झाले मोकळे आवाज...

कांचन वसंत जाधव
शनिवार, 11 मे 2019

ऐकू येत नाही म्हणून ती एकटी पडली होती; पण तिच्या कानातील मळ काढला आणि ती फुलली.

ऐकू येत नाही म्हणून ती एकटी पडली होती; पण तिच्या कानातील मळ काढला आणि ती फुलली.

खाटपेवाडीत रुजू होऊन आठवडा झाला होता. लक्षात आले, चौथीतल्या प्रियांकाला इतर सामावून घेत नाहीत. मुलांची भांडणे म्हणून दुर्लक्ष केले. पण लक्षात आले, की सर्व जण तिच्याकडे दुर्लक्ष करायचे. गटकार्यात, उपक्रमात, खेळात तिला घेत नव्हते. अध्यापनादरम्यान झालेल्या विनोदांवर सर्व वर्ग खो-खो हसायचा; पण प्रियांकाच्या मिटलेल्या ओठांची रेष कोपऱ्यातून थोडीशीच पसरायची. मला तिचे चाचपडत वागणे, बुजलेल्या आवाजात अस्पष्ट बोलणे, सतत सतर्क असलेला चेहरा... सारे खटकायचे. शिकवीत असताना ती डाव्या हाताचा कोपर डाव्या मांडीवर टेकवून, चार बोटे डाव्या गालावर रोवून, उजवा गाल मला दाखवत, माझ्याकडे तिरप्या नजरेने पाहत माझे ऐकायची. मितभाषी प्रियांकाला कमी ऐकू येत आहे, जाणवल्यावर मी तिचे दोन्ही कान बारकाईने पाहिले. तिचा उजवा कान पांढरट मळाने पूर्ण बंद झाला होता. तिच्या मोठ्या बहिणीला बोलावून तिला कानाच्या दवाखान्यात नेण्याबद्दल सांगितले.
दररोज कामाला जाणाऱ्या, सकाळीच भाकरतुकडा बनवून सातला घर सोडणाऱ्या तिच्या आईने दोन-अडीच महिने झाले तरी तिला दवाखान्यात नेले नाही. शेवटी मीच एका रविवारी प्रशिक्षणात सांगितलेला "सॉलिवॅक्‍स इअर ड्रॉप्स' न विसरता घेतला. सोमवारी शाळेत पोचताच मी तिच्या उजव्या कानात दोन थेंब टाकले. पण दहा मिनिटांनी ती उठल्यावर थेंब जसेच्या तसे बाहेर ओघळले. शाळा सुटते वेळीही टाकले, पण पुन्हा तसेच झाले. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीही तसेच, पण तरीही औषध सलग टाकत राहिले. आता कानातून पातळ मळ येऊ लागला. औषध बंद केले. मऊ कापडाने मी तिचा कान पुसायचे. नाचकिनने कानाच्या पाळीच्या अगदी जवळ आलेला मळ काढताना जाणवले, की मळाचा खडा तिच्या कानात गोल-गोल फिरत आहे. मी तो मळाचा खडा अलगद, हळुवारपणे अक्षरशः ओढून काढलाच. चनेमने बोराच्या आकाराएवढा तो मळाचा चेंडू मी कागदावर ठेवला. ""मला मोठ्या आवाजात नीट ऐकू येतेय,'' असे प्रियांका म्हणाली. तिच्यासाठी सगळे आवाज मोकळे झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by kanchan jadhav