हरहुन्नरी कलावंत ः भूषण गुरव

Bhushan Gurav
Bhushan Gurav

भूषण गुरव हा मूळचा धरणगाव तालुक्‍यातील शेरी या गावचा. घरात वारकरी संप्रदायाचा वारसा असल्यामुळे संगीताची आणि अध्यात्माची भूषणला लहानपणापासूनच आवड. या छोट्याशा गावात रोज भजनाच्या साथसंगतीला छोटासा भूषण पखवाज वाजवायचा, तेव्हा त्याचे काही शास्त्रशुद्ध शिक्षण झाले नव्हते, तरी त्याचा पखवाजवरील उत्तम हात बघून ग्रामस्थ त्याला प्रोत्साहन द्यायचे, हेच त्यांचे प्रोत्साहन म्हणजेच भूषणचा पहिला गुरुमंत्र. 
------- 
भूषण पाचवीत असताना तुकाराम महाराज चाळीसगावकर यांच्या कीर्तनाला त्याने साथसंगत केली. तेव्हा भूषणमधील कला ओळखून तुकाराम महाराजांनी सांगितल्यानुसार, भूषण हा संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदी देवाची या ठिकाणी लहान वयातच पखवाज शिकायला गेला; परंतु शिक्षणही खडतरच. तेथे माधुकरी मागून एका धर्मशाळेत राहून दोन वर्षे पंडित पांचाळ गुरुजींकडे भूषणने पखवाजाचे धडे गिरवले. आळंदीला राहायचे, माधुकरी मागायची आणि "इंद्रायणी'च्या घाटावर पखवाजाचा रियाज करायचा, अशा दिनक्रमात भूषणमधील कलावंत बहरत गेला; परंतु काही कारणास्तव त्याला ते सोडून परत जळगावात यावे लागले. जळगावला आल्यानंतर भूषणने प्रा. नितीन सोनवणे यांच्याकडे तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर पंडित सुरेश तळवलकरांचे शिष्य असलेले पंडित जयंत नाईक यांचे बहुमोल मार्गदर्शन भूषणला लाभले; त्याचप्रमाणे योगेश संदानशिव, आशिष राणे, मनोज कुलकर्णी, पंकज भावसार या ज्येष्ठ तबलावादकांचेही मार्गदर्शन भूषणला वारंवार लाभले. पुढे भूषणने विधिवत गांधर्व महाविद्यालयातून तबलाविशारद, तसेच प्राचीन कला केंद्रातूनही (चंदीगड) तबलाविशारद केले; त्याचप्रमाणे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून तबल्यात "एमए' केले. आठ वर्षे विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये संगीत विभागात त्याने आपली सेवा दिली, तर आता भूषण हा अनुभूती इंटरनॅशनल स्कूलमध्ये संगीत विभागात कार्यरत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी तबल्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहे. 

भूषण तबला व पखवाज यात पारंगत आहेच. पण, मुळातच संगीताची त्याला जबरदस्त जाण असल्याने उत्तम संगीतकारही आहे. यासाठी त्याला हवा तो रंगमंच "परिवर्तन'च्या रूपाने सापडला. साधारणत गेल्या चार वर्षांपासून भूषण "परिवर्तन' परिवारासोबत जोडला गेला. त्याच्यातील संगीतकाराला ओळखून व तो गाणेही उत्कृष्ट गातो, हे "परिवर्तन' परिवाराने हेरले आणि त्याच्यातील या गुणांना प्रोत्साहित केले. भूषणच्या आवाजात एक आर्तता आहे. शब्दभावासकट व्यक्त करण्याची त्यांची शैली खूप छान आहे, म्हणूनच त्याचे गाणे ऐकताना आपण त्याच्या गाण्याशी समरस होऊन जातो. भूषणचा "परिवर्तन'च्या सांगीतिक कार्यक्रमात मोलाचा वाटा असतो. आठशे वर्षांची कविता, अमृताची गोडी, बहिणाबाई, गझल, पंडित कुमार गंधर्व संगीत महोत्सव, अशा "परिवर्तन'च्या सांगीतिक कार्यक्रमात भूषणच्या तबला व पखवाज वादनाने कार्यक्रमाला वेगळी रंगत येते. त्याचा तबला सोलो ऐकणे, ही खरच एक पर्वणीच असते. इतकी लयबद्ध पद्धतीने त्याची बोटे तबल्यावर उमटतात आणि त्यातून जे नादमाधुर्य अनुभवायला मिळते, ती अनुभूती खूप वेगळी असते. 

भूषणची स्वतःची आंतरनाद तबला ऍकॅडमी असून, त्याअंतर्गत अनेक कार्यक्रम सादर होत असतात; त्यासोबतच भूषणने संजय पत्की, नारायण पटवारी, औरंगाबादचे पंडित दाशरथी यांसारख्या अनेक कलाकारांची साथसंगत केली आहे. बनारस घराण्याचे पंडित किशन महाराज यांचे सुपुत्र पंडित पुरब महाराज यांचे मार्गदर्शन भूषणला लाभले आहे. "अनुभूती इंटरनॅशनल'च्या पंचवीस मुलांना अतिशय उत्तमरीत्या तयार करून त्यांचे तबलावादनाचे विविध कार्यक्रमही सादर केले आहेत. रोज चार ते पाच तास तबल्याचा रियाज अजूनही भूषण करीत असतो. एक मेहनती, गुणी, उत्तम संगीताची जाण असलेला, निरागस लोभसवाणा असणाऱ्या भूषणचे भविष्य उज्ज्वल आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याला शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com