खोबऱ्याची वाटी

कल्पना देशपांडे
शुक्रवार, 10 मे 2019

सुटीत दिवसभर मुले टीव्हीसमोर किंवा मोबाईलवर गेम खेळत बसतात. त्याऐवजी त्यांना गुंतवणारे काम दिले तर?

सुटीत दिवसभर मुले टीव्हीसमोर किंवा मोबाईलवर गेम खेळत बसतात. त्याऐवजी त्यांना गुंतवणारे काम दिले तर?

बेल वाजली. दारात चार-पाच छोटी मुले उभी. ""काकू, तुम्हाला नारळ हवे आहेत का? आमच्या बागेतील माडांचे नारळ आणि खोबऱ्याच्या वाट्या आहेत.'' प्रत्येकाच्या खांद्याला पिशवी होती. ""अरे, तुम्ही कुठून आलात?'' ""काकू, हे सगळे जण आमच्याकडे पाहुणे म्हणून आलेत. सुटी आहे ना!'' कोपऱ्यावरच्या बंगल्यातील निमिष खालच्या मजल्यावरून धापा टाकत येत उत्तरला. मला क्षणभर त्या मुलांकडे पाहून वाईट वाटले आणि त्यांच्या घरच्यांचा थोडा रागही आला. स्वतःच्या बागेतले नारळ, खोबऱ्याच्या वाट्या हे लोक मुलांना विकायला सांगतात. मी त्या मुलांना आत बोलावले. त्यांना सरबत दिले. मग मुले बोलायला लागील. ""काय रे नारळ कसे दिले आणि वाट्या?'' मी विचारले. नारळ वीस रुपयाला एक आणि खोबरे पंधरा रुपयाला अडीचशे ग्रॅम. ""अरे तुम्ही वजन कसे करणार?'' ""आमच्याकडे वजनकाटा आहे ना.'' एकजण उत्तरला. मी त्या मुलांकडून दोन नारळ आणि चार खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या. मुलांनी मला नारळ खोबरे दिले. अगदी व्यवस्थित हिशेब करून उरलेले सुटे पैसे "मी नको' असे म्हणत असतानाही दिले. एकाने वहीत नारळाचा वेगळा, खोबऱ्याच्या वाटीचा वेगळा असा हिशेब लिहिला. म्हणाले, ""बाळांनो, असे उन्हातान्हाचे नारळ विकायला बाहेर पडू नका.'' ""काकू आम्हाला ऊन नाही लागत. आम्ही हे नारळ कशासाठी विकतो आहे सांगू... मुंबईला आमच्या घराच्या बाहेर एका कुत्रीला सात पिले झालीत. त्यात दोन आजारी आहेत. हे नारळ विकून जे पैसे येतील ते आम्ही त्यांच्या औषधासाठी वापरणार.'' मुलांचे खूप कौतुक वाटले.

संध्याकाळी निमिषची आई भेटली. म्हणाली, ""सगळी भाचेकंपनी आली आहे. अगं, दिवसभर दंगा करतात. दिवस दिवस टीव्हीसमोर, नाहीतर कॉम्प्युटरवर गेम आणि अगदी काही नाही तर मोबाईलवर गेम खेळत बसतात. मग काय युक्ती शोधून काढली. मुलांना दिवसभर कशात तरी गुंतवायचे म्हणून हे नारळ-खोबरे विकायचे काम दिले. यातून श्रमाचे महत्त्वही मुलांना कळेल. स्वतः नारळ विकून कुत्र्यांचे औषधपाणी केल्याचा आनंद मिळेल. हिशेब लिहिणे, वजनमाप असा थोडासा व्यवहार कळेल.'' मला खूप आनंद झाला. सकाळच्या माझ्या विचाराबद्दलची लाजही वाटली.

Web Title: muktapeeth article written by kalpana deshpande