भूतकाळ, नैराश्य आणि स्थितप्रज्ञता...

rohit vijay jawalkar
rohit vijay jawalkar

जीवनाच्या प्रवासात धावत असताना भूतकाळातून अनुभव घेऊन आपण प्रवास करत राहिला पाहिजे. जर आपण तसे करत नसू तर आपण येणाऱ्या भविष्यावर अन्याय करतो. कारण येणारा भविष्यकाळ हा त्याच्या भविष्यातील भूतकाळाच असतो. प्रत्येकाचा भूतकाळ संपूर्ण वाईटच असतो असे नाही किंवा पूर्णपणे चांगलाच असतो असेही नाही. प्रत्येकाचा भूतकाळ हा त्याचा वैयक्तीक इतिहासच असतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

भूतकाळाला भूतकाळ का म्हणतात? हा प्रश्न मनात आला तेव्हा एक उत्तर असेही मिळाले की, हा जो भूतकाळ आहे तो एखाद्या भूताप्रमाणे आपल्यामागे लागलेला असतो. कदाचित माणसाच्या नैराश्याचे हे सुद्धा एक कारण असावे. कारण सद्यस्थितीत बहुसंख्य तरुण-तरुणी, प्रौढ मंडळी आणि आतातर लहान मुले सुद्धा नैराश्य (depression) नावाच्या आजाराने अधिकाधिक ग्रसीत होत चालले आहेत. माझ्या मते हा कोणता आजार नसून मनाची एक अवस्था आहे. आपले मन एकतर भविष्यात होणाऱ्या गोष्टींची चिंता करत वेळ घालवत असते किंवा भूतकाळात घडलेल्या वाईट घटनांची आठवण करून दुःखी राहत असते. यामध्ये बिचारा भरडला जातो तो आपला वर्तमान. आपण वर्तमानकाळात जगत तर असतो पण आपण वर्तमानात नसतो. आपले मन हे भूत भविष्यात चरैवेती चरैवेती करत असते.

नैराश्येवर आता उपाय काय? लोक म्हणतात मनावर ताबा ठेवा. मनाला नियंत्रित करा, पण या मनाचे गणितच वेगळे असते. तर काही लोक म्हणतात, "मी, माझ्या मनाचा राजा आहे" हे ऐकून अगदी हसू येते. जो मनाचे आदेश ऐकतो तो मनाचा राजा कसा होईल? येथे तर आदेशाचे पालन करणारा गुलाम आणि आदेश देणारा मन राजा ठरतो. नैराश्याचे उपाय सांगायचे झाले तर काही अवघड नाही. स्वतःसाठी काही वेळ द्या. त्या वेळेत व्यायाम, प्राणायाम, योग, खेळ, चालणे, धावणे, ध्यान किंवा कोणताही शारीरिक क्रियाकलाप करा. हे सर्वच सांगतील. पण, माझ्या मते हा नैराश्यनामक आजार हा मनाच्या आणि शारीरिक निष्क्रियतचे लक्षण. हेच जीवघेण्या व्यसनांचे निमित्त बनते व लोक त्याच्या आहारी जाऊन स्वतःचे व कुटुंबाचे स्वास्थ्य खराब करतात. ज्याच्याकडे करण्यासाठी काही नसते किंवा करण्याची इच्छा नसते. हा त्यांचा आजार. त्यामुळेच आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाची आपली दोनच ध्येये असावी.
 
ज्ञानयोग - मला काहीतरी शिकायचे आहे. नवनवीन चांगल्या गोष्टी जाणून घ्यावयाच्या आहेत. मग त्या टीव्ही, इंटरनेट, पुस्तके, वृत्तपत्रे किंवा कोणत्याही माध्यमातून प्राप्त करायच्याच आहे. मुळात काहीतरी नवीन जाणून घायची जिज्ञासा हेच माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण आहे.
आणि दुसरे म्हणजे
कर्मयोग- स्वतःला कामात मग्न ठेवा आणि तुम्ही गीतेतील हा श्लोक ऐकलाच असेल,
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि "

हाच श्लोक ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी संगीतला आहे
"परी कर्मफळी आस न करावी।आणि कुकर्मी संगती न व्हावी।हे सत्यक्रियाची आचरावी। हेतुविना।।

म्हणजेच जी व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करते तिच्या मनाची स्थिती सुख-दुःखातही एकसारखी असते. ती व्यक्ती विजयाच्या आनंदात अहंकारी होऊन जात नाही तर तीव्र दुःखात सुद्धा भावनाविवश होऊन कोसळून जात नाही. अशा स्थितीला 'स्थितप्रज्ञता' म्हणतात. अशी व्यक्ती स्थिर (stable) असते. या गुणाची समाजात जेवढी कमतरता आहे त्याहून अधिक त्याची आवश्यकता आहे, समाजाला समृद्ध आणि सुखी बनविण्यासाठी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com