देवदूत

प्रा. गिरीश बक्षी
शुक्रवार, 19 जुलै 2019

अनोळखी गोव्यात आम्ही अडचणीत असताना त्याने आम्हाला आसरा मिळवून दिला होता. अंधारातून अचानक आला आणि ओळख न देता गेलाही.

अनोळखी गोव्यात आम्ही अडचणीत असताना त्याने आम्हाला आसरा मिळवून दिला होता. अंधारातून अचानक आला आणि ओळख न देता गेलाही.

निसर्गसंपन्न गोव्याला आम्ही पहिल्यांदाच जात होतो. रात्री नऊ वाजता आम्ही पोचलो तेव्हा जोरदार पाऊस कोसळत होता. सर्वत्र अंधार. अनोळखी प्रदेश. त्यात जोराचा पाऊस. अशा परिस्थितीत आम्ही बस स्थानकावर उभे होतो. बाकीचे प्रवासी आपापल्या दिशेने लगबगीने निघून गेले. आम्हाला हॉटेल हवे होते, पण विचारायला कोणीच नव्हते. काय करावे, या चिंतेत असतानाच अचानकपणे अंधारातून एक व्यक्ती आमच्या समोर प्रकट झाली. "हॉटेल पाहिजे का?' या प्रश्‍नाबरोबरच भपकन्‌ दारूचा वास आला. केस विस्कटलेले, मळके कपडे. त्या व्यक्तीवर विश्‍वास ठेवावा? पण आणखी काही इलाजच नसल्याने आम्ही त्याच्यामागे निघालो. पंधरा मिनिटांनंतर त्याने आम्हाला एका हॉटेलमध्ये नेले आणि आम्ही सुस्कारा टाकला. हॉटेलमध्ये खोली मिळाली. मी खोली ताब्यात घेण्याच्या गडबडीत असतानाच सकाळी साडेआठ वाजता "गोवा दर्शन' बस मिळवून देण्यासाठी येतो, तयार राहा असे सांगून तो निघूनही गेला. त्याने एकही पैसा मागितला नाही. इतकेच नव्हे, मला त्याचे आभार मानायलाही सवड दिली नाही. जसा आला तसा निघून गेला.

सकाळी बरोबर साडेआठ वाजता तो आला. आता त्याचा अवतार जरा बरा होता. मी त्याला काही विचारणार, तोच तो भरभर चालत पुढे निघाला. त्याच्या मागे आम्ही जवळ जवळ धावतच होतो. एका ठिकाणी त्याने आम्हाला थांबवून तिकिटे आणून दिली आणि पुन्हा क्षणार्धात दिसेनासा झाला. मला त्याच्याशी बोलायचे होते. केलेल्या मदतीबद्दल आभार मानायचे होते. त्याला पैसे द्यायचे होते. पण व्यर्थ. नंतर मी आसपास त्याचा शोध घेतला. कुठेच दिसला नाही. त्याच्याविषयी काही जणांजवळ चौकशी केली, पण काहीच समजले नाही. पुढेही एक-दोन दिवस सर्वत्र शोधूनही तो दिसला नाही. अनोळखी गोव्यात आम्ही अडचणीत असताना त्याने आम्हाला आसरा मिळवून दिला होता. आम्हाला गोवा दर्शन घडवले होते. रात्रीच्या अंधारात तो देवदूताच्या रूपात आला आणि सकाळच्या प्रकाशात अंतर्धान पावला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by prof girish bakshi