अप्पा का काला

माधुरी मारुलकर
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

गोपाळकाल्याचा प्रसाद आज वाटला जाईलच, पण एरवीही नाश्‍ता म्हणून हा पदार्थ गंमत आणतो.

गोपाळकाल्याचा प्रसाद आज वाटला जाईलच, पण एरवीही नाश्‍ता म्हणून हा पदार्थ गंमत आणतो.

गोकुळाष्टमी कालच झाली. आज दहीहंडी फोडल्यानंतर गोपालकाल्याचा प्रसाद सर्वांना वाटला जातो. तो काला म्हणजे शिळ्या भाकरीचा काला. हा काला आमच्या सासूबाई फारच चविष्ट बनवायच्या. तो असा- प्रथम ज्वारीच्या पिठाची शिळी भाकरी (रात्रीची) शक्‍यतो हातानेच बारीक करावी. नंतर त्या भाकरीच्या निम्मा कांदा बारीक करून त्यात टाकावा. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे साखर व मीठ घालावे. नंतर त्यावर तेलाची खमंग फोडणी घालावी (मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरचीचे थोडे तुकडे व कढीपत्ता) नंतर या मिश्रणात दही घालावे व ते एकजीव करावे. भाकरी ओलसर राहील इतपत दही असावे. हा काला झाल्यानंतर लगेचच सर्वांना द्यावा आणि घ्यावा. कारण भाकरी नंतर कोरडी होते. वरून कोथिंबीर आणि कडेला कोणतेही लोणचे असल्याच फारच उत्तम. तर असा हा काला आमच्या सासूबाई करतायत म्हटल्यावर शक्‍यतो कोणी खाल्ल्याशिवाय बाहेर जात नसत. सासूबाई जाऊन बरेच वर्षे झाली, पण हा काला मात्र आमच्या घरात होतोच होतो.

एका रविवारी मी हा काला केला असताना आमचे एक गुजराथी स्नेही घरी आले होते. त्यांच्या खाण्यात हा काला आला. त्यांना तो प्रचंड आवडला. त्यांनी माझ्या पतींना विचारले, ‘‘अप्पा भाभीने काय बनवले आहे आणि कशाचे आहे? खूपच टेस्टी आहे.’’ त्यावर ह्यांनीच त्यांच्या आईंची पाककृती मित्राला समजावून सांगितली. तेही एक वेगळा पदार्थ खाण्यात आल्यामुळे खुशीतच घरी गेले. थोड्याच दिवसांनी त्यांच्या पत्नीचा मला फोन आला. त्या म्हणाल्या, ‘‘वहिनी, तुमचा हा काला आमच्या घरातही अत्यंत आवडीचा झाला आहे. मीही करून बघितला आहे. नाश्‍त्यामध्ये काहीतरी वेगळे खाण्यामुळे सगळेच खूष आहेत.’’ त्यांच्या नातेवाइकांमध्ये, गुजरातमध्ये या काल्याची ‘रेसिपी’ पोहोचली. म्हणतात ना, चवीने खाणार त्याला शिळी भाकरीसुद्धा देणार, नाही का? आणि याच स्नेही कुटुंबाने त्या काल्याचे नाव ठेवले ‘अप्पा का काला़’!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by madhuri marulkar