...अन् गल्ली धावत आली

बी. जी. पाटील
गुरुवार, 23 जानेवारी 2020

गल्लीतील भटक्या कुत्रीची सुटका करण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होती. तिच्या वेदना सगळ्यांपर्यंत पोचत होत्या.

गल्लीतील भटक्या कुत्रीची सुटका करण्यासाठी सगळ्यांची धडपड सुरू होती. तिच्या वेदना सगळ्यांपर्यंत पोचत होत्या.

गल्लीतील त्या भटक्या कुत्रीला संध्याकाळी सहाच्या दरम्यान प्रसूतिवेदना सुरू झाल्या. मृत पिलाचे फक्त तोंड बाहेर आलेले. काळे-निळे पडले होते ते पिलू. कुत्रीची प्रकृती बिघडू लागलेली. हे पाहिल्यावर गल्लीमधील प्रमोद साळुंखे-मिस्त्री, ओंकार तळेकर, शरद पोवार, सूरज शिंदे, अमोल शिंदे, गोरखनाथ चव्हाण धावून आले. डॉ. दर्शल ठक्कर व डॉ. नेहा साकरकर काही वेळातच तेथे पोचले. त्यांनीही प्रसूती करण्याचा कसोशीने प्रयत्न केला; पण सर्व प्रयत्न असफल झाले. शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. डॉ. नेहा फोनवरून शस्त्रक्रियेची व्यवस्था असलेल्या क्लिनिकचा शोध घेत होत्या. रात्रीची वेळ असल्यामुळे अनेक ठिकाणी नकार मिळत होता. यादरम्यान डॉ. दर्शल कुत्रीला धीर देत होते. हडपसर येथील क्लिनिक शस्त्रक्रियेसाठी तयार होते. रिक्षा बोलावली, पण त्या रिक्षावाल्याने रुग्ण पाहून नकार दिला. दुसऱ्या रिक्षेने माझा मुलगा शुभम व त्याचा मित्र रुचिर सुगंधी यांनी रुग्णाला हडपसरला नेले. हडपसरमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया अवघड असल्याने सिंहगड रस्त्यावरील दुसऱ्या क्लिनिकमध्ये पाठवले. मध्यरात्री रुग्णाला बेशुद्ध करून शस्त्रक्रियेद्वारे गर्भाशयातील तीन मृत पिलांना बाहेर काढून मुक्या प्राण्याचा जीव वाचवला. यासाठी सोळा हजार रुपये खर्च आला.

पहाटे डॉ. दर्शल यांच्या घरी कुत्रीला आणले, पाच ते सहा तास निगराणीखाली ठेवून नंतर पिंपरी येथील एनजीओ पुनिता मॅडम यांच्याकडे रुग्णाला पोचविण्यात आले. तेथे चार ते पाच दिवस पुढील उपचार व विश्रांती. सध्या कुत्रीची तब्येत झपाट्याने सुधारते आहे. कुत्रीसाठी सगळ्यात आधी धावून येत धावपळ करणारे डॉ. दर्शल आणि डॉ. नेहा हे प्राण्यांचे नव्हे, तर माणसांचे डॉक्टर आहेत. एकीकडे माणुसकी हरवली असे आपण म्हणतो, अशा जगात डॉ. दर्शल आणि डॉ. नेहा हे देवदूत वाटले. त्यांनी कुत्रीच्या शस्त्रक्रियेसाठी पैसेही खर्च केले. त्या खर्चातील वाटा आपणही उचलणे योग्य ठरेल, असे मला वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by b j patil