हरवलेल्या रानवाटा

हरवलेल्या रानवाटा

पावसाळा सुरू झाला, की ओल्या रानाचा, कोवळ्या गवताचा, झाडांवरच्या फळांचा, उमलणाऱ्या फुलांचा मिळून एक वेगळाच प्रसन्न आणि हिरवा सुगंध वातावरणात भरून राहतो. सर्दी डोक्‍यात रुतून बसावी तसा हा वास मनात घट्ट ‘वास’ करून राहतो. अवघ्या सृष्टीला नवचैतन्य देणारा पावसाळा सह्याद्रीच्या पर्वतराजींवर विशेष प्रसन्न असतो. अशावेळी आपले मन शहरी पिंजऱ्यातून बाहेर पडून सह्याद्रीच्या डोंगरराजित झेपावते आणि ट्रेकचा विषय निघतोच, मग माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते ती माझी लाडकी जोडगोळी ‘लोहगड आणि विसापूर.’ समोरून दिसणारा त्रिकोणी आकाराचा दाट धुक्‍यात हरवलेला तिकोना, दिमाखात उभा असलेला बलदंड लोहगड आणि त्या धुक्‍यात लपून बसलेली अजस्र विंचूकाटा माची, जणू काही ढगाने त्यावर आपले वर्चस्व गाजवावे आणि त्या माचीने निपचित पडून राहावे.

ट्रेकच्या दिवशी गजर नसतानासुद्धा जाग कशी येते हे कोडे मला आजपर्यंत सुटलेले नाही. सुसाट वारा आणि चिंब पावसाच्या सरींच्या साथीने आम्ही विसापूरकडे रवाना झालो. सकाळीच गावात शिरलो असल्याने गावाला नुकतीच जाग येत होती. शहरी गडबड गोंधळापासून दूर अशी ही निःशब्द सकाळ खूप वेगळी भासत होती. हिरवाईतून वाट काढत असताना अजस्र कातळकड्यावरून स्वतःला झोकून देणाऱ्या शुभ्र धबधब्यांनी वाटेत थांबायला भाग पाडले. गर्द धुक्‍याच्या पडद्यातून वाट काढत हा रस्ता आम्हाला गडाच्या पायथ्याशी कसा घेऊन गेला समजलेसुद्धा नाही. पावसाच्या आशीर्वादाने उगवलेल्या हिरवाईला बाजूला सारत तपकिरी रंगाची पायवाट आम्हाला गडाकडे घेऊन जात होती. इथून आजूबाजूचे दृश्‍य पावसाळ्यातील नेहमीचेच असले तरी नवीन होते. हिरव्या रंगाला बहुधा अमर्याद छटा  असाव्यात. हिरवा सह्याद्री डोळ्यांत साठवून आम्ही विसापूरच्या डाव्या सोंडेच्या दिशेने जाऊ लागलो.

पायथ्याशी पोहोचल्यावर नजर खिळून राहते ती लांबच लांब आणि देखण्या तटबंदीकडे. अक्षरशः आभाळ कवेत घेता यावे असे काळे ढग खाली उतरून तटबंदीवर विसावले होते. हिरव्याकंच रंगांच्या सगळ्या छटा अंगावर मिरवत संपूर्ण गड धुक्‍यात बुडला होता. 

विसापूरला आजपर्यंत अनेकदा जाण्याचा योग आला. प्रत्येक वेळचे अनुभव अविस्मरणीय आहेत. विसापूर हा वाट हमखास चुकण्यासाठी प्रसिद्ध. मी अनेक वेळा या किल्ल्यावर वाट चुकलो आहे, अनेकवेळा किल्ल्याभोवती घातलेल्या प्रदक्षिणादेखील मला आठवतात. दाट धुके, अधूनमधून जोरदार मारा करणाऱ्या पावसाच्या सरी, यामुळे व्हायचे ते झालेच. परतीच्या प्रवासात आम्ही रस्ता चुकलोच. आता काय करायचे? आम्ही ज्या वाटेवरून आलो ती वाट सापडणे तर सोडाच, पण दाट धुक्‍यामुळे गडाची तटबंदीदेखील दिसत नव्हती. शिवाय गडावर आम्ही तिघेच. तटबंदीच्या कडेने चालण्यास सुरवात केली; पाऊस पडू लागला होता. सोबत वारासुद्धा जोरात वाहत होता. काही ठिकाणी तर तटबंदीच्या खालून धबधब्याचे पाणी उलट्या दिशेने, म्हणजे वर उडत होते. तटबंदी पूर्ण फिरूनसुद्धा रस्ता सापडला नाही. सगळीकडेच दाट धुके... सगळ्या पायवाटा धुक्‍यात गायब होणाऱ्या. एकही वाट गावाकडे जाताना दिसत नव्हती. दिसत होते ते धुक्‍यात पहुडलेले हिरवे जंगल आणि गडाची भली मोठी उभी तटबंदी. आता मागे वळायचे की पुढे जायचे? काहीच सुचेना. आम्ही आलो ती पायवाट अचानक नाहीशी झाली होती. खूप शोध घेऊनही पायवाट आम्हाला सापडत नव्हती. काही वेळाने एक गावकरी सापडला. त्याने अचूक रस्ता सांगितला. आम्ही हुश्‍श केले आणि पुढे निघालो. अखेर आम्हाला एक टेकडी चढून बरोबर विरुद्ध दिशेला वाट दिसली. ही वाट पुढे गाय-खिंडीकडे घेऊन जाते. दिसायला ही वाट भीतिदायक होती, पण दोन वेगळ्या वाटांनी गड काबीज केल्याचे मनात समाधान होते. एक पावसाळी हिरवा दिवस मित्रांसमवेत मस्त गेला होता. 

कधी कधी काही गोष्टी ठरता ठरता बिनसतील असे वाटत असतानाच त्या अशा काही घडून जातात की खूप साऱ्या आठवणी, किस्से, अनपेक्षित घडामोडी आणि करामतींसह अविस्मरणीय आनंद देऊन जातात. पूर्वसूचना न देणारे आयुष्यातल्या असंख्य क्षणांपैकी हे मोजके क्षण अजरामर असतात. काय मिळते एवढी पायपीट करून? माझ्या मते, खऱ्या अर्थाने जगतो ते यासाठीच. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करण्यासाठी. गड उतरताना उगाच काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटत होते. विसापूर हा किल्ला तसा चुकण्यासाठीच प्रसिद्ध आहे. हे मनोमन पटले होते. ज्यांच्या ‘वाटेला’ गेले तरी मला आजवर आनंदच मिळत गेला आहे, अशा या ‘रानवाटा.’  त्या वाटा तुडवल्यावर अनुभव आणि अनुभूती दोन्ही मिळतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com