आईची असता सोबत...

जयंत शिंदे
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

आई नुसती सोबत असली तरी दुनियेतील कशाचीच भीती वाटत नाही. तिचा वात्सल्याचा हात आपल्याला उत्साह देतो.

अचानक रस्त्यात पाच-सहा वर्षांचा एक मुलगा समोरून धावत येऊन बिलगला. थोडासा घाबरलेला दिसत होता. त्याची काही विचारपूस करण्याआधीच त्याने विचारले, ‘‘काका, मला माझ्या वाड्याजवळ सोडाल? तेथे हम्मा उभी आहे, मला भीती वाटते.’’  त्याची एकूण अवस्था पाहून मी तत्परतेने त्याचा हात हातात घेतला. त्याची भीती दूर करत निघालो. त्याच्या दुसऱ्या हातात कागदी पुडा होता व त्याने तो छातीजवळ घट्ट धरला होता. आई घरी वाट पाहात असेल, हे सांगायला तो विसरला नव्हता. थोडे अंतर पार केल्यावर त्याने एका वाड्याकडे बोट दाखवले. तेथे दरवाजापाशीच त्याला घाबरवणारी गाय उभी असलेली दिसली. मी त्याला वाड्यात सोडले व निघालो, तेव्हा त्याने ‘‘काका, बाय बाय’’ केले.

‘हम्मा’ या शब्दाने मला भूतकाळात नेले. घरापासून दहा मिनिटांच्या अंतरावरती माझी शाळा होती. शाळेत जाताना कधी उशीर झाला तर नेहमीचा मार्ग सोडून आम्ही मित्र गवळीवाड्यातील वाटेने थोडेसे घाबरतच जात असू. वाड्यात दोन्ही बाजूंना गाई-म्हशी दावणीला बांधलेल्या असायच्या. सकाळच्या वेळी त्यांचे हंबरणे कानावर पडायचे. चुकून कधी तरी फारच उशीर झाला तर त्या दिवशी सकाळी आई मला शाळेत सोडायला यायची. तेव्हा तिचा हात गच्च धरून गवळीवाड्यातून जाताना मात्र कधीच भीती वाटली नाही, का कुणास ठाऊक. पण ती बरोबर असताना खूप छान व मस्त वाटत राहायचे. आता आई आपल्यासोबत असल्यावर आपल्याला कुणाची व कशाचीच भीती नाही इतके आश्‍वासक वाटत राहायचे. अचानक आलेल्या पावसात जेव्हा ती तिच्या डोईवरचा पदर थोडासा पसरून माझ्याही डोक्‍यावर धरायची तेव्हा तर इतके सुरक्षित वाटत राहायचे की पावसाची भीती दूर पळायची. अजूनही आई जेव्हा तिच्या सुरकुतलेल्या हाताने वात्सल्याने आपल्या दोन्ही गालांवरती हात फिरवते तेव्हा काही क्षणात मनात असलेली निराशा, ताणतणाव कुठल्या कुठे निघून जातात. आपण एकदम टवटवीत व उत्साहित होऊन जातो. 

आणखी वाचा : 

घरट्यातील भाडेकरू

वापरा आणि फेका!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktapeeth article jayant shinde