बॅंकेतील 'आनंद'

मीना जोशी
शुक्रवार, 30 मार्च 2018

लोकहितासाठी काम करायचे ठरवले तर त्याला लोक सहकार्य करतात आणि अखेर यशही मिळते. नाव लक्षात नाही राहिले, तरी आठवण नक्कीच काढली जाते.

लोकहितासाठी काम करायचे ठरवले तर त्याला लोक सहकार्य करतात आणि अखेर यशही मिळते. नाव लक्षात नाही राहिले, तरी आठवण नक्कीच काढली जाते.

कृषी पदवीधर आनंद बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये रुजू झाला. काही दिवसांतच अतिग्रामीण, दळणवळणचा अभाव, तेलुगू भाषेच्या प्रदेशांत नवीन शाखा उघडण्याकरिता आनंदची नियुक्ती झाली. मिळालेला कर्मचारीवर्गही प्रथमच बॅंकेत रुजू झालेला. तलमाडूगू शाखा ही आदिलाबाद- पूर्णा लोहमार्गावर जिल्ह्याच्या ठिकाणापासून दूर होती. रस्ता कच्चा मातीचा, मार्गातील अनेक नद्यांवर पूल नसल्यामुळे कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. रेल्वेच्या वेळाही अतिशय गैरसोयीच्या. निद्रिस्थ डोंगराळ परिसरातील अनेक गावांच्या सोयीसाठी हा "हॉल्ट' नावाचा थांबा होता. सर्व गावांना कमीत कमी चालत जावे लागेल अशा निर्मनुष्य जंगलात हा थांबा होता. आदिवासी व परिसरातील गरीब जनतेचा फक्त बाहेरील जगाशी संपर्क राहण्यासाठी भारतीय रेल्वेने केलेली ही सोय होती. आजही लोकांना असा "हॉल्ट' नावाचा थांबा असतो हे माहीत नसावे. काही मोजकेच प्रवासी, तेसुद्धा जवळच्या अंतरासाठी चढणार व उतरणार. त्यामुळे रेल्वेला कोणत्याही प्रकारचा कर्मचारीवर्ग ठेवणे परवडत नव्हते. इंजिन ड्रायव्हरच दोन मिनिटे गाडी थांबवतो आणि निघतो. एक छोटी पत्र्याची शेड निवारा म्हणून बांधलेली. गावचा सरपंच भूमा रेड्डी अदिलाबादहून नेहमीच्या छोट्या अंतरावरील तिकिटे रेल्वेकडून घाऊक कमिशनवर साठा करून प्रवाशांना विकायचा. आनंदने त्यालाही त्यासाठी कर्ज दिले होते. रेल्वेची तिकिटे विकायला खासगी माणसाला कर्ज राष्ट्रीयीकृत बॅंकेत प्रथमच दिले गेले असावे.

महिन्याभरात आनंदच्या लक्षात आले, की स्टेशन हॉल्टची जागा आसपासच्या गावातील आदिवासी व गरीब जनतेसाठी अतिशय गैरसोयीची आहे. कोणत्याही गावापासून जंगलातून पायवाटेने चालत गेल्याशिवाय पर्याय नव्हता. रेल्वे अनियमित येत असे. पूर्वसूचना न देता रद्द होत असे. निर्मनुष्य जंगलात, एकाकी जागी असलेल्या या थांब्यावर वीज, चहा, पिण्याचे पाणी अशा सोयीही नव्हत्या. ही जागा महिला व वृद्ध लोकांना धोक्‍याचीही होती. रात्री उशिरा पूर्णा तलमाडूगूला येत असे व परत पहाटे आदिलाबादहून महाराष्ट्रात जात असे. ही वेळ चोरांसाठी अतिशय उत्तम होती. हंगामाच्या वेळी छोट्या टोळ्या येऊन लोहमार्गाजवळील शेतांत रात्रभर कापूस व इतर उभी पिके, तसेच जंगलातील लाकूडफाटा तोडून पहाटे परत जात. संघटित टोळ्यांच्या रात्रीच्या लुटीवर असाहाय्य शेतकरी काहीच करू शकत नव्हते. रुग्णांना, तसेच अपघातग्रस्तांना वेळेवर गाडी न आल्याने, जिल्हा रुग्णालयात नेता न आल्यामुळे मृत्युमुखी पडावे लागे. दूध, भाजीपाला, नगदी पिके लावण्यास उत्तम वाव असूनही दळणवळणाची सोय नसल्यामुळे, जिरायती शेतीवर अवलंबून असलेली ही जनता पिढ्यान्‌पिढ्या गरीबच राहिली होती. गावाच्या प्रगतीसाठी फक्त एकच उपाय म्हणजे जंगलात असलेले स्थानक गावातच स्थलांतरित करणे.

नवीन शाखा, गरिबी, डोंगराळ प्रदेश यामुळे बॅंकेत काहीच व्यवसाय नव्हता. भाषेच्या अडचणींमुळे स्थानिक संपर्कही अडचणीचा होता. आनंदने स्थानकाच्या स्थलांतरासाठी रेल्वेची वरिष्ठ कार्यालये, स्थानिक जनता यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रथम सगळ्यांनी मुळातच अशक्‍य म्हणून धुडकावून लावले; पण बॅंकेची वेळ संपल्यावर आनंद रेल्वे मंत्रालय, रेल्वेचे हैदराबाद येथील कार्यालय यांना हे स्थानक स्थलांतर झाल्यावर होणारे फायदे सांगणारी पत्रे पाठवायचा. आदिवासींची होणारी सोय, त्यामुळे प्रवाशांची वाढणारी संख्या, वाढणारे उत्पन्न सविस्तरपणे लिहून पाठपुरावा करायचा. रोज रात्री तलमाडूगू व जवळपासच्या वस्ती, वाडे या ठिकाणी मोटारसायकलवर प्रभाकर रेड्डी नावाच्या शिक्षकाला घेऊन जायचा. प्रभाकर तेलुगूतून व आदिवासी भाषेतून आनंदचे बोलणे इतरांना ऐकवायचा. रेल्वे अधिकाऱ्यांच्या जागेस प्रत्यक्ष भेटी, त्यांचा वरिष्ठांना पाठविलेला अहवाल अशी प्रक्रिया दोन-तीन वर्ष चालली. या सर्व परिसरात रेल्वे स्थानक स्थलांतरासाठी आनंद एवढा प्रसिद्ध झाला, की रात्री गुपचूप नक्षलवादीसुद्धा त्याच्या सभांना हजेरी लावत, पाठिंबा देत. बाहेरच्या राज्यातून काही काळासाठी आलेला बॅंक व्यवस्थापक, तेलुगू भाषेचा गंध नसलेला हा माणूस, आपल्यासाठी दिवस- रात्री सगळीकडे वणवण फिरतो आहे, फक्त या एकाच कारणाने ते एकत्र आले. आनंदला तेलुगू येत नसल्याचा, बाहेरचा माणूस असल्याचा फार मोठा फायदा मिळाला. त्या तीन वर्षांच्या संयमित लढ्याला शेवटी यश आले. तलमाडूगू गावात स्थानक स्थलांतरित झाले. रेल्वेचे आणि शेतकऱ्यांचेही उत्पन्न वाढले. आजारी रुग्णांना वेळेवर जिल्हा रुग्णालयात नेता येऊ लागले. बॅंकेची तोट्यात चालणारी शाखा, नक्षलग्रस्त भागात असल्याने सर्व महत्त्वाचे रेकॉर्ड शाखा व जिल्हा शाखेत असे दोन ठिकाणी ठेवावे लागत होते, त्या शाखेचे उत्पन्न वाढले. बंद करण्यास सुचवलेल्या शाखेचा दर्जा वाढला. आनंदची बदली महाराष्ट्रात झाली.

आता आनंद राजशिर्के हे नाव त्या गावात कोणाच्याही लक्षात नाही; पण हे स्टेशन दुर्गम भागातून गावात कसे हलले याची गोष्ट सांगताना वडीलधारी मंडळी आणि त्यावेळची लहान मुलेसुद्धा "वो महाराष्ट्रसे मॅंनेजरसाब आया था, उनकी वजह से हो गया' असे मोडक्‍यातोडक्‍या तेलुगूमिश्रित हिंदीमध्ये तुम्हाला सांगतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meena joshi write article in muktapeeth