प्रेम अर्पावे!

मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

प्रेम लाभे प्रेमळाला, असे म्हटले जाते. तुम्ही प्रेम पेरले तर पशु-पक्ष्यांकडूनही तुम्हाला प्रेम मिळते.

प्रेम लाभे प्रेमळाला, असे म्हटले जाते. तुम्ही प्रेम पेरले तर पशु-पक्ष्यांकडूनही तुम्हाला प्रेम मिळते.

‘जगाला प्रेम अर्पावे’ असे साने गुरुजींनी सांगितले, ते जणू माझ्या पतीने ऐकले आणि आयुष्यभर कृतीतही आणले. ते माणसांवर प्रेम करायचेच, पण वस्तू, प्राणी, पक्षी सर्वांवरच जिवापाड प्रेम करायचे. वस्तू कोणतीही असो ती सावकाश प्रेमानेच ठेवणार. ते म्हणायचे, वस्तूंना बोलता येत नाही; पण जाणिवा असतात. गावाला जाताना आमच्या घरच्या कुत्र्याचा, राजाचा, अगदी त्याच्या अंगावर हात फिरवून निरोप घेणार. घरात पोपट व मासे होते. त्यांनापण सांगून जाणार. पोपटाला जणू समजायचे. तो पिंजऱ्यातच त्यांच्या बाजूला येऊन ओरडायचा. त्या वेळचा त्याच्या बोलण्याचा स्वर वेगळा असायचा. ते परतल्यावर वेगळाच सूर असायचा. टॅंकजवळ गेले की हे ज्या बाजूला जातील त्या बाजूला सगळे मासे एकत्र यायचे. आमच्या घरात एक मनीप्लॅंटचे झाड होते. त्याच्या अंगावरून हे हात फिरवायचे. त्यांचे म्हणणे असे, की मायेने स्पर्श केला की तेसुद्धा मोहरते. असा आमच्या घरातला दरवेळेचा निरोप समारंभ असायचा. गावाहून घरी परत आल्यावर याच प्रेमाने भेटगोष्टी व्हायच्या.

हे गावावरून आल्यावर सगळ्यांना खूप आनंद झालेला त्यांच्या वागण्यावरून समजायचे. हे गावाहून आले आणि त्या वेळी पोपटाचा पिंजरा झाकलेला असला तरी आतमध्ये दांडीवर येरझारा घालत तो ह्यांना म्हणायचा, मी खूप वाट पाहिली बरं का! काही वेळासाठी आम्ही पोपटाला पिंजऱ्यातून बाहरे काढायचो. एकदा पंखा चालू होता आणि तो थोडासा उडाला. पंख्याचा फटका बसून तो खाली पडला. मी पटकन त्याला पिंजऱ्यात टाकले. हे पिंजऱ्याजवळ गेले त्याला विचारले, माझ्या बाळाला लागले का? तो पिंजऱ्यातच ह्यांच्या बाजूला आला व पिंजऱ्याच्या बाहेर पाय काढला. ह्यांनी लगेच त्याला आयोडेक्‍स लावले. त्याच्या डोक्‍यावर हात फिरवला. तो गप्प जाऊन दांडीवर बसला. हे गावाला गेले की त्या वेळी पत्र लिहिण्याची पद्धत होती. पत्रात प्रथम मुलांची चौकशी, नंतर झाडांची, नंतर राजा, पोपट, मासे कसे आहेत? वगैरे... माझ्यासाठी काहीच का लिहीत नाही विचारले, की म्हणायचे या सगळ्यांमध्ये मी तुला पाहतो. मग वेगळे लिहिण्याची गरजच काय?