवल्यावर लष्करी पोलिसांनी वाचवले.

लेह-लडाखमध्ये पाकिस्तानबरोबर व गंगटोक-सिक्कीममध्ये चीनबरोबर अशी एकाच वेळी दोन भागांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मातृभूमीच्या संरक्षणासाठी सैन्यात दाखल होण्याचे आवाहन करण्यात येत होते. मी लष्करात दाखल झालो. प्रथम गोवळकोंडा भागात युद्धनीतीचे अतिशय खडतर असे शिक्षण पूर्ण झाल्यावर माझी नेमणूक "थ्री इनडिपेंडंट फिल्ड ऍम्ब्युलन्स' येथे करण्यात आली. हे नेमणुकीचे स्थळ ऐकून मी तर पार हादरूनच गेलो. कारण माझ्याबरोबर ज्या अन्य जवानांनी हे शिक्षण पूर्ण केले होते, त्यांच्या झालेल्या नेमणुकीत निदान गावाचे नाव तरी होते. म्हणजे लष्करी रुग्णालय, अंबाला, देवळाली, दार्जिलिंग, पतियाळा, अमृतसर वगैरे. त्यामुळे ते आनंदी होते; पण माझ्या नेमणुकीत गावाचे नावच नसल्याने मी पुरता भांबावून गेलो. कोणाला विचारावे, कोण सांगेल... मी तडक कमांडिंग ऑफिसरांची गाठ घेतली. ते म्हणाले, ""युद्धजन्य परिस्थितीत काही नवीन तुकड्यांची तातडीने स्थापना झालेली आहे. या सर्व तुकड्या प्रत्यक्ष युद्धभूमीवर असल्यामुळे त्याचा निश्‍चित असा ठावठिकाणा आता सांगता येणार नाही. तथापि त्या स्थळी जाणाऱ्या रेल्वे स्टेशनचे नाव सांगता येईल. त्यानुसार तुमच्या उतरण्याच्या रेल्वे स्टेशनचे नाव "न्यू माल जंक्‍शन' असे आहे.'' ""पण, सर हे कुठे आहे, कोणत्या दिशेला आहे, तेथे तसे जायचे?'' अशी विचारणा मी केली. ते म्हणाले, ""लष्करी शिक्षण घेतलेल्या जवानांनी असे घाबरून जायचे नसते. तुम्हाला हावडा मेलमध्ये बसविण्यात येईल. तेथून तुम्ही पुढचा प्रवास लष्करी बोगीतून करायचा आहे. तुम्हाला काही अडचण, शंका अथवा मदत लागल्यास प्रत्येक मोठ्या स्टेशनवर एमपी म्हणजे लष्करी पोलिस असतात, त्यांची मदत घ्यावी.''

माझ्या आयुष्यातील एवढा मोठा पहिला दीर्घ रेल्वे प्रवास सुरू झाला. दुसऱ्या दिवशी रात्री साडेआठ वाजता सिलिगुडी जंक्‍शनवर गाडी थांबली. प्रवासाचा शीण घालवण्यासाठी चहा पिण्यासाठी उतरलो. तेवढ्यात गाडी सुटलेली दिसली. शेवटचा डबा कसातरी मोठ्या मुश्‍कीलीने पकडला आणि डब्यांच्या बाहेरील दांड्यांना पकडले. आता गाडीने जरा वेग घेतला होता. मी खिडकीवर हात आपटून आतल्या प्रवाशांना आवाज दिला. तो डबा लष्कराचाच होता. आत बरेच फौजी मस्त नाचत होते. त्यापैकी एका जबरदस्त तगड्या सरदारजीने खिडकीपाशी कुणीतरी असल्याचे पाहून रागारागानेच दार उघडून माझ्या पोटावर त्वेषाने बुटाची लाथ मारली. त्यामुळे पोटात अतिशय मरणप्राय वेदना होऊ लागल्याने मी पोट धरून खाली वाकलो. दुसऱ्या हाताने दांडी घट्ट धरली होती. मी खाली वाकल्याने खाली पडलो असेन, असे वाटल्याने त्या सरदारजीने दार बंद केले. इथूनच माझ्या मरणयुद्धाचा पहिला तास सुरू झाला. गाडी वेगात होती अन्‌ त्याहीपेक्षा पोटात प्रचंड वेदना होत होत्या. बाहेर गडद अंधार, वाऱ्याचा मारा व थंडीने हात खाली खाली घसरत होता. तेवढ्यात गाडीचा वेग जरा कमी झाल्याने हायसे वाटले; पण ते तसे नव्हते. कारण अत्यंत अरुंद आणि दीर्घ लांबीच्या एका पुलावरून गाडीचा प्रवास सुरू झाला होता. मी पूर्ण वेदनेने खाली वाकल्याने फूट बोर्डवरच शरीराचे मुटकुळे झालेले होते. त्यामुळे गाडी पुलात शिरताच एका लोखंडी खांबाचा दणका माझ्या डाव्या बाजूला माकडहाडाला बसल्याने मी घायाळच झालो. इतका वेळ पोट सावरत होतो, आता कंबरेतही महायातना सुरू झाल्या.

आता आपले काही खरे नाही, असे वाटू लागले आणि देवाचा धावा सुरू केला. पुढे गाडीचा वेग कमालीचा मंद झाला. ब्रह्मपुत्रा नदीच्या भयाण व विशाल पात्रावरून गाडी हळूहळू पुलावरचा प्रवास संपवत होती. याचवेळी त्या नदीचे रूप खाली वाकून न पाहता मी घट्ट डोळे मिटून दांड्या त्वेषाने आवळल्या; पण त्या अंधारात लाटेचे तुषार अंगाला छर्रे मारल्यासारखे लागत होते व त्या प्रवाहाच्या आवाजाने तर मरण अगदी जवळ येत होते आणि आता मी पक्का निश्‍चयच केला की, पूल संपून जमीन सुरू होताच आपण आपले शरीर जमिनीवर झोकून द्यायचे. मग काय होईल ते होवो!
तेवढ्यात पूल संपला. त्याचवेळी मी जमीन सुरू झाल्याची खात्री करून इतका वेळ महत्‌प्रयासाने धरून ठेवलेले हात सोडून एका घनदाट वेलीवृक्षाच्या उतरंडीवरून गडगडत पंधरा-वीस फूट खोल जाऊन दोन मोठ्या वृक्षांच्या बुंध्याला अडकून पडलो. ते वृक्ष नसते तर पुढे मोठी दरी होती, ते नंतर समजले. मी पडत असताना गार्डने पाहिले आणि रेल्वे तटरक्षकांनी लष्करी पोलिसांच्या मदतीने मला वाचवले. पुढे मी माझ्या नेमणूक युनिटमध्ये सुखरूप पोचलो.

Web Title: manohar bettigiri write article in muktapeeth