शिक्षणाची आच

muktapeeth
muktapeeth

कोकणातून आलेले नाना स्वतः कष्टाने शिकलेच; पण आयुष्यभर इतर गरीब होतकरू मुलांना शिक्षणासाठी मदत करीत राहिले.

नाना म्हणजे अच्युत अनंत गोखले. मूळचे अलिबागचे. कोकणात शिक्षणाची सोय नव्हती, म्हणून पुण्यात आले. कष्टाने शिकले. मराठीमध्ये पदवी मिळवली. स्वतःचे शिक्षण पूर्ण झाल्यावर होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैशाची मदत करू लागले. काही वेळा त्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय आमच्याच घरी असे. गोव्यात राहात असताना तेथील सावंत कुटुंबाशी मैत्री झाली. त्यांची मुलगी गुलाब हिला पुण्यात आणून एसएनडीटी महाविद्यालयात पाठवले. त्या काळात अशी पदवी मिळवणे स्त्रियांसाठी अवघड होते. आमची आई मंगला गोखले लग्नाआधी मॅट्रिक उत्तीर्ण झाली होती. तिने पुढे शिकावे यासाठी नानांनी आग्रह धरला. आईनेही घर-संसार सांभाळत इंग्रजी विषयात पदवी मिळवली. नाना तिला अभ्यासात मदत करायचे. नानांनी स्वतः तिला इंग्रजी शिकविले. बीए झाल्यावर बीएड पदवी घेण्यासाठीही उद्युक्त केले. तिला नानांनी नोकरी करण्यास पाठिंबा दिला. तिला नोकरीसाठी लांब पाठविणारे नाना खरेच काळाच्या मानाने पुढचा विचार करणारे होते.

नाना मुद्रितशोधनाचा व्यवसाय करीत. वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांनी हा व्यवसाय उत्तम केला. त्यांच्यामुळे आम्हालाही खूप पुस्तके वाचावयास मिळाली. त्या वेळी वसंतराव पटवर्धन यांचे "आर्य चाणक्‍य' हे पुस्तक वाचल्याचे अजूनही आठवते. आमच्या बालमनावर पुस्तकांचे योग्य संस्कार झाले. बाबांनी वृत्तपत्र कसे वाचावे हे शिकवले. इतकी साधी गोष्ट पद्धतशीर कशी असते हे त्यांच्यामुळे कळले. वाचनामुळेच त्यांची राहणीसुद्धा टापटिपीची असे. पांढरेशुभ्र इस्त्रीचे कपडे, नेहमी प्रसन्न चेहरा, यामुळेच बहुतेकदा समोरची व्यक्ती आश्‍वस्त होत असे. प्रत्येक जण त्यांच्याशी संवाद साधून आपली समस्या मोकळेपणे मांडत, सोडवून घेत असत. नाना व्याख्यानांचे चाहते होते. पुण्यात मोठमोठ्या व्यक्तींची भाषणे त्या काळी होत असत. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ असल्याने मोठमोठ्या नेत्यांची भाषणे होत. या भाषणांनाही नाना आम्हाला नेत असत. सावरकरांचा त्यांच्यावर प्रभाव होता. या प्रभावातूनच नानांनी देशप्रेम, काटेकोर नियोजन, साधी राहणी, कोणत्याही गोष्टीचे अवडंबर न करणे, हे गुण अंगीकारिले होते. त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने सगळ्या आठवणी दाटून आल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com