सरले-उरले क्षण

डॉ. सुधीर डोंगरे
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

आरामखुर्चीवर बसून ज्येष्ठत्व अनुभवताना मिटल्या डोळ्यांपुढे येतात, आनंदी सरले क्षण अन् मनात येते उरले क्षण आनंदी करूया!

आरामखुर्चीवर बसून ज्येष्ठत्व अनुभवताना मिटल्या डोळ्यांपुढे येतात, आनंदी सरले क्षण अन् मनात येते उरले क्षण आनंदी करूया!

आठवतं, गाभूळलेली चिंच बरेच दिवसांत खाल्ली नाही. जत्रेत पिपाणी वाजवली नाही. सर्कशीतला विदूषक आता हसवत नाही. अंगणात भोवरे, गोट्या, सागरगोटे, लगोरी दिसत नाही. वाड्यातला पत्त्यांचा अड्डा स्मरतच नाही. कापसाची म्हातारी पकडण्यात मजा येत नाही. त्या म्हारातीनंच आपलं बालपण बरोबर नेलेलं असतं आणि आपल्याला वार्धक्‍य दिलेलं असतं म्हणून म्हातारी इकडून तिकडे मजेत उडत असते. आपण मात्र जमिनीवरच असतो. आनंदी मनाने मी ज्येष्ठत्व स्वीकारले आहे. आई-वडील, नातेवाईक, मुली, मित्र, नातवंडे सर्वांना भरपूर प्रेम दिले. आता मी माझ्यावर प्रेम करणार. आता भाजीवाल्याशी घासाघीस नको. त्याला पाच रुपये जास्त देऊन माझ्या खिशाला भोक पडणार नाही; पण त्याला मुलीची फी द्यायला थोडी मदत होईल. रिक्षाच्या मीटरवर अठरा रुपये झाले तरी मी त्याला वीस रुपये देणार. त्याच्या चेहऱ्यावर हसू आले तर माझ्या दोन रुपयांपेक्षा मला जास्त समाधान मिळणार. वयस्कर लोकांनी एकच गोष्ट पुनःपुन्हा सांगितली तरी त्यांना अडवणार नाही, कारण त्यांच्या चेहऱ्यांवर रमलेला भूतकाळ प्रत्येकवेळी मी अनुभवणार. चुरगळलेल्या कपड्यांकडे लक्ष नाही देणार, कारण पोशाखापेक्षा व्यक्तिमत्व महत्त्वाचे आहे. माझा अहं सोडून नातेसंबंध कायम राखणार.

प्रत्येक दिवस हा माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल, हे मी स्वीकारलेच आहे. म्हणजे मृत्यूचेही भय नाही वाटणार. उरलेल्या जीवनाला फक्त आनंदाची सोनेरी चौकट देणार. आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फोटो असतात; पण आणखी कॉपी काढायला निगेटिव्ह नसतात. कधीतरी चहाचा घोट घेत घेत टॉम अँड जेरी बघणार. अंघोळीसाठी कधी दहा मिनिटे, कधी कधी एक तास घेणार. संध्याकाळी मंदिराबरोबर बागेतही फिरणार. फुलपाखराच्या सौंदर्याचा आस्वाद घेणार. रात्री झोपताना मात्र पाच मिनिटे देवाला देणार. एवढ्या सुंदर जीवनासाठी त्याला थॅंक्‍स नक्कीच म्हणणार. जग बदलण्याच्या भानगडीत न पडता आयुष्य मस्त मजेत जगण्याचा अनुभव घेणार.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by dr sudhir dongre