देण्यातील आनंद

शुक्रवार, 21 जून 2019

"घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे,' असे विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे. देण्यातच खरा आनंद असतो.

"घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे,' असे विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे. देण्यातच खरा आनंद असतो.

माझी नात नूपुर सध्या अटलांटाला असते. ती शाळेत शिकत असताना काही दिवस आमच्याकडे येत असे. ती पाचवी-सहावीत असेल, त्या वेळचा एक प्रसंग माझ्या नेहमीच लक्षात राहिला. माझा मित्र शेख दुबईत असतो. त्याचे दंतवैद्याकडे काही काम होते म्हणून तो मुंबईला आला होता. तो म्हणत असे, की वैद्यकीय सेवा दुबईत फार महाग असते. त्या ऐवजी भारतात येऊन जाणे परवडते. शेख हा आमचा "फॅमिली फ्रेंड' आहे. तो मुंबईत आला की पुण्याला घरी येत असे. असाच एकदा तो पुण्याला आमच्याकडे आला होता. येताना नूपुरसाठी चॉकलेटचा एक डबा घेऊन आला होता. नूपुर घरीच होती. तिच्या शेख काकाने तिला चॉकलेटचा डबा दिला. तिने वाकून नमस्कार करून तो डबा घेतला. हे मला अपेक्षितच होते. पण पुढच्या पाच मिनिटांत तिने डबा उघडला व खोलीत बसलेल्या प्रत्येकाच्या पुढे केला... सर्व जण म्हणत होते, की तुझ्यासाठी चॉकलेट्‌स आणली आहेत. परंतु माझ्यासकट सर्वांपुढे डबा करत तिने एक -एक चॉकलेट घ्यायला लावले.

मी नूपुरला म्हणालोही, 'काय हे?'' तर ती एकदम म्हणाली, 'आबा, धिस इज अ जॉय ऑफ गिव्हिंग.' मला सुखद धक्का बसला. ही चिमुरडी मला सांगत होती, जॉय ऑफ गिव्हिंग. म्हणतात ना, बालादऽपि सुभाषितानी तत्‌ ग्राह्यम्‌ | मला तिचा खूप अभिमान वाटला. खरे तर डबा घेऊन पळून जाण्याचे तिचे वय होते. आपल्या सर्वांच्याच जीवनात समृद्धी आणणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे, देण्यातला आनंद. जीवनात हा निर्मळ आनंद सहज मिळवू शकतो. कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून इंजिनियर झालेल्या शायरी शहा हिने आपला पहिला संपूर्ण पगार सामाजिक कार्यासाठी दिला, असे नुकतेच वाचले. तिनेही हा देण्यातला आनंद शोधला. नवीन पिढी केवळ स्वतःचा विचार करते, असे कोण म्हणेल? देण्यातला आनंद मिळवण्यासाठी कोणताही अडसर तुम्हाला आड येत नाही.