आयुष्याची दोरी!

प्रीती शिरोडे
बुधवार, 15 मे 2019

पाइपात कुत्रीने सहा पिल्लांना जन्म दिला. उपाशीपोटी दोन दिवस तिथेच काढले. तिला बाहेर येता येत नव्हते की हालचालींना जागा नव्हती.

पाइपात कुत्रीने सहा पिल्लांना जन्म दिला. उपाशीपोटी दोन दिवस तिथेच काढले. तिला बाहेर येता येत नव्हते की हालचालींना जागा नव्हती.

सकाळची वेळ. फोन वाजला, एका सफाई कामगाराचा होता. तो म्हणाला, "ताई, परिहार चौकात लवकर या. थोडं काम आहे.'' मी लागलीच निघाले. तो सफाई कामगार एका उघड्या गटाराजवळ उभा होता. त्यातील एका पाइपात आतमध्ये नुकतीच जन्मलेली कुत्र्याची काही पिलं होती, तर पाइपाच्या दुसऱ्या टोकाला मधेच कुठेतरी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणारी त्यांची माउली. दोन दिवसांपासून सगळेच विचित्र अवस्थेत अडकलेले. मी लागलीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला. ते येईस्तोवर, तेथे जमलेल्यांच्या मदतीने एका वायरच्या साह्याने हुक तयार केला आणि पाइपच्या एका टोकाकडून आत सोडून आधी पाच पिल्लांना बाहेर काढले. पिल्लांना वाचवणे महत्त्वाचे होते. लगेचच एक दुधाची पिशवी मागवली, पेपर प्लेटमध्ये थोडे दूध आणि पाणी (कच्चे दूध बाधू नये म्हणून) घालून त्यांना प्यायला दिले. पिल्ले हालचाल करू लागली. आता पुढचे आव्हान होते. त्या पिल्लांच्या माउलीला त्या पाइपातून बाहेर काढणे गरजेचे होते. पण तिला पाइपातून ओढून काढणे अशक्‍य होते.

त्या कुत्रीला पाइपबाहेर कसे आणायचे? मनात विचार आला, तिची पिल्लेच तिला बाहेर यायची प्रेरणा देतील. त्या पाच पिल्लांना पुन्हा त्या पाइपाच्या तोंडाशी नेले. ती पुन्हा पाइपात जाणार नाहीत अशी तेथे ठेवली. त्या पिल्लांची चाहूल, त्यांच्या हाकेने ती बाहेर येईल, असे वाटले. म्हणून एक प्रयत्न आणि काय आश्‍चर्य! तिने तिच्या अंगात होती नव्हती ती सर्व ताकद पणाला लावली आणि ती माउली त्या पाइप बाहेर आली. खूप दमलेली होती. नुकताच पिल्लांना जन्म दिलेला, गेल्या दोन दिवसांपासून ना अन्न, ना पाणी, ना श्वास घ्यायला जागा. अंगात त्राण नव्हते. पुन्हा थोडे दूध, बिस्किटे मागवली. तिला थोडी ताकद आल्याचे जाणवले. आता परत निघावे असे वाटले, तितक्‍यात ती पुन्हा त्या पाइपाजवळ जाऊन घुटमळू लागली. पुन्हा आमच्याकडे नजर. त्या मुक्‍या प्राण्याची भाषा कळेना. आम्ही पुन्हा पाइपाजवळ. मोबाईलच्या विजेरीच्या उजेडात आत पाहिले, तर एक पिल्लू दूर अजूनही आत होते. त्यालाही बाहेर काढले. तशी ती माउली शांतपणे एका कोपऱ्यात जाऊन बसली.

Web Title: muktapeeth article written by priti shirode