भावकी

प्रा. कानिफनाथ उगले
मंगळवार, 18 जून 2019

भावकीत भाऊबंदकीच जास्त असा बहुतेकांचा अनुभव असतो. हे बदलायला हवे. त्यासाठी स्वतःमध्ये बदल घडवायला हवेत.

घोगरगावात पोलिसांची गाडी दिसली. चौकशी केली, तर भावकीतला वाद असल्याने पोलिस आल्याचे समजले. मनात विचार आला, भावकी म्हणजे आपलीच रक्ताची माणसे, आपले भाऊबंध. पण सगळीकडेच भावकीत अनेक प्रश्न आहेत. आमची भावकी चांगली आहे, असे म्हणणारे फार दुर्मीळ आहेत. आपल्याच रक्ताची माणसे एकमेकांशी एवढी विकृत का वागत असावीत? भावकीच्या वादात अनेक पिढ्या, घरे, घराणी लयाला गेली. हे बदलण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर त्याला दुबळा समजून त्रासच दिला जातो. कारण भावकीतील व्यक्तीला नमविण्यात एक वेगळाच अहंकार, गर्व दडलेला असतो, त्याच्याबद्दल मत व्यक्त करण्यात एक आसुरी आनंद असतो. दिवाणी खटले, फौजदारी गुन्हे, शेतजमिनीचे वाद यात भावकीच्या भांडणांचा क्रमांक नेहमी पहिला आहे. उत्पन्नाचा किती भाग यावर खर्च करतो, अल्प आयुष्यातील किती वेळ सत्कारणी लागतो आणि पुढच्या पिढीला आपण काय देतो, हे प्रश्न जरी स्वतःला आपण विचारले तरी आपल्यात बदल होऊ शकतो.

भावकीला बदलवणे जमणार नाही. बदल स्वतःमध्ये केला पाहिजे. धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका. भावकीशी बोलताना शक्‍यतो प्रतिहल्ला टाळा. क्रियेला प्रतिक्रिया टाळा. सूड घेणे टाळा, सर्वांत महत्त्वाचे भावकीची निंदा करणे सोडून द्या आणि दुसरा कोणी आपल्या भावकीची निंदा करत असेल तर ऐकून घेऊ नका आणि सहनही करू नका. कोणी साद घातली तर प्रतिसाद द्यायला विसरू नका. अडचणीच्या काळात मदतीचा हात स्वतः होऊन पुढे करा, हे सर्व खूप अवघड आहे; पण खूप गरजेचे आहे. भावकीतील वाद संपवणे हे मोठे काम, त्यासाठी आपण प्रयत्न करावेत. आमच्या पूर्वजांनी, संस्कृतीने अंतिम यात्रेत चार पैकी तीन खांदेकरी भावकीचे असावेत ही अट घातली आहे. कितीही भांडा, प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच होणार, हेही तितकेच खरे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written prof. Kanifnath Ugale

टॅग्स