आवृत्ती ..... बहुतेक अखेरची!

मिलिंद गाडगीळ
Thursday, 25 October 2018

पुस्तक प्रकाशित करण्याचे अर्थकारण पाहिले आणि अनुभव घेतला की, लेखक असण्याच्या आनंदापेक्षा दुःखच फार वाटते.

पुस्तक प्रकाशित करण्याचे अर्थकारण पाहिले आणि अनुभव घेतला की, लेखक असण्याच्या आनंदापेक्षा दुःखच फार वाटते.

कुठल्याही लेखकाचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले, की त्याला लोकांच्या विविध प्रतिक्रिया अनुभवायला मिळतात. माणसांच्या लेखी लेखकाचे काय स्थान आहे, याचीही जाणीव व्हायला लागते. स्वतःला तीस ते चाळीस हजारांचा बुक्का हक्काने लावून घ्यायचा असेल तर हमखास यशाचा मार्ग म्हणजे पुस्तक काढणे. सुरवातीला पुस्तक प्रकाशित झाल्यावर आपण जाम खूष असतो. भेटेल त्याला सांगतो, प्रत भेट देत जातो. बघता बघता शेशंभर पुस्तके भेट म्हणून वाटली ते आपल्यालाही कळत नाही. प्रकाशक बिल पाठवतो, तेव्हा पुस्तके वाटप त्वरित थांबते. क्वचित कोणी म्हणते, ""पुस्तक विकत घेऊनच वाचणार. सवलतही नको, किती द्यायचे सांग'' हातावर आधी पैसे ठेऊन पुस्तक घेतात. काहीजण, ""वा अभिनंदन, मग वाचायला दे की!'' म्हणजे मग वाचून झाले, की परत करतो हा वाक्‍याचा अर्धा भाग सरावाने लक्षात यायला लागतो. ""अरे नोकरी करत लिहितोस, कौतुकच आहे'' हे म्हणताना चेहऱ्यावर असा भाव ठेवतात, की ""ऑफिसात काही काम दिसत नाही म्हणून हे उद्योग'' हे लक्षात यावे. काहीजण खूप थेटच सांगतात, "कशाला काहीतरी लिहीत बसतोस, बोलून मोकळे व्हावे माणसाने. मी तर वर्तमानपत्रही वाचत नाही. थोडक्‍यात गोषवारा सांग.' आपलीच लेखणी आपल्या छातीत भाला म्हणून खुपसली जाते. काहीजण आणखी भारी असतात. आपले पुस्तक हातात घेत, खिशात हात घालतात, आपल्या आशा पल्लवीत होतात. पण क्षणभरच. पुढच्या क्षणी खिशातून पेन काढून नवीन कोऱ्या पुस्तकावर लिहितात, "प्रिय यांस सप्रेम भेट!' त्याखाली आपली सही मागतात. फार थोडे खरोखरच पुस्तक विकत घेऊन वाचतात. आवडलेले, नावडलेले आवर्जून सांगतात. दादही देतात, टीकाही करतात. खूप बरे वाटते. थोडक्‍यात पुस्तक लिहिणे, प्रकाशित करणे याचे अर्थकारण पाहिले तर "आपण लिहितो या आनंदापेक्षा आपण निरक्षर का नाही' हे दुःख मोठे आहे अशी स्थिती आहे, नव्हे वस्तुस्थिती!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: milind gadgil write article in muktapeeth