ते झिजले... ते जिंकले! 

डॉ. सायली पगारिया
सोमवार, 16 ऑक्टोबर 2017

खूप अभिमान वाटतो मला त्यांची मुलगी असण्याचा. 
बाबा, 
तुम्हीच शिकवलंय आम्हाला 
हरून पुन्हा जिंकायला... 
तुम्हीच शिकवलंय आम्हाला 
मोठ्यांचा मान राखायला...! 

आज वसुबारस. माणूस म्हणून स्वतःला घडवण्याच्या प्रयत्नांची स्वतःलाच आठवण करून देण्याचा दिवस. यानिमित्ताने संकटांवर मात करीत स्वतःला घडवणाऱ्याची ही गोष्ट... 

"जगी सर्व सुखी असा कोण आहे?' या संत रामदासांच्या प्रश्‍नाला उत्तर आहे - "आम्ही.' 
हो, बाबाने स्वतः खस्ता खाल्ल्या, पडला, आपटला, झिजला, तरीही आम्हाला सुखात ठेवले. त्याचा एकच मंत्र आमच्यासाठी, "आयुष्यात धावताना कधीतरी पडताही; पण पडण्याच्या रडण्यात रमू नका, उठून पुन्हा धावायला लागा. हरला तरी, जिंकण्याची जिद्द हरू देऊ नका.' बाबाने स्वतःच तसे उदाहरण आमच्यासमोर ठेवले आहे. 

लहानपणी शाळेत "माझे बाबा' हा निबंधाचा विषय मला खूप आवडायचा; पण तेव्हा बाबा फक्त लाड करण्यापुरता माहीत होता आणि आता मात्र हा बाबा संपूर्णपणे उमजलाय मला. "अहो बाबा' म्हणणारी मी, कधी "ए बाबा' किंवा "ओ वडील' म्हणायला लागले समजलेच नाही. कारण आता बाबाच माझ्यासाठी भाऊ, मित्र, सल्लागार, गुरू आहेत. माझे बाबा ही काही प्रसिद्ध व्यक्ती नाही; पण इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये माणिकचंद देवीचंद पगारिया हे अदबीने घेतले जाणारे नाव आहे. ज्याच्या आयुष्यात गेले, त्यांच्या आयुष्याचे सोने केले त्यांनी. 

वयाच्या बाराव्या वर्षापासून घरातील मोठेपण त्यांनी निभावले आहे. डोळ्यांत चमक आणि हातांत धमक ठेवून मेहनतीचा हात धरून चालले आहेत. परिस्थितीशी दोन हात करत मॅट्रिक झाले. मेकॅनिकल इंजिनिअर झाले. स्वतः शिकलेच; पण भावा-बहिणीच्या शिक्षणामध्ये देखील अडथळे येऊ दिले नाहीत. अडचणींवर मात करीत हसतमुख राहिले. आईनेही त्यांना साथ दिली. बाबांनी कष्टपूर्वक "श्री सिद्ध उद्योग' कारखाना उभारला. खूप चांगले दिवस आले, कष्टाचे सोने झाले. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. होत्याचे नव्हते होण्यास फार वेळ लागला नाही. बाबांच्या डोक्‍यावरून आई-वडिलांचे छत्र गेले, त्यांच्या खिशात काहीच नसताना अतिशय बिकट परिस्थितीत आम्हाला आमचा राहता वाडा सोडावा लागला. पण, बाबांनी देखील खूप स्वाभिमानाने परिस्थिती हाताळली. आम्हा तिघा भावंडांवर त्या लहानग्या वयात झळ येऊ दिली नाही. तेव्हा देवासारखे मदतीस धावून आले ते चोपडा साहेब व मुथ्था साहेब. बाबांच्या कर्तृत्वावर त्यांचा विश्‍वास होता. खरे नाते निभावणे काय असते हे त्या दोघांनी दाखवून दिले. 

कोणीच पाठिशी नसताना, देवही कठोर परीक्षा घेत असताना, कोणी मार्गदर्शक नसताना माझा बाबा झुरत होता, खचत होता, पोरका झाला होता; पण स्वतःच्या वेदना कोणालाही न सांगता मोठ्या जिद्दीने लढत होता. पण त्याचवेळी बाबांचे आम्हा मुलांवर खूप बारीक गोष्टींमध्ये देखील लक्ष असते. आम्ही काय करतो, आमचे मित्र-मैत्रिणी कोण, दिवसभरात काय काय झाले, अभ्यासक्रम काय आहे, जगात काय नवीन घडतेय, या अशा अनेक गोष्टींवर आम्ही एकत्र रात्री चर्चा करतो व त्यातून आम्हाला नवीन मार्ग सापडतात. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल; पण आमच्या घरी आजपर्यंत टीव्ही नाही, अगदी अलीकडेपर्यंत फ्रिजही नव्हता. मात्र, विविध पुस्तकांचे भांडार आहे, ज्ञानाची मोठी शिदोरी आहे, संस्कारधन आहे, मनात माणुसकी जिवंत आहे आणि आमच्या पंखांत उंच झेपावण्याचे अमाप बळ दिले आहे बाबांनी. पाहताक्षणी एकदम कडक वाटणारे बाबा आतून फणसाच्या गऱ्याप्रमाणे अमाप गोड आहेत. खूप स्वाभिमानी व मूल्य जपणारे आहेत ते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे खूप जण दुखावले जरी गेले, तरी कोणाचेच अहित कधीच ते चिंतत नाहीत. बाबा आम्हाला नेहमी सांगतात, की पैसा हा कधीच माणसापेक्षा मोठा नसतो, एक वेळ पैसा नसेल तरी चालेल; पण स्वाभिमानाने जगणे सोडू नका, कोणाची लाचारी पत्करू नका, कर्म करा, पण फळाची अपेक्षा धरू नका. नेहमी समोरच्याच्या गुणांची कदर करा. गर्व व अहंकार करू नका आणि डोळ्यांत भ्याडपणाचे अश्रूही कधीच आणू नका. बाबांनी जे जे शिकवले ते सर्व त्यांच्या वागण्यातून दाखवूनही दिले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कधीच कोणाचा विश्‍वास तोडू नका, हे बाबा सांगतात. हिमालयासारखे माझे बाबा माझ्या भावाच्या जाण्याने मात्र खचले; पण त्यातूनही उभे राहात मला, ताईला व आईला त्यांनी खूप सावरले. "बरबादीयों का जश्‍न मनाता चला गया...' असे म्हणत त्यांनी अनेक संकटांवर मात केली. 

खूप अभिमान वाटतो मला त्यांची मुलगी असण्याचा. 
बाबा, 
तुम्हीच शिकवलंय आम्हाला 
हरून पुन्हा जिंकायला... 
तुम्हीच शिकवलंय आम्हाला 
मोठ्यांचा मान राखायला...! 

Web Title: Muktapeeth article