अनुभवावं अमरनाथ!

मंजुश्री खर्डेकर
सोमवार, 30 जानेवारी 2017

अमरनाथला आमच्या इच्छेने पोचलो. नियोजनानुसारच प्रवास सुरू होता. बर्फानी बाबांचे दर्शन घेऊन परतलो आणि पंचतरणीलाच अडकलो. आता पुढचा प्रवास बर्फानी बाबांच्याच इच्छेने होणार होता...

अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रा करायची इच्छा होती आणि नुकतीच ती पूर्ण झाली. श्रीनगरमध्ये संचारबंदी चालू होती. पहाटे चारला निघून बालतालला पोचलो. तेथून आम्ही सात वाजता हेलिकॉप्टरने निघून दुपारी तीन वाजेपर्यंत परत येणार होतो. मी प्रथमच हेलिकॉप्टरमध्ये बसत होते. बालताल ते पंचतरणी केवळ सात मिनिटांचा प्रवास; पण अप्रतिम. कापडाच्या घड्या उकलत जाव्यात तसे आमचे हेलिकॉप्टर डोंगरांच्या घड्या उकलत पुढे चालले होते. बर्फाच्छादित हिमशिखरे, त्यातून खाली वाहात येणाऱ्या हिमनद्या, डोंगरउतारावरील हिरवीगार जंगले, मध्येच तरंगणारे ढगांचे पुंजके, खाली दरीतून वाहणाऱ्या नद्या, केवळ अवर्णनीय. ते निसर्गसौंदर्य आम्ही डोळ्यांत साठवून घेत असतानाच पंचतरणीला कधी पोचलो ते कळलेच नाही.
तिथून अमरनाथ गुंफेपर्यंत पोचण्यासाठी पुढे सहा किलोमीटर चालत जायचे होते. कडाक्‍याची थंडी होती. उंचावरती हवेत ऑक्‍सिजन कमी असल्यामुळे चालताना जास्त धाप लागत होती. मात्र संपूर्ण वाट भक्तिरसात बुडाली होती. जय भोलेनाथ, बम बम भोलेचा घोष.

दोन डोंगरांना वळसे घातल्यानंतर दूर उंचावर अमरनाथाची गुंफा दिसायला लागली. आता चालण्याला वेग आला. अमरनाथ गुहेत बर्फरूपी शिवलिंगाचे छान दर्शन झाले. परतीच्या प्रवासाला लागलो. जाताना वातावरण चांगले होते, आकाश निरभ्र होते, छान ऊन पडले होते. आता पंधरा मिनिटांतच आम्ही हेलिपॅडवर पोचणार होतो. तेवढ्यात अचानक वारा सुटला. ढग दाटून आले. पाऊस सुरू झाला. तोवर आम्ही हेलिपॅडपर्यंत पोचलो. थोड्या वेळाने पाऊस उघडला. पण, हेलिकॉप्टर काही येईना. बालतालला वातावरण खराब होते. आम्ही लाइफ जॅकेट घालून तयार होतो. हाय रे दैवा, तेवढ्यात पुन्हा पाऊस सुरू झाला. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्यामुळे त्या दिवसापुरती संपूर्ण अमरनाथ यात्रा थांबविण्यात आली.

अरे बापरे, म्हणजे आता तिथे राहणे भाग होते. म्हणजे आमचे लेह लद्दाखच्या सहलीचे नियोजन बिघडणार होते. सकाळी येताना वाटलेपण नव्हते, की आज इथे राहायची वेळ येईल म्हणून. पण राहण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्या दिवशी यात्रा थांबवण्यात आल्यामुळे सगळेच लोक पंचतरणीत अडकले होते. साहजिकच सगळ्याच लोकांची भंडाऱ्यांमध्ये गर्दी झाली होती. तिथे गरमागरम चहा-कॉफी तयारच होती. जोडीला बिस्कीट, टोस्ट. बाहेर पाऊस, थंडी अशा वातावरणात चहा घेऊन बरे वाटले. अडकून पडल्यामुळे वैतागलो होतो. उत्तर प्रदेशमधून आलेली एक बाई म्हणाली, ""यही तो भगवान की लीला है! यहॉं कब आने का ये हम तय करते है; लेकिन यहॉं से कब जाने का, वो तो भोलेनाथ तय करता है। उसका मन है, की आज हम यहॉं रुक जाये।'' खरेच, त्या साध्या दिसणाऱ्या बाईने किती मोठे तत्त्वज्ञान सांगितले. शेवटी देव म्हणजे तरी काय? हा निसर्गच ना! या पंचमहाभूतांनाच आपण देव मानतो ना! पावसाने म्हणजेच या देवानेच आपल्याला अडवले आहे, येथील सुंदर निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी. या विचाराने एकदम मूड बदलला. आम्ही ते वातावरण एन्जॉय करायला लागलो. थोड्याच वेळात त्या भंडाऱ्यामध्ये "बर्फानी बाबां'ची आरती झाली. जेवण झाल्यावर सगळे गप्पांत रंगले.

पहाटे चार वाजताच जनरेटरच्या आवाजाने जाग आली. बाहेर येऊन पाहिले, तर पाऊस पडतच होता. बापरे, आता परत पाऊस थांबण्याची प्रतीक्षा. तो दिवस तिथेच राहिलो. भूक लागली की खायचे, झोप काढायची. मधेच पाऊस उघडला की बाहेर फिरून यायचे. मधेच लख्ख ऊन पडायचे. आसपासचे हिमाच्छादित पर्वत छान चमकायचे. दूर क्षितिजावर नजर जायची. हेलिकॉप्टरचा ठिपका दिसतोय का?
तिसऱ्या दिवशी सकाळी वातावरण स्वच्छ होते.

हेलिपॅडवर पोचलो. कंपनीचे लोकही तयार होते. आम्ही लाइफ जॅकेट घालून तयार होतो; पण आठ वाजले तरी हेलिकॉप्टर काही येईना. तेवढ्यात दूरवर आकाशात काळा ठिपका दिसला. पंख्याची घरघर ऐकू आली. एकदाचे हेलिकॉप्टर आले; पण ते आमचे नव्हते, अजून दोनदा असेच झाले. मग आमचे हेलिकॉप्टर आले. चला, सुटका झाली एकदाची. पण, तो आनंद काही क्षणच टिकला. कारण, काही काळातच समोरील दृश्‍य बघून आनंदाची जागा भीतीने घेतली. कारण समोर दाट धुके, ढगांची गर्दी, धुक्‍यातून बाहेर पडले की अचानक एखादा डोंगराचा सुळका समोर दिसायचा, त्यातून पायलट मोठ्या कौशल्याने वाट काढत पुढे जात होता. जाताना जेवढा आल्हाददायक प्रवास होता, तेवढाच आता थरारक. एकदाचे आम्ही बालतालला सुखरूप येऊन पोचलो.

(उद्याच्या अंकात : हरवले ते गवसले - डॉ. नीलिमा घैसास)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mukpeeth experience of amarnath