आजीची सेवा

नितीन दहिवडीकर
गुरुवार, 30 जानेवारी 2020

बँकेत भेटलेल्या आजीला थोडी वाट वाकडी करून तिच्या घरापाशी सोडले. भर दुपारी उन्हात तिला केलेली ही मदत आजीची सेवा केल्याचे समाधान देणारी होती.

बँकेत भेटलेल्या आजीला थोडी वाट वाकडी करून तिच्या घरापाशी सोडले. भर दुपारी उन्हात तिला केलेली ही मदत आजीची सेवा केल्याचे समाधान देणारी होती.

बँकेमध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. थोडा वेळ लागणार असल्याने मी खुर्चीत बसलो. तेवढ्यात चेहऱ्यावर सुरकुत्या, कमरेत किंचितशा वाकलेल्या तरीही तरतरीत असलेल्या आजीबाई आल्या. खास ग्रामीण ढंगात त्या महिला कर्मचाऱ्याशी बोलल्या. मग माझ्या शेजारच्याच खुर्चीवर बसल्या. त्यांची देहबोली व कामातील सहजता बघून मला कुतूहल वाटले! तुम्ही एकट्याच बँकेत आलात का? तुमचे वय किती? असे मी त्यांना विचारले. माझे वय ऐंशी अन् मी कसबा पेठ ते बँक बसने एकटीच आले, असे त्या उत्तरल्या. त्यांचा उत्साह अन् ऊर्जा पाहून वय म्हणजे ‘इटीज इज जस्ट नंबर’ हे मला मनोमन पटले. बोलण्याच्या ओघात त्यांनी अख्खा कौटुंबिक पट उलगडला. ‘‘माझी मुलगी अचानक गेली रे ...’’ ही व्यथा मांडताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. नातवंडांसाठी जीव तीळ तीळ तुटतो रे, म्हणताना जराशा भावूकसुद्धा झाल्या. लगेच सावरत म्हणाल्या, ‘‘पैशांची गरज असेल तरच नातवंड जवळ येतात. एरव्ही बँकेत माझ्याबरोबर चला म्हटले की टाळाटाळ करतात, म्हणून एकटी एवढ्या लांब आले बघ. अख्खा गाव मामाचा, एक बी नाही कामाचा.’’

माझे काम आटोपले; पण मी थांबलो. त्यांचे काम संपल्यानंतर ‘तुम्हाला घरापर्यंत सोडले तर चालेल का?’ असे विचारल्यावर त्यांनी होकारार्थी मान डोलावली. कुणाचाही आधार न घेता सर्व पायऱ्या उतरून माझ्या दुचाकीवर येऊन बसल्या. ‘परमेश्वरासारखा भेटलास बाबा’ असे म्हणत मला त्यांनी क्षणात देवत्व बहाल केले. घराजवळ उतरताना या जगात कुणी कुणाचे नसते बघ, तरीसुद्धा ‘तू देवासारखा भेटलास’ याचा पुनरुच्चार करताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान बरेच काही सांगून गेले. गप्पांच्या ओघात त्या बरेच काही बोलून गेल्याच. शिवाय कौटुंबिक व सामाजिक भान जपण्याची शिकवण, शिदोरी देऊन उतरत्या झाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by nitin dahiwadikar

टॅग्स