आगळेवेगळे हळदी-कुंकू

गंधाली देसाई
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मकर संक्रांतीपासून हळदी-कुंकू करण्याची, त्यानिमित्त काही तरी लुटण्याची एक धमाल स्त्रिया करीत असतात. पण निरुपयोगी वस्तू लुटण्याऐवजी काही उपयुक्त उपक्रम राबविला तर... पाहा, विचार करा.

आपल्याला भूक लागलीय आणि समोर कोणी भुकेलेला आला तर त्याला घासातला घास द्यावा ही आपली संस्कृती. हीच शिकवण आईवडिलांनी दिली. आपण सगळेच जमेल तसे कोणाला तरी मदत करीत असतोच. पण मी तीच गोष्ट जाणीवपूर्वक करायला लागले.

घडले ते असे. काही वर्षांपूर्वी संक्रांतीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमांना जाऊन आले होते. प्रत्येक घरी काही तरी लुटलेले होते. ते सगळे मी टेबलवर टाकले होते. परतल्यानंतर जरा फ्रेश होऊन बसले, तर टेबलावर त्या सर्व वस्तू पसरलेल्या होत्या. त्या पाहून विचारात पडले, आपण हे काय करतोय? हळदी-कुंकू एक परंपरा आहे. पूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडून चार जणींत रमायला हे एक निमित्त होते. आता इतर निमित्ते असल्याने त्याची गरज उरली नसली, तरी आताही नटणे, नवीन पदार्थ करणे, घर आवरणे ही मजा असतेच. त्या निमित्ताने सर्वांच्या भेटीगाठी होतात, सगळ्यांची ख्यालीखुशाली कळते, आपण नाही केले तर पुढच्या पिढीला कसे कळणार? हे सगळे मान्य! तरीही काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते.

पावडरचे डबे, कंगवे, फळांच्या जाळ्या, टिकल्या... काय करणार आहे यांचे? यापैकी निम्म्या तरी गोष्टी माझ्या कामाच्या नाहीत. म्हणजे त्या कुठेतरी पडून राहणार किंवा कुणाला तरी देऊन टाकणार. यात कुठेतरी आपणच बदल करायला हवा.
त्या वर्षीच मी बायकांना घरी बोलावून हळदी-कुंकू करताना मनाचे श्‍लोक, हरिपाठ अशी सोप्पी छोटी पुस्तके दिली. थोडी घरात ठेवून बाकी बरोबर ठेवली अन्‌ रथसप्तमीपर्यंत भेटेल त्या महिलेला, रक्ततपासणीसाठी घरी जाते त्या आजींना माझे हळदी-कुंकू म्हणून ही भेट दिली. त्या सर्वांनाच ती भेट आवडली. काहीजणी तर "अगं बहिणीसाठी, मुलीसाठी अजून एक देतेस का', असे मागूनही घ्यायच्या. त्यांना आनंद व्हायचा अन्‌ मला समाधान.

नंतरच्या वर्षी एक गरीब महिला लॅबमध्ये रक्ततपासणीसाठी डॉक्‍टरांची चिट्ठी घेऊन आली. धुण्याभांड्यांची कामे करणारी. मुलगा अपघातात गेला. सून आणि नातू आहेत त्यांना तीच सांभाळायची. मावशीचे कौतुक वाटले अन्‌ वाईटही वाटले. तिचे हिमोग्लोबिन खूप कमी झाले होते. उपचारांसाठी पैसे नव्हते. मी त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत आणि ओळखीच्या डॉक्‍टरांकडे पाठवून औषधेही मोफत मिळतील असे केले. तेव्हाच मैत्रिणीचा हळदी-कुंकवाला ये असा फोन आला आणि एक नवीन कल्पना सुचली.

मुळातच स्त्री घराचा आधारस्तंभ असते. ती आजारी पडली, तर घराची घडीच बिघडते आणि सध्याच्या काळात तर या सगळ्या "मावश्‍या' आपल्या घराचासुद्धा अविभाज्य भाग झालेल्या आहेत. आपल्यासाठी व स्वतःच्या संसारासाठी राबणाऱ्या या भगिनींसाठी काहीतरी करायला हवे, असे वाटले. ठरले. संक्रांत ते रथसप्तमी या काळात माझ्या आसपासच्या म्हणजे बाणेर, बालेवाडी परिसरांतील ज्या ज्या मोलकरणी भेटतील त्यांना सांगायचे व त्यांचे हिमोग्लोबिन मोफत तपासून द्यायचे, त्यांनाच इतर जणींना निरोप द्या म्हणून सांगायचे. हिमोग्लोबिन खूप कमी आले, तर आमच्या लायन्स क्‍लबतर्फे योग्य वैद्यकीय सल्ला व औषधांची पण मदत केली जाते.

हिमोग्लोबिन साधारण कमी असेल त्यांना काय खा, कसे बनवा, आहारातून रक्तवाढ कशी होईल यासाठी मार्गदर्शन करते. परत दोन महिन्यांनी वाढले आहे का हेही तपासून घ्या असे सांगते. "होम व्हिजिट्‌स"मुळे माझे फिरणे खूप होते. जिथे जाते तिथे तेथील गरजू महिलांची मोफत रक्त तपासणी करते. बांधकामावरील महिलांचे "साइट'वर जाऊनसुद्धा रक्त तपासून दिले आहे.

आता या आगळ्यावेगळ्या हळदी-कुंकवाला सहा वर्षं झाली. आतापर्यंत साधारण सतराशे महिलांपर्यंत पोचले आहे. महिलांमध्ये ऍनिमियाचे प्रमाण जास्त आहेच आणि त्याबद्दल, स्वतःच्या आरोग्याबद्दल त्यांना काही विशेष माहितीच नाही. या रक्त तपासणीबरोबर त्यांना आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता या विषयी माहिती सांगून जागरूकता निर्माण करते. करण्यासाठी काम खूप मोठे आहे, त्यात हा माझा खारीचा वाटा.

मैत्रिणी, नातेवाइकसुद्धा हळूहळू यात सामील होत आहेत. त्यांच्या सोसायट्यांमध्ये, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मावश्‍यांना एकत्र करून मला बोलावतात. त्यामुळे पुण्याच्या इतर भागातही पोचू शकते, शिबिर आयोजित करणारे काहीजण नंतर लागणाऱ्या औषधांचा खर्च स्वेच्छेने स्वतः करतात. आपले मनपाचे दवाखानेही औषधे देण्यासाठी खूप मदत करतात, एका मैत्रिणीने तपासणीनंतर प्रत्येक कामवालीला हळदी-कुंकू लावून गुळाची ढेप दिली. माझ्या बहिणीने महिलांच्या तपासणीचा खर्च म्हणून काही मदत केली. कुटुंबीय, लायन्स क्‍लबचे सदस्य, डॉक्‍टर अन्‌ समविचारी मैत्रिणींचे सहकार्य मिळत आहे. त्यामुळे अजून काम करण्याची उमेद वाढत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktapeeth Article of Gandhali Desai