सज्जनगडची दासनवमी 

muktapeeth sajjan gadh dasnavami
muktapeeth sajjan gadh dasnavami

माझ्या नजरेतून
 "मनाचे श्‍लोक' ऐकवणाऱ्या समर्थ रामदास स्वामींपाशी मन धाव घेते. दासनवमी जवळ आली की "नावरे मन आता' अशी भक्तांची मनःस्थिती होते आणि पावले अधीरपणे सज्जनगड गाठतात. दासनवमीच्या उत्सवात रंगतात. 
फेब्रुवारी महिना सुरू झाला की आठवण होते ती सज्जनगडावर साजऱ्या होणाऱ्या दासनवमीच्या उत्सवाची! रामदासस्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळ या दोन्ही संस्थांच्या भिक्षा दौऱ्यामुळे या उत्सवाची ओढ आधीपासूनच लागलेली असते. दिवाळीनंतर सुरू झालेला हा भिक्षादौरा चार महिने महाराष्ट्रभर समर्थ विचारांचा प्रसार आणि प्रचार करून दासनवमीच्या उत्सवापूर्वी सज्जनगडावर परत येतो आणि दासनवमीचा उत्सव सुरू होतो. अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात सतत नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सांगता माघ वद्य नवमी अर्थात दासनवमीच्या कार्यक्रमाने होते. 
गेली अनेक वर्षे दासनवमीनिमित्त सज्जनगडावर जात असतो. त्यापैकी काही आठवणी मनात कायमच्या घर करून बसल्या आहेत. एका उत्सवाला आम्हाला गडावर पोचण्यास संध्याकाळ झाली. भाविकांची प्रचंड गर्दी होती. रात्री मुक्कामाला राहण्यासाठी खोली शिल्लक नव्हती. जसजसा अंधार पडू लागला, तशी सर्वांनाच काळजी वाटू लागली. एक तर गडावर थंडी खूप होती आणि त्यात राहायला जागा मिळाली नाही तर काय करायचे, हा प्रश्न इतर भाविकांप्रमाणेच आम्हाला पडला होता. मात्र तेथील रामदासी मंडळींनी दिलासा दिला. एका मोठ्या हॉलमध्ये सर्व भाविकांची राहण्याची सोय केली. त्या एका हॉलमध्ये सर्व भाविक दाटीवाटीने राहिले अन्‌ संपूर्ण रात्र रामनाम आणि भजन म्हणून जागवली. दुसऱ्या दिवशी पहाटे पारंपरिक पद्धतीने सुरू झालेल्या काकड आरतीपासून सर्वच कार्यक्रमांत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले. त्याच वर्षीची आणखी एक आठवण कायमस्वरूपी लक्षात राहील अशी आहे. उत्सव काळात श्रीराम मंदिराला अनवाणी पायाने तेरा प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. या वेळी समर्थांनी रचलेल्या गणपती, शंकर, हनुमान, कृष्णा-माता आदी देवतांच्या आरत्या म्हटल्या जातात. अतिशय संथ स्वरात आणि उच्च आवाजात गायल्या जाणाऱ्या या आरत्या म्हणताना आणि ऐकताना भाविकांचे भान हरपून जाते. त्या दिवशी प्रदक्षिणा घालताना एका वयोवृद्ध भाविकाला चक्कर आली आणि ते गृहस्थ खाली कोसळले. सर्वच जण गोंधळून गेले. गडावरील डॉक्‍टरांच्या पथकाने त्यांना तपासले आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. परंतु त्या गृहस्थाला प्रदक्षिणा पूर्ण करायची मनोमन इच्छा होती. शेवटी गर्दीतील दोन अनोळखी भाविकांनी त्यांना उचलून घेतले आणखी एकाने डोक्‍यावर छत्री धरली आणि सर्वांनी उरलेल्या प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्या वृद्ध भाविकाच्या चेहऱ्यावरील समाधान पाहण्यासारखे होते. 
सज्जनगडावरील या उत्सवाचे स्वरूप पाहिले की नवल वाटते. एरवी पैसा आणि संपत्तीमागे धावणारे लोक इथे गडावर विनामोबदला काम करण्यासाठी धडपडत असतात. ऑफिसात नेमून दिलेले काम करताना सूचनांचे पालन न करणारेही इथे कोणत्याही सूचनेशिवाय आपले काम चोख पार पाडताना दिसतात. मोठमोठ्या शहरांत शेकडो सफाई कामगार आणि मोठी यंत्रणा हाताशी असूनदेखील रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग दिसतात; तर इथे अशी कोणतीही व्यवस्था नसताना डोळ्यांत भरेल अशी स्वच्छता आणि प्रसन्नता आढळते. महागडी अत्तरे आणि उंची कपडे असूनसुद्धा एरवी मन उदास वाटते, तर इथे अंगावर केवळ कफनी बांधलेले रामदासी लोक शेजारहून गेले की वातावरणात प्रसन्नता जाणवते. मोठमोठ्या हॉटेलात उत्कृष्ट प्रतीचे पदार्थ खाऊनही अतृप्त राहणारे केवळ आमटी-भाताचा प्रसाद खाऊन इथे तृप्त होताना दिसतात. हा फरक का जाणवतो? बरे, ही स्थिती फक्त अशिक्षित आणि खेडूत लोकांची म्हणावी तर तसेही नाही. जागतिक कीर्तीचे कलाकार कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता येथे आपली सेवा सादर करतात. उच्चशिक्षित, उच्चपदस्थ, अतिश्रीमंत लोकदेखील गडावर मनोभावे सेवा करताना दिसतात. शरीर थकले तरीही थांबत थांबत, हळूहळू पायऱ्या चढून गडावर येतात. काय असेल या मागची प्रेरणा? "मीच सर्वस्व' इथपासून "मी कोणीच नाही' इथपर्यंतचा हा प्रवास कसा होत असेल? थोडा विचार केल्यावर कळते, की या जगात पैसा, नावलौकिक, प्रतिष्ठा हेच सर्वस्व नाही; तर त्यापलीकडेदेखील समाधान असू शकते याची जाणीव लोकांना कधी ना कधी होते. मग शोध सुरू होतो त्या अलौकिक समाधानाचा! इतर अनेक तीर्थक्षेत्रांप्रमाणेच अनेकांचा हा शोध सज्जनगडावर येऊन थांबतो आणि तेथील दासनवमीचा उत्सव अशा भाविकांना दसरा-दिवाळीप्रमाणेच वाटू लागतो. नंतरही बराच काळ काना-मनात घुमत राहते एकच आरोळी - "जय जय रघुवीर समर्थ'. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com