माझी सखी

विजया साठे
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

ध्यानीमनी नसताना अनपेक्षित काही तरी समोर येते आणि उगाचच ताण येतो. त्याचवेळी धीराचा हातही पुढे येतो.

ध्यानीमनी नसताना अनपेक्षित काही तरी समोर येते आणि उगाचच ताण येतो. त्याचवेळी धीराचा हातही पुढे येतो.

मी गावाहून घरी आले तर दारातच पत्र पडले होते. त्याच दिवशी दुपारी बारापर्यंत गावाहून पाहुणे येणार होते. मी काळजीतच पडले. आता तर नऊ वाजले. याच्या पुढे माझे आवरून स्वयंपाक कधी होणार? एवढ्यात दारावरची बेल वाजली. मी जरा रागानेच ‘आता कोण आले?’ असे म्हणत दार उघडले. दारात माझी सखी उभी होती. माझा त्रासलेला व काळजीचा चेहरा बघून तिने विचारले, ‘‘काय वं बाई? बरंबिरं नाही का काय? आताच येताय वो गावाहून? दमलेल्या दिसताय.’’ मी म्हटले, ‘‘सखूबाई, हे पत्र वाच म्हणजे तुला कळेल.’’ पत्र आपल्याला नीट वाचता येईल की नाही हा प्रश्‍न मला तिच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसला. परंतु त्या बरोबर मी तिला लिहायला वाचायला शिकविल्यामुळे आलेला आत्मविश्‍वासही तिच्या चेहऱ्यावर पाठोपाठ प्रगट झाला. अडखळत का होईना तिने वाचलेले पत्र ऐकून आपल्या श्रमाचे सार्थक झाले असे वाटले. माझा ऊर आनंदाने भरून आला.

‘‘बाई, यात काळजी करण्यासारखे काय आहे? मी आहे की तुमच्या मदतीला!’’ ती म्हणाली. ‘‘अगं, पण तुला तुझी काम नाहीत का?’’ सखूबाईचं उत्तर तयारच होतं. म्हणाली, ‘‘काही काळजी करू नका. माझी थोरली लेक आलिया माहेरपणाला. तिला पाठविते बाकीच्या कामावर. तुमी तुमचं आवरून घ्या, तवर मी लेकीला निरोप देऊन येताना दूध, भाजी घेऊन येते.’’ मला एकदम हायसे वाटले. माझी अंघोळ होईपर्यंत सखूबाई दूध, भाजी घेऊन आली. आल्या आल्या तिने कणीक भिजवली. भाजी चिरली. केर काढून फरश्‍या पुसल्या. घर सगळे आवरून पातळ मऊसूत पोळ्यासुद्धा केल्या. तिच्या मदतीचा उत्साहभरा हात पुढे आला आणि बारा वाजेपर्यंत स्वयंपाक तयारही झाला. आता कधीही पाहुणे पोहोचू देत. ताण सरला आणि मी म्हणाले, ‘‘सखूबाई, आता जेवून जायचं हं आणि जाताना तुझ्या लेकीला शिरापण घेऊन जा. तिला गोड खावंसं वाटतंय ना?’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vijaya sathe