वाचण्याचं माध्यम

डॉ. अपर्णा महाजन
शनिवार, 20 एप्रिल 2019

वाचनाला कोणताही अडसर नसावा. माध्यमाचा तर अजिबात अडसर नसावा. वाचणे महत्त्वाचे.

वाचनाला कोणताही अडसर नसावा. माध्यमाचा तर अजिबात अडसर नसावा. वाचणे महत्त्वाचे.

एका चर्चासत्रामध्ये साठीच्या आसपासचे एक प्राध्यापक हातात पुस्तक घेऊन वाचणे हे कसे विशेष आहे याबद्दल बोलत होते. त्यांना किंडल, अँड्रॉईड, स्मार्ट फोन या माध्यमांपेक्षा पुस्तक हे अर्थातच जवळचे वाटत होते. काचेखालची अक्षरे पाहताना दुरावा वाटतोच. स्काईपवर बोलताना नातवंडांच्या डोक्‍यावरून हात फिरवताना, केसांचा मऊ स्पर्श, त्याचा पापा घेताना, गालाचा लुसलुशीतपणा जाणवत नाही. तसेच किंडल वर वाचणे आणि पुस्तक वाचणे आहे असे ते कळकळीने सांगत होते. पंचविशीतली एक मुलगी उठली आणि तिने विचारले, ""सर, पुस्तक काय किंवा किंडल काय, शेवटी ती माध्यमे आहेत. आम्ही डिजिटलायझेशनच्या काळात वाढलोय. त्याची जन्मापासून सवय झालीय. वाचायला मलाही आवडते. तुमच्या बोलण्यामुळे मला माझे काही चुकलेय का असे मनात आले म्हणून...'' तिच्या अर्धवट सोडलेल्या वाक्‍यामुळे मी या माध्यमाच्या पिढीतल्या अंतराबद्दल विचार करू लागले. पुस्तक वाचणाऱ्या पिढीच्या प्रत्येकाला पटेल त्या सरांचे म्हणणे. कारण लहानपणापासून सगळे पुस्तक हातात धरूनच मोठे झालेत. त्याचा स्पर्श, त्याच्यावरच्या आपण अधोरेखित केलेल्या खुणा, दुमडलेले पान या साऱ्यामुळे पुस्तक "आपले' झालेले असते. तेच पुस्तक दुसऱ्याचे असले तरी त्याला परका स्पर्श जावतो. किंडल या यांत्रिक माध्यमाची या पिढीला इतकी सवय नाहीय. पण वाचण्याचा संबंध आशयाशी आहे, माध्यमाशी नाही. ते सहज नैसर्गिक असायला पाहिजे. अगदी झोपेइतके शब्दांचे आकर्षण, त्याची ओढ एकदा वाटली की आपोआप आपण पुस्तके वाचू लागतो वेडेपिसे होऊन. आणि हेच वाचन आपल्याला अनुभवसमृद्ध करते. विचार करायला, जगायला आयुष्यात येणाऱ्या संकटांना तोंड द्यायला शिकवते. संवेदनशीलता आतून हलून जाण्याची क्षमता फक्त वाचनातूनच निर्माण होते. एखाद्या पात्राशी एकरुप होणे, वाचताना भान हरपणे या गोष्टी अनुभवायच्याच असतात. त्याचे वर्णन करून नाही समजत. त्यामुळे वाचनाला कोणताही अडसर नसावा. ते मुक्त असावे, वाचनासाठी बाकी सारे दुय्यम आहे. वाचणे महत्त्वाचे.

Web Title: muktapeeth article written by dr aparna mahajan