पाठ निरीक्षण

अनुजा उमराणी
गुरुवार, 4 जुलै 2019

शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. काही नव्या शिक्षकांची निवड झाली असेल. या निवडीसाठी निकष कोणते असतील?

शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. काही नव्या शिक्षकांची निवड झाली असेल. या निवडीसाठी निकष कोणते असतील?

शिक्षकपदासाठी उमेदवारांच्या मुलाखतीनंतर पाठ निरीक्षण घेतले जाते. अध्यापन प्रशिक्षण महाविद्यालयात शिकताना वर्गांवर पाठ घ्यावे लागत असतातच. त्यामुळे पाठ घेण्याची तयारी असतेच. पण वर्ग नियंत्रणात ठेवत अध्यापनातील वेगवेगळी आयुधे वापरत शिकवण्याची हातोटी, आत्मविश्‍वास आहे की नाही हे या पाठनिरीक्षणात जोखले जाते. तर एका वर्गावर एक उमेदवार तरुणी पाठ देण्याकरिता आली. वर्गात प्रवेश करताक्षणी सर्वप्रथम तिने आपली पादत्राणे कोपऱ्यात काढली. पाठ निरीक्षणासाठी बसलेल्या व्यक्तीच्या नजरेतून ही कृती सुटली नाही. त्या लहानशा कृतीने भलेमोठे प्रश्‍नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. ते तिच्याही लक्षात आले. मंदस्मित करून फलक लेखन करून तिने संपूर्ण पाठ घेतला. दिलेल्या वेळेचा तिने चांगला उपयोग केला होता. पण पाठ संपवून निघताना निरीक्षकांनी तिला व्हरांड्यातच थांबायला सांगितले. सर्व सदस्यांचे पाठ निरीक्षण घेऊन झाल्यावर निरीक्षक बाहेर आले. त्यांनी तिला प्रश्‍न विचारला, ""तू पाठ सुरू करण्यापूर्वी पादत्राणे का काढलीस?'' तिने खूप सुंदर उत्तर दिले, ""सर, अध्यापन हे व्रत आहे, पूजा आहे. ईश्‍वराने आपल्याला दिलेली सेवेची ही सुंदर संधी आहे, असे मी मानते. मंदिरात जाताना पादत्राणे बाहेर ठेवतो अन्‌ पवित्र मनानेच आपण आत प्रवेश करतो. मला वाटते, प्रत्येक अध्यापकाचे मन आधी स्वच्छ, पवित्र असायला हवे, म्हणजे शिकवणेही मंगल, सुंदर होईल.''

निव्वळ पदव्या अन्‌ प्रशस्तिपत्रकांचे गठ्ठे, गोळा केलेली विषयांची टाचणे अन्‌ ओढून ताणून आणलेले सौजन्य हे वर्गावर पाठ घेण्यासाठी उपयोगी नसते. अध्यापक अन्‌ विद्यार्थी हे नाते खरे तर किती विलक्षण आहे. चारित्र्य, नीतिमत्ता, सखोल ज्ञान, व्यासंग, भाषा, देहबोली, नजरेतले पवित्रभाव, तळमळ, सात्त्विकता, सहजता, आस्था, आत्मियता किती तरी कसोट्या लावाव्या लागतील. किमान या अन्‌ एवढ्या गुणांच्या परीक्षणातून उत्तीर्ण अध्यापक आदराला पात्र होतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by anuja umrani