संवेदनशील कलाकार ः नयना पाटकर

Nayna Patkar
Nayna Patkar

मानसशास्र व कला यांचं गहिरं नात आहे. कलेवर प्रेम, प्रचंड वाचन, जीवनाकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन हे सगळं त्यांना वडिलांकडून मिळालं आहे. अनिल पाटकर यांच्यासारखा बुद्धिमान अर्थतज्ज्ञ असून, रसिक असलेला पती लाभला. यामुळे रसिक ते कलावंत असा त्याचा प्रवास आहे. अभिनय करणे म्हणजे परकाया प्रवेश करणे होय. भूमिका समजून घेणे, ही खरंच मोठी प्रक्रिया आहे. मानवी मन हे अत्यंत अवघड प्रकरण आहे. या मन प्रकरणाचा शोध घेताना नयना पाटकर यांची अनेक वैशिष्ट्ये अनुभवता आली. 

वयाच्या पन्नाशीत रंगमंचावर पदार्पण करत इतकी सहजता व भूमिकेसोबतची समरसता त्यांना मानसशास्रीय विश्‍लेषणामधूनच साध्य झाली. मानसशास्र हा त्यांचा आवडता विषय असल्याने एक संवेदनशील व्यक्तिमत्त्वाच्या धनी असलेल्या नयाना पाटकर या तेवढ्याच संवेदनशील कलाकारदेखील आहेत. त्यामुळे त्यांची ही संवेदनशीलता त्यांच्या अभिनयातून, त्यांच्या वाचनातून अनुभवताना एक वेगळा अनुभव येतो. 
अनिल पाटकर, नयना यांचे जीवनसाथी. त्यांच्यासोबत जळगावला आल्या. श्री. पाटकर हे जळगाव पीपल्स बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. सुरवातीला आपल्या गोड स्वभावाने, संवेदनशील मनामुळे त्यांच्याशी अनेक लोक जोडले गेले; परंतु त्यांच्या आत दडलेला कलाकार तेव्हा कोणाला माहीत नव्हता. मात्र, "परिवर्तन' परिवाराशी त्यांचा स्नेह जोडला गेला आणि या संवेदनशील मनात एक उत्तम कलाकारही दडला आहे, हे लक्षात आले. 

नयना यांचे वाचन खूप, अनेक लेखकांची पुस्तकं वाचली असल्यामुळे त्याबद्दल चर्चा होत. मात्र, रंगमंचावर येऊन आपण सादरीकरण करू शकू, असा त्यांनी कधी विचारही केला नव्हता. महानोरदादांच्या सोबत "आनंदयात्री' या कार्यक्रमात त्यांनी कवितावाचन केले होते, हा एकच अनुभव गाठीशी होता. पण, "परिवर्तन'चे अध्यक्ष शंभू पाटील, ज्यांना नयना या आपल्या पुत्रासमवेत मानतात. त्यांनी त्याच हक्काने त्यांना रंगमंचावर येण्यासाठी तयार केलं आणि मग जो काही चमत्कार घडला, तो अद्‌भुतच. "पथेर पांचाली' या पुस्तकातील अभिवाचनात त्यांनी जी काही अफलातून इंदिरा आत्या उभी केली, ती केवळ अविस्मरणीय. अभिवाचनाच्या सादरीकरणानंतर सगळ्यांच्या मनात फक्त इंदिरा आत्या असायची, इतक्‍या प्रभावीपणे त्यांनी ते अभिवाचन सादर केलं होतं. त्यांच्या आवाजात एक वेगळ्या प्रकारची मार्दवता आहे. ती मार्दवता त्यांच्या अभिवाचनातूनही जाणवते. त्यानंतर अनेक कविता वाचनाच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग होता. मात्र, अरुण कोल्हटकर यांच्या "भिजकी वही' या अभिवाचनात त्या ज्या काही प्रकारे "मैमुन' कविता सादर करतात, ती केवळ अद्‌भुतच. त्यांच्या त्या धीरगंभीर आवाजामुळे "मैमुन' कविता त्यांच्या तोंडून ऐकताना अक्षरशः अंगावर काटा येतो, इतक्‍या सामर्थ्याने त्या ही कविता सादर करतात. "पथेर पांचाली'तील इंदिरा आत्या असो किंवा "भिजकी वही'तील "मैमुन' किंवा "संध्याछाया'तील "आई', प्रत्येक अभिवाचनातील वेगळ्या बाजामुळे त्यांनी रसिकांना कायम अंतर्मुख केलं. त्या उत्तम कलाकार तर आहेतच. पण, "परिवर्तन' परिवारावर त्यांनी मायेची शाल पांघरली आहे, त्याला तोड नाही. त्यांचं घर म्हणजे "परिवर्तनचं घर' होत. प्रत्येकाची आईच्या मायेने काळजी घेणे, हेही संवेदनशील कलाकारच करू जाणे. "परिवर्तन' परिवाराच्या त्या नेहमी पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. लहान- थोर सर्वांशीच त्यांची मैत्री जमते. हक्काने सर्व त्यांच्याकडे व्यक्त होतात. हे केवळ त्याच संवेदनशील कलाकार असल्यानेच होते. 

कलावंत म्हणून त्या जितक्‍या मोठ्या आहेत, तितक्‍याच माणूस म्हणूनदेखील थोर आहेत. पाटकर दाम्पत्य आता कोल्हापूर येथे स्थायिक झालं आहे. पण, जळगावच्या रंगभूमीवर त्यांनी केलेलं काम रसिकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील. त्यांच्या आठवणी हा "परिवर्तन'साठी सदैव सुगंधाची कुपी आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com