सव्वा लाखाचे फूल

अलका गद्रे
सोमवार, 28 ऑगस्ट 2017

कोकण सोडून आजींना पुण्यात यावे लागले; पण जीव परसातल्या फुलांमध्ये गुंतला होता. त्यांच्या देवाला ताजी फुले हवी असत. म्हणून त्या रोज कुंपणावरच्या फांद्यांची फुले तोडत. असेच एक फूल त्यांना महागात पडले.

मध्यंतरी मी माझ्या ओळखीतल्या एका आजींना भेटायला गेले होते. पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या पायाचे हाड दोन ठिकाणी मोडले म्हणून त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. आता त्यांना घरी आणले होते. मी घरी गेले, तेव्हा सून त्यांना औषध देत होती. मी दिसल्यावर तिला बरे वाटले. म्हणाली, ‘‘माझ्या नोकरीमुळे मला जास्त दिवस रजा मिळाली नाही. ऑफिसमध्ये कामाचा भार खूप आहे; पण आता चोवीस तासांची बाई मिळाली आहे म्हणून मला कामावर जाता येतेय.’’

मी आजींच्या जवळ बसले, तेव्हा त्या अगदी रडवेल्या झाल्या होत्या. मूळची त्यांची तब्येत एकदम काटक होती. त्या कोकणात त्यांच्या गावी आजोबांबरोबर राहात होत्या. तिथे त्यांचे घर होते. घराभोवती फुलांची मोठी बाग होती. आंबा, नारळाची झाडे होती. त्या पहिल्यापासूनच फूल-वेड्या होत्या. भरपूर फुले येत असल्यामुळे देवाला हार करायच्या, शेजारच्या मुलींना गजरे द्यायच्या. तगरीच्या मोन्या कळ्यांची पाथी (वेणी) करायची ही त्यांची खासियत होती. त्यात त्या अगदी रमून जात. पण, अचानक आजोबा हार्ट ॲटॅकने गेल्यामुळे त्या अगदी खचून गेल्या. त्यांचा मुलगा पुण्याला होता. तो यापूर्वीही म्हणायचा, ‘‘तुम्ही गावाला आता राहू नका. आम्हाला तिथे वरचेवर येणे जमणार नाही, तेव्हा तुम्ही इकडे या.’’ पण हात-पाय चालत आहेत तोवर शक्‍यतो कोकणातच राहायचे, असे आजी- आजोबांनी ठरवले होते. कोकणात सारा परिसर परिचयाचा होता. सतत जाग असायची मठीत. आसपासचे जाता-येता साद घालत. झाडापेडांशी बोलण्यात दिवस सरायचा. पुण्यात आल्यावर करमायचे नाही. गावात हात-पाय सतत हालत असायचे. पुण्यात इमारतीच्या खाली उतरायलाही भीती वाटायची. म्हणून ते दोघेही एकमेकांच्या साथीने कोकणातच व्यवस्थित राहात होते. 

आजोबा अचानक गेल्यामुळे आजी एकट्या पडल्या होत्या. म्हणून मुलाने आजींना इकडे आणले. आजींना फुलांची फार आवड असल्यामुळे त्यांनी बाल्कनीत कुंड्या ठेवून बाग फुलवली होती. देवपूजा त्या अगदी साग्रसंगीत करत. देव फुलांनी झाकून टाकत. देव्हारा फुलांनी भरून टाकत. तोच त्यांचा विरंगुळा होता; म्हणून सुनेने देवपूजेसाठी फुलांची पुडी लावली होती. पण, आजींना देवाला ताजी फुले वाहायची असत. रोज त्या इमारतीचे तीन जिने उतरून खाली जात असत. कष्टाचे शरीर असल्यामुळे रोज त्यांची प्रभातफेरी असे. आसपासच्या बंगल्यांत भरपूर फूलझाडे होती. कुंपणावरून डोकावून पाहणाऱ्या झाडांच्या फांद्या बाहेर रस्त्यावर येत असत. त्या बाहेर येणाऱ्या फांद्यांवरची फुले काढण्यात आजींना अगदी आनंद होत असे. प्रभातफेरीवरून येताना त्यांचे सारे लक्ष अशा बाहेर येणाऱ्या फांद्यांवरच्या फुलांकडे असे. फूल दिसले, की हात उंचावून नकळत त्या फुले तोडत. मुलाने- सुनेने त्यांना अनेकवेळा बजावले होते, की आजूबाजूच्या बंगल्यांतली फुले काढू नकोस. ते बरोबर नाही. एखाद्यावेळी ते लोक रागावतील, अपमान करतील. तेव्हा त्या म्हणत, ‘‘मी कुंपणाच्या आत जाऊन थोडीच तोडते फुले? बाहेर फांद्या येतात, फक्त त्यांवरचीच फुले तोडते.’’ आजींना कितीही सांगितले तरी पटत नसे. ‘‘कोकणात आमच्या वयीत इतकी फुले लागत, सारा गाव तोडून न्यायचा, मी कधीही कुणाला रागावत नसे. उलट परसातलीच वासाची चार-दोन फुले त्यांना देत असे,’’ आजी सांगायच्या. अशाच त्या सकाळी प्रभातफेरीला गेल्या होत्या. नेहमीच्या देवळात गेल्या आणि येता- येता एका बंगल्याच्या बाहेरच्या फांदीकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांना राहवेना. पाय उंच करून फूल काढायचा प्रयत्न करू लागल्या; पण पावसामुळे खाली निसरडे झाले होते. त्यामुळे पाय घसरून त्या खाली पडल्या. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना कसेबसे घरी आणले. पण, पाय मोडल्यामुळे असह्य वेदना होत होत्या. ताबडतोब रुग्णालयामध्ये जाणे आवश्‍यक होते. मुलाने- सुनेने रजा टाकली आणि पुढचे सर्व सोपस्कार पूर्ण केले. आता काही आठवड्यांची सक्तीची विश्रांती त्यांना घ्यावी लागणार होती. त्यानंतर फिजिओथेरपीची ट्रीटमेंट घ्यावी लागणार होती. 

हे सगळे रामायण त्यांनी मला अगदी कळवळून सांगितले. म्हणाल्या, ‘‘मुलाला, सुनेला माझ्यामुळे आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास झाला गं. या सगळ्याचा खर्चही खूप आला. लाखाच्या पुढे या उपचारांना खर्च झाला आहे. अगं, आयुष्यभर मी इतके काटकसरीत आयुष्य काढले आणि एका फुलापायी हे घडले. एक फूल सव्वा लाखाला पडले. आपण सत्यनारायणाचा प्रसाद सव्वापटीत करतो, तसे या फुलासाठी मी सव्वापटीत खर्च केला. एका फुलाची किंमत सव्वालाख झाली गं.’’ 

मी त्यांना विचारलें, ‘‘असे कोणते फूल काढताना तुम्ही पडलात?’’

त्या म्हणाल्या, ‘‘तगरीचे फूल.’’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukatpeeth alka kadre