गुंता आणि गुंडा

शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

गुंत्यात गुंतला जरी, प्रत्येक दोर निराळा हे कळले पाहिजे. मग प्रत्येकाचे स्वतंत्रपण राखूनही गुंता सोडवत त्याचा गुंडा करता येतो.

गुंत्यात गुंतला जरी, प्रत्येक दोर निराळा हे कळले पाहिजे. मग प्रत्येकाचे स्वतंत्रपण राखूनही गुंता सोडवत त्याचा गुंडा करता येतो.

पूर्वी दुकानातून मिळणारा किराणा माल कागदाच्या पुड्यातून बांधून मिळे. त्यामुळे बांधण्यासाठी वापरलेला दोरा बराच साठत असे. आईच्या शिवणकामाच्या साहित्यात अशा दोऱ्याचा गुंडा हमखास असे. त्याचा वापर पुड्या बांधण्याशिवाय गजरे, देवांसाठी फुलांचे हार, फुलांचे तोरण अशा कामांसाठीदेखील होत असे. कधी-कधी तो दोरा गाठवून पतंग उडवण्यासाठी वापरत असू. त्यामुळे किराणा माल घरात आल्यावर पुड्या सोडवून दोरा जमा करून त्याचा गुंडा करणे हा एक उद्योग असायचा. बरेचदा पुड्या सोडवल्यावर दोऱ्याचा गुंता होत असे. असा गुंता सोडवायला मला फार आवडत असे. प्रत्येक पुडीचा दोरा निराळा करताना तो तुटू न देता गुंत्यातून वेगळा करणे, कुठे गाठी पडू न देणे, दोरा निराळा करताना गुंत्यातील इतर दोरे तुटणार नाहीत याची काळजी घेणे, लहान-मोठे दोरे वेगळे करणे व मग त्याचा गुंडा करणे, हे सगळे करण्यात बराच वेळ जात असे. पण, दोरा न तोडता गुंडा केल्याचा आनंद मिळत असे.
आज या जुन्या छंदाकडे मागे वळून पाहताना असे वाटते, की आपल्या जीवनाशी त्याचे साम्य आहे. आपले कुटुंब हे एका गुंड्यासारखे आहे. कुटुंबातील एक-एक व्यक्ती म्हणजे एक-एक वेगळा दोरा. व्यक्तीनुसार त्याची लांबी लहान-मोठी. प्रत्येक नात्याचा वेगळा दोरा. तो आपण दुसऱ्या दोऱ्याच्या नात्यापासून वेगळा करतो, पण न तोडता. प्रत्येक नात्याचे वेगळेपण त्याचे अखंडत्व राखून सुट्या दोऱ्याप्रमाणे जपतो. आपल्या गरजेनुसार लहान-मोठ्या नात्यांच्या गाठी मारून कुटुंबाचे ऐक्‍य बळकट करतो. नवी नाती निर्माण करून गुंड्यामध्ये सामावून घेतो. त्यासाठी संबंधित दोन दोऱ्याच्या गाठी मारतो. कुठल्याही नात्याचा दोरा न तोडता त्याला कुटुंबाच्या गुंड्यात सामावून घेण्याचा आनंद निराळाच असतो. अशा गुंड्यातील दोरे सुखाचे गजरे गाठवण्यासाठी, आनंदाचे क्षण हारासारखे गुंफण्यासाठी वापरून आपण आपले आयुष्य समृद्ध करू शकतो. म्हणून तर गुंता सोडवायचा अन् गुंडा करायचा!