आजींचा आनंद

वृंदा भालेराव
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

वारकऱ्यांना पिशव्या शिवून देण्यात आजींना आनंद मिळतो. त्या ऐंशीव्या वर्षीही सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे मोलाचे.

वारकऱ्यांना पिशव्या शिवून देण्यात आजींना आनंद मिळतो. त्या ऐंशीव्या वर्षीही सकारात्मक दृष्टीने पाहतात, हे मोलाचे.

आयुष्यात अनेक लोक भेटतात. काही आनंद देऊन जातात. काही स्फूर्ती देऊन जातात. तर काही नैराश्‍य, दुःख देऊन जातात. काही लोक हसत हसत जगायला शिकवतात, तर काही रडत रडत जगत असतात. मंगेश पाडगावकरांच्या शब्दांत सांगायचे, तर आपणच आपले ठरवायचे असते कसे जगायचे? हसत हसत का रडत रडत! आयुष्याच्या संध्याकाळी काही ना काही आजार होतच असतात. पण त्याचा स्वीकार करून नवीन परिस्थिती शिकून दुसऱ्यांना आनंद द्यायला शिकले पाहिजे. खाडिलकर आजी आमच्याच इमारतीत माझ्याच इथे खालच्या मजल्यावर राहणाऱ्या. रोज येता जाता बोलत असतात. काय कसे काय, कसे आहे वगैरे. पण एक दिवस त्या म्हणाल्या, ‘‘तुम्हाला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. येऊ का?’’ मी लगेच ‘हो’ म्हटले. त्यांची जगण्याकडे पाहण्याची दृष्टी मला आवडली, भावली आणि सांगावीशी वाटली म्हणून होकार भरला.

महाराष्ट्रामध्ये वारीला अतिशय महत्त्व आहे. लाखो लोक वारीला जात असतात. पावसापाण्याची पर्वा न करता. एकाच ध्येयाने प्रेरित होऊन पंढरीच्या भेटीसाठी जात असतात. पंढरपूरला जाणारे वारकरी माउलीच असतात. वारी ज्या ज्या गावात जाते त्या त्या गावात मदतीचा ओघ येत असतो. पुण्य कमविण्याचा भाव पांडुरंगाने दर्शन घेतल्याचे समाधान. अशाच एका वारीच्या पुणे मुक्कामी खाडिलकर आजी दर्शनासाठी थांबल्या होत्या. तेवढ्यात त्यांचे लक्ष एका माउलीकडे गेले. त्या हातातल्या सर्व वस्तू सांभाळण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्याच वेळेस आजींना वाटले, की आपण यांना पिशव्या स्वतः शिवून द्याव्यात. कल्पना सुचली आणि अमलातही आणली. पाचदहा, वीस-पंचवीस करता आजींनी त्या वर्षी पाचशे पिशव्या शिवून वारकऱ्यांना वाटल्या. जुने कपडे, चादरी यांचे अस्तर लावून त्या वेगवेगळ्या आकाराच्या पिशव्या शिवतात. ऐंशीव्या वर्षी आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणाऱ्या आजींना माझा सलाम.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vrunda bhalerao