पदासाठी वेडावलेले कारण...

सुप्रिया हरमळकर
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

सत्तेच्या सारिपाटाचा सामान्य जनतेला खरोखर उबग आला आहे. जनतेच्या प्रश्‍नावर राजकीय पक्षांनी एकी दाखवावी.

सत्तेच्या सारिपाटाचा सामान्य जनतेला खरोखर उबग आला आहे. जनतेच्या प्रश्‍नावर राजकीय पक्षांनी एकी दाखवावी.

यंदाच्या निवडणुकांमधून एक कथाच तयार झाली असं म्हणायला हरकत नाही. आत्तापर्यंत संगीत खुर्ची हा खेळ बघितला होता. पण, आता जो मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा खेळ पाहिला, तो संगीत खुर्चीपेक्षाही गमतीदार. गेल्या २० ते २५ दिवसांमध्ये जे काही चाललं आहे ते आपण सगळेच बघत आहोतच. सगळं येऊन एका खुर्चीसाठी थांबलं आहे. माझ्या (सामान्य माणसाच्या) विचाराने, माझ्या राज्याचा मुख्यमंत्री हा एक असा मनुष्य जो रयतेची काळजी करतो, युक्ती आणि शक्तीची सांगड घालून राज्यकारभार करतो, विवेक आणि बुद्धीचा योग्य वापर करून, जनमानसात राहून आपली जबाबदारी पूर्ण करतो. शेतकरी खूश तर राज्य खूश, असा विचार करतो. असा एक समज होता आणि हे विचार मनात ठेवूनच मी मतदान करते. पण, आत्ता जे चाललं आहे ते बघता, मला तरी वाटत नाही हे गुण यांच्यापैकी कोणाजवळही आहेत. ‘सब घोडे बारा टक्के’ ही विंदा करंदीकरांची कविता आठवते. सत्ता इतकी महत्त्वाची का असते हे आज समजत आहे. चार महान पक्ष सध्या ज्या तळमळीने आपल्या मुद्द्यांवर अडून आहेत, तसे जनतेच्या प्रश्‍नांसाठी अडून राहतील का? सत्ता स्थापन करण्यासाठी आपली मूल्ये, केलेले निश्‍चय, बुद्धी, विचार आणि जनतेला दिलेली आश्‍वासने हे सगळं त्या खुर्चीच्या खाली टाकून त्यावर जर तुम्ही बसत असाल, तर काय उपयोग अशा सत्ता आणि शक्तीचा? राज्यात ओला दुष्काळ आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पावसासारखे पाणी साचले आहे. म्हणून या बळिराजासाठी तरी हे लवकर थांबवा अशी विनंती. ज्या पदासाठी इतकी रस्सीखेच चालली आहे, त्या पदाचे गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये असावेत हीच इच्छा. नाही तर आपले मुख्यमंत्री कोण हा फक्त ‘जनरल नॉलेज’चा प्रश्‍न बनून राहू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by supriya harmalkar