खरा तोच डोळस!

मधुकर पाटील
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

ऐन तारुण्यात त्यांना अचानक अंधत्व आले. पण, न डगमगता ते डोळसपणे चालत राहिले.

ऐन तारुण्यात त्यांना अचानक अंधत्व आले. पण, न डगमगता ते डोळसपणे चालत राहिले.

शेजारच्या गावातील मित्राकडे संध्याकाळी सहजच गेलो होतो. तिथे त्याची बहीण प्रभाताई व मेहुणे रमेश देशमुख यांची भेट झाली. त्यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील जामनेर. वय सत्तर. ऐन तारुण्यात डोळ्यांपुढचे जग अंधारमय झालेले. म्हणाले, ‘‘जामनेर महावद्यालयात कार्यालयीन पर्यवेक्षक होतो. वयाच्या साधारण पस्तीसाव्या वर्षी अचानक अंधत्व आले. जीवनात अचानक अंधार झाल्यासारखे वाटले. पत्नी फक्त दहावी झालेली. पण, महाविद्यालयाने तिला नोकरी दिली आणि रोजीरोटीचा प्रश्न सुटला. माझ्या मनाला मी समजावत होतो, की नातेवाईक, मित्र केवळ सहानुभूती व्यक्त करतील, पुन्हा जीवन फुलवणार नाहीत. हे संकट आपणच दूर करायचे आहे. माझा स्वाभिमान मला स्वस्थ बसू देत नव्हता. पूर्वी वाचनात आलेले एक वाक्य आठवले - ‘धुके आपल्याला एक गोष्ट शिकवते की जीवनात रस्ता दिसत नसला तर दूरवर पाहण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ असते. एक एक पाऊल टाकत पुढे चला, रस्ता आपोआप मोकळा होतो.’

हळूहळू दोन्ही हातांत घरगुती उपयोगाच्या सामानाच्या मोठ्या पिशव्या घेऊन विक्री करायला सुरवात केली. देवाने व समाजाने मोठी साथ दिली. गिऱ्हाईक हवी ती वस्तू घेऊन पैसे पेटीत टाकायचे. त्यानंतर एकाने मला थोडक्या भाड्यात हातगाडी दिली. हातातले ओझे कमी झाले होते, पण मनावरचे ओझे कायम होते. माझ्या हातगाडीसाठी श्रावण नावाचा लहान गरजू मुलगा मदत करू लागला. एके दिवशी देशपांडे नावाचे गृहस्थ माझ्याकडे नॉनस्टिक तवा घेण्यासाठी आले. त्यांना हवा तो तवा मी मागवून दिला. ते बँकेत नोकरीला होते. मला त्यांनी बॅंकेतून पंचवीस हजारांचे बिनातारण कर्ज मिळवून दिले. हे माझ्यासाठी कर्ज नव्हतेच, तर देवाने माझ्या आर्जवाला दिलेली साद होती. आता विक्रीही वाढली होती. हळूहळू मुलींच्या लग्नासाठी बचतही होत होती. छोटासा व्यवसाय होता, पण कुणाचेही देणे ठेवायचे नाही हे तत्त्व पाळले. पत्नीने अशाही परीस्थितीत बीए केले. तिचे नाव खरे तर प्रभा नव्हे, प्रतिभा हवे होते.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by madhukar patil