होलोंगापार

muktapeeth
muktapeeth

माणसाच्या आक्रमणाने जंगल आक्रसत चालले आहे. त्यातच विमानतळ झाले तर तेथील पशू-पक्ष्यांनी जायचे कुठे?

वाचनात आले की ‘होलोंगापार विमानतळ होणार आहे’, तेव्हा मागच्या डिसेंबरमध्ये होलोंगापार गिबन्स अभयारण्यात गेलो होतो, त्याची आठवण झाली. गिबन जातीच्या माकडांसाठी हे विशेष अभयारण्य जपले आहे. त्याआधी मी गिबन्सना फक्त प्राणिसंग्रहालयात पिंजऱ्यांमध्ये पाहिले होते. त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहण्याचा योग या अभयारण्यात फिरताना आला. आसाममधल्या जोरहाटजवळ हे अभयारण्य आहे. १९९७ मध्ये ८.१ चौरस मैलांचे जंगल त्यांच्याकरिता राखीव ठेवले गेले. ‘होलोंगा’ नावाच्या उंचच उंच झाडांचे ते एक दाट जंगल आहे. काही झाडांची उंची तर ९८ फूट किंवा त्यापेक्षाही उंच आहे. गिबन एकदम लाजराबुजरा प्राणी आहे. जरा कुणाची चाहूल लागली, की अगदी उंच टोकावर जातो. हा प्राणी खाली जमिनीवर सहसा कधीच येत नाही. झाडांची फळे, पाने व त्यातील ओलावाच त्याला पुरतो. भारतात गिबन फक्त इथेच आहेत. गिबनचे लांब हात-पायच त्यांना एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झोके घेत लीलया जायला मदत करतात.

लहान पिले पांढरट-पिवळट रंगाची असतात. आईला चिकटून असतात. मोठी झाल्यावर त्यांचा रंग गडद काळा-तपकिरी होतो. या जंगलातच गिबनशिवाय इतरही प्राणी, पक्षी आहेत. त्यात माकडांचेच बरेच प्रकार आहेत. ऱ्हीसस, पिग टेल्ड, स्टंप टेल्ड, लंगूर इत्यादी. हत्ती, वाघ, बिबटे, रानडुक्कर, जंगली मांजरीही येथे आहेत. त्याशिवाय चार प्रकारच्या खारी, तीन प्रकारची सिव्हेट (अंगावर ठिपके असलेला मांजराच्या जातीचा प्राणी), बरेच पक्षीही आहेत. या अभयारण्याच्या आसपास चहाचे मळे आहेत. तिथे काम करणाऱ्यांची वस्ती वाढते आहे. या वस्तीतील लोक लाकूडफाटा व पाळीव जनावरांसाठी चारा नेतात. हत्तींच्या येण्याजाण्याच्या मार्गावर असलेल्या रेल्वेमार्गावर हत्ती दगावतात. या सगळ्या कारणांनी जंगल आक्रसत चालले आहे. त्यातच जर विमानतळ झाले, तर गिबन्सनी व इतर पशुपक्ष्यांनी जायचे कुठे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com