नेत्ररूपे उरावे!

मीनल इंगळे
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

समाजासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्तेही नेत्रदान का बरे करीत नाहीत, हे कोडे पडले आहे.

समाजासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्तेही नेत्रदान का बरे करीत नाहीत, हे कोडे पडले आहे.

सेवानिवृत्तीनंतर मी नेत्रदानाचा प्रचार सुरू केला. मंगेशकर रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ डॉ. समीर दातार यांना भेटले, तेव्हा त्यांनी मला लगेचच नेत्रदानाची माहितीपत्रके, अर्ज दिले. मी उत्साहाने कामाला लागले. ज्येष्ठ नागरिक संघ, हास्यक्‍लब या ठिकाणी जाऊन लोकांना भेटू लागले. पण, म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. काहींनी अर्जही घेतले नाहीत. माहितीपत्रक घडी करून खिशात ठेवून दिले.
आमच्या सोसायटीतील निम्म्या लोकांनी छान प्रतिसाद दिला. उरलेल्या लोकांनी दोन दिवसांनी या म्हणून सांगितले. अर्थात, मला कोठे लांब जायचेच नव्हते. आमच्याच इमारतीमध्ये फक्त जीना चढउतार करायचा होता. मी ही उत्साहाने दोन दिवसांनी त्यांच्याकडे गेले, तर एके ठिकाणी गंभीर चेहरा करून अर्ज परत करण्यात आला. मी म्हणाले, ""मी, माझा नवरा दोघेही नेत्रदान करणार आहोत. भारतात अंध लोकांची संख्या जास्त आहे. आपल्या मरणानंतर आपल्या डोळ्यांचा उपयोग इतरांना होणार आहे. त्यांना हे सुंदर जग बघता येणार आहे, तेव्हा तुम्ही नेत्रदान करावे, असे मला वाटते.'' पण, त्यांनी काही न बोलता, कोणतेही उत्तर न देता अर्ज परत केले. दुसऱ्या ठिकाणी, मुलाला विचारून सांगतो, असे म्हणत अर्ज परत देण्यात आले.

दिवाळी जवळ आली की पंचवीस वर्षांपूर्वीची घटना आठवते. माझ्या मुलीची शालेय जीवनातील मैत्रीण मधुरा पटवर्धन हिचे अपघाती निधन झाले. लक्ष्मीपूजनाचा तो दिवस होता. मधुराच्या आई-बाबांनी तिचे नेत्रदान केले होते. एवढ्या दुःखद, अचानक उद्‌भवलेल्या कठीण प्रसंगात त्यांनी धीरोदात्तपणे घेतलेल्या निर्णयाचा अभिमान वाटला. मी जेव्हा वृत्तपत्रांमधील निधन वार्ता वाचते तेव्हा त्यातील काही व्यक्ती गणेश मंडळाचे कार्यकर्ते, अध्यक्ष किंवा त्यांनी विविध क्षेत्रांत समाजसेवा केल्याचा उल्लेख असतो. पण मला प्रश्‍न पडतो, की समाजासाठी झटणारे हे लोक नेत्रदान का बरे करीत नाहीत? दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास, असा सुविचार ऐकवणारा हा समाज नेत्ररूपे उरावे इतकेही स्वीकारू अथवा करू शकत नाही?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meenal ingale write article in muktapeeth