भावाचा पुनर्जन्म

muktapeeth
muktapeeth

ही घटना पंचेचाळीस वर्षापूर्वींची आहे. मला मात्र ती कालच घडल्यासारखे वाटते आणि अंगावर काटा येतो.

मी त्या काळी बँक आँफ महाराष्ट्रमध्ये नगरला नोकरीस होतो. कोपरगाववरून नगरला बदलून आलो होतो. आई, दोन भाऊ आणि मी नगरला राहत होतो. धाकटा भाऊ श्रीपाद ऊर्फ आनंदा याला नोकरी नव्हती. खूप प्रयत्न करून तो दमून गेला होता.
एका नोकरीच्या मुलाखतीसाठी तो औरंगाबादला जाऊन आला, काम झाले नाही त्यामुळे त्याला आणखी नैराश्य आले. रात्री आमचे सगळ्यांचे जेवण झाले. मी चक्कर मारून येतो, असे आईला सांगून तो बाहेर पडला. रात्री ११च्या सुमारास घरी आला. मी झोपलो होतो. आईने दार उघडून त्यास आत घेतले आणि तोपण झोपला. रात्री दोनच्या आसपास उठला, आईला उठवलं म्हणाला, ‘‘मला त्रास होतो आहे, मी डायझन (विषारी औषध) घेतले आहे. मला जगायचे नव्हते, आता मात्र मला जगायचे आहे.’’ आई घाबरली ताबडतोब मला उठवले. भावाची अवस्था गंभीर होत चालली होती. मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना बोलावून आणले. त्यांनी तपासले तोंडाचा वास येत होता. पॉयझन केस असल्यामुळे त्यांनी ताबडतोब सरकारी दवाखान्यात ॲडमिट करण्यास सांगितले.

नगरसारख्या गावात त्या काळी रात्री रिक्षा मिळणे अवघड. कशी तरी रिक्षा पकडून आम्ही सरकारी दवाखाना गाठला. पोलिस चौकशी जाबजबाब वगैरे करून दवाखान्यात उपचार सुरू झाले. पोटातील विष काढण्यासाठी भावाला उलट्या होण्यासाठी औषध दिली. त्याला उलट्या होऊन बऱ्यापैकी विष बाहेर पडले, मात्र पोटातील सर्वच बाहेर पडल्यामुळे भाऊ खूप थकला आणि त्याचा रक्तदाब बराच खाली आला. त्याला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी एका तासाच्या आत त्याला पुण्यास हलविण्यास सांगितले. मी डॉक्टरांना म्हणालो, ‘‘अहो, स्पेशल टॅक्सी केली तरी एका तासात पुण्याला आम्ही कसे पोचणार. अशक्य आहे, तुम्हीच काही तरी करा.’ डॉक्टर म्हणाले, ‘बूथ हॉस्पिटलमधील रेस्पीरेटर मशीन सुरू असेल तर तुमचा भाऊ वाचेल आपण फोन करू.’

डॉक्टरांनी फोन लावला, मीच फोनवर बोललो भावाला ताबडतोब बूथ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. रेस्पीरेटर मशीनद्वारे उपचार सुरू झाले. आठ दिवसांच्या उपचारानंतर मरणाच्या दारातून भाऊ परत आला होता. याचाच आम्हाला आनंद होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com