सात शिलेदार (नवं नवं)

अजित जगताप 
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

पुरंदर तालुक्‍यातील मांडकी या खेड्यातील शाळा पाहायला गेलो. खेड्यातील शाळा, पण तिच्याविषयी कोणतेच चित्र मनात नव्हते. पण शाळा पाहिली, तेथील ज्ञानदानाची पद्धत अनुभवली आणि अशी शाळा प्रत्येक खेड्यात असायला हवी, असे वाटले. 

पुरंदर तालुक्‍यातील मांडकी या खेड्यातील शाळा पाहायला गेलो. खेड्यातील शाळा, पण तिच्याविषयी कोणतेच चित्र मनात नव्हते. पण शाळा पाहिली, तेथील ज्ञानदानाची पद्धत अनुभवली आणि अशी शाळा प्रत्येक खेड्यात असायला हवी, असे वाटले. 

पुरंदर तालुक्‍यातील मांडकी शाळा दुरूनही लक्ष वेधून घेत होती. शाळेत पोचेपर्यंत या शाळेविषयी मनात काहीच चित्र नव्हते. शाळेजवळ पोचलो आणि शाळेच्या भिंतीआडच्या जगाचा गोंगाट कानी आला. खरे तर तो गोंगाट नसतोच, तो असतो मुलांच्या उत्साहाचा ध्वनी. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पवार यांना भेटलो. या शाळेविषयी, शालेय उपक्रमांविषयी सर्व माहिती मिळाली. या शाळेचे माजी मुख्याध्यापक शिवाजी काळाने यांना आदर्श शाळेसाठी राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. काळाने गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी ही शाळा "आदर्श' केली होती. काळाने गुरुजींची बदली झाली होती, तरीही या शाळेतील सात शिक्षकांनी मेहनतीने, एकजुटीने या आदर्श शाळेची प्रगतशील वाटचाल चालू ठेवली होती. विजय शिंदे मला त्यांच्या शाळेची संगणक लॅब दाखवायला घेऊन गेले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची एवढी सुसज्ज संगणक लॅब बघून मला पहिल्यांदा विश्‍वासच बसला नाही. ग्रामस्थांच्या सहकार्यातून या शाळेत चालू झालेल्या ई-लर्निंगमुळे ही छोटी छोटी मुले डिजिटल शिक्षण घेत होती. माझ्या लहानपणी माझ्या प्राथमिक शाळेचा वर्ग शेणाने सारवण्यात जेवढे तल्लीन व्हायचो, त्यापेक्षा जास्त तल्लीन ही लहान मुले डिजिटल शिक्षण घेताना होत होती. मोहन दुर्गाडे, नामदेव भापकर मला या शाळेच्या प्रशस्त मैदानात मुलांचे साहसी क्रीडाप्रकार बघायला घेऊन गेले. डिजिटल शिक्षण घेणारी ही मुले तेवढ्याच जोशाने सूर्यनमस्कार, शीर्षासन, योगासने करून दाखवत होती. या मैदानातील मोठ्या वडाच्या झाडाला जाडसा दोरखंड बांधला होता. ही लहान लहान मुले मोठ्या चपळाईने जमिनीवरून या दोरखंडावरती चढून त्या झाडाच्या उंचावरती असणाऱ्या फांदीपर्यंत वानरासारखी सरसरत जात होती आणि खारूताईच्या चपळाईने खाली उतरत होती. या मुलांपैकी सानिका साळुंखे हिला मोठेपणी "मॅडम व्हायचंय, शिक्षिका व्हायचंय.' तर पृथ्वीराज शिंदे या मुलाला "पोलिस व्हायचंय, आयपीएस व्हायचंय.' आपल्याला कोण व्हायचे आणि ते का व्हायचे हेही या शाळेतील बहुतेक मुलांचे पक्के ठरले आहे. 
निर्मला घाटे, स्मिता धायगुडे, पल्लवी भोसले या तिन्ही शिक्षिकांनी या शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांबद्दल सांगितले. मांडकी गावच्या यात्रेच्या वेळी मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले होते, त्या वेळी मिळालेला हजारो रुपयांचा बक्षीसरूपी निधी शाळेच्या विकासकामांसाठी वापरलेला आहे. सुंदर हस्ताक्षर, बालसभा, रांगोळी रेखाटन, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कवायत, योगासने, सूर्यनमस्कार यांसारखे अनेक चांगले उपक्रम या शाळेचे सात शिक्षक मनापासून राबवत आहेत. आयएसओ मानांकन मिळवणारी ही पुरंदर तालुक्‍यातील पहिलीच शाळा आहे. शिक्षकांची बायोमेट्रिक हजेरी असणारीही पुणे जिल्ह्यातील पहिलीच शाळा आहे. पवार गुरुजीनी माहिती दिली, की आम्ही सर्व शिक्षकांनीच पुढाकार घेऊन बायोमेट्रिक हजेरी चालू केली. जसजसा मी या शाळेच्या आवारात फिरत होतो तसतशी या शाळेतील सुविधांची माहिती मिळत होती. एकीकडे डॉक्‍युमेंटरीसाठी चित्रीकरण चालू होते. वाचनालय, बोलका व्हरांडा, यासह अग्निशामक यंत्र, चप्पल स्टॅंड, पिण्याच्या पाण्यासाठी आधुनिक फिल्टर, आकर्षक असा मोठा लॉन यासारख्या अनेक सुविधा या शाळेत आहेत. 
मांडकी गावातील ग्रामस्थांना भेटलो. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व ग्रामस्थ पक्षभेद विसरून एकजुटीने मदत करतात. या शाळेतील मुले निबंध स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा यामध्ये तालुका पातळीची अनेक बक्षिसे मिळवताना दिसतात. या मुलांनी काढलेली सुंदर चित्रे पाहून मला त्यांच्यात उद्याचे मोठे चित्रकार होण्याची उर्मी, कौशल्य नक्कीच दिसले. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचे या मुलांचे हस्तकौशल्य नक्कीच वाखाणण्यासारखे होते. पुरंदर तालुक्‍यातील ही एका खेड्यातील शाळा, पण शहरातील इंग्रजी शाळेलाही लाजवेल असा आदर्श या मराठी शाळेने घालून दिलेला आहे. हा संस्मरणीय अनुभव मला खूप काही शिकवणारा होता. मला एकीकडे माझे शाळेतील दिवस आठवत होते, तर दुसरीकडे जागतिकीकरणाने आणलेल्या स्पर्धेसाठी सज्ज होत असलेली खेड्यातील नवी पिढी समोर दिसत होती. तुम्ही खेड्यात आहात की शहरात हा प्रश्‍न गौण आहे; तुमच्या व्यक्तिमत्त्वाला सर्वांगीण उजाळा देणारे, तुमच्यापर्यंत केवळ माहिती न पोचवता, त्यापलीकडचे ज्ञान देणारे शिक्षक तुम्हाला लाभतात की नाहीत, हा भाग मुख्य आहे. मांडकीमधील मुले भाग्यवान आहेत, त्यांना लाभलेले शिक्षक ज्ञानदानासाठी झपाटलेले आहेत. मिथुनचंद्र चौधरी यांच्या "पायवाट' या राष्ट्रपतिपदक विजेत्या लघुपटातील मुलीच्या चेहऱ्यावर शाळेची इमारत दिसताच हसू उमलते. येथील मुलांच्या चेहऱ्यावरही असेच हसू उमलतांना मला पाहता आले. हा अनुभव माझ्याही जाणिवा समृद्ध करणारा, माझ्या पुढच्या प्रवासाला बळ देणारा आणि खूप प्रेरणा देणारा होता. या सात शिलेदार शिक्षकांच्या कार्याला मनापासून सलाम. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth ajit jagtap