किल्ला-बिल्ली हरवली!

मीरा थेटे
शनिवार, 25 मे 2019

महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी मी बावरले होते. गोंधळले होते. त्यामुळे शब्दही गडबडले होते.

महाविद्यालयाच्या पहिल्या दिवशी मी बावरले होते. गोंधळले होते. त्यामुळे शब्दही गडबडले होते.

महाविद्यालयातील माझे पहिले पाऊल गांगरलेपणानेच पडले. एकदम मोकळ्या वातावरणात वावरणारे भावखाऊ कॉलेजकुमार आणि कॉलेजकन्या पाहता मी शाळकरी नवीन साडीचा लफ्फा सावरत प्रवेश करीत होते. आईने एक कंपास बॉक्‍स टाईप पर्स मला दिली. शाळेची धोपटी खांद्याच्या खुंटीवर अडकवून शाळेत जायची सवय. आता पर्सचे तंत्र जमेना. शेवटी मी ती सरळ पिशवीत टाकली आणि कोऱ्या करकरीत सायकलवरून महाविद्यालयात गेले. कोणी ओळखीचे नाहीत. मैत्रिणी नाही. प्रवेशद्वाराजवळील गोंगाटातून सायकल स्टॅंड गाठला धापा टाकतच. स्टॅंडवर सायकल लावली. स्टॅंडवरील शिपायाने बिल्ला दिला. नव्या सायकलीची नवी कोरी किल्ली आणि सायकलचा बिल्ला पिशवीत टाकला. एका मोठ्या हॉलमध्ये प्राचार्यांचे स्वागतपर भाषण झाले. माझा वर्ग पाहून आले. सुटले एकदाची असे माझे बावचळलेले मन म्हणत होते. पिशवीत हात घालून सायकलची किल्ली व स्टॅंडचा बिल्ला पाहू लागले. पण हाताला काही लागेना. मग कुठे गेली माझी "किल्ली आणि बिल्ला'?
महाविद्यालयाच्या आवारात, वर्गात, लेडिज रूममध्ये, पोर्चमध्ये जेथे जेथे गेले होते, तेथे सगळीकडे शोधाशोध केली. पण किल्ली आणि बिल्ला सापडेनाच. शेवटी सायकल स्टॅंडवरील शिपायापाशी आले, जरा घाबरतच विचारले, ""अहो, माझा किल्ला आणि बिल्ली हरवली हो. तुम्हाला आणून दिली का?'' शिपायाने विचारले, ""काय म्हणता, किल्ला अन्‌ बिल्ली?'' ""हो ना, अहो सापडली नाही तर माझ्या नवीन सायकलीचे कुलूप तोडावे लागेल आणि वडिलांची बोलणी तर खावीच लागणार.'' ""काय, एवढा मोठा किल्ला अन्‌ धावणारी बिल्ली?'' ""अहो सांगा ना, किल्ला अन्‌ बिल्ली कुणी आणून दिली का?'' मी अगदी रडवेली झाले होते. ""किल्ला अन्‌ बिल्ली'' असे म्हणत तो शिपाई सात मजली हसत होता. ""नक्की किल्ला व बिल्लीच ना!'' तो जेव्हा हातवारे करून शब्दांवर जोर देऊन म्हणाला, तेव्हा कुठे माझ्याकडून झालेली शब्दांची गडबड लक्षात आली. इतक्‍या वर्षांनीही मी ते आठवून हसत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by meera thete