एकेक पान गळावया... 

एकेक पान गळावया... 

चार-पाच दिवसांपूर्वी हिरवंगार होतं हे झाड. पानांनी सळसळणारं. चैतन्याचं वारं अंगभर खेळवणारं. वारा आला की पानं एकमेकांवर वाजून कानांना सुखावणारा आवाज यायचा. "पायरव'सारखा "पानरव' असं म्हणायचा माझा दोस्त या आवाजाला. त्याचं हिरवेपण अंतःकरणात उतरून यायचं. उन्हाळ्यातली भगभगीत दुपार विसरायला व्हायचं. दिवसभराचा थकवा उत्साहात रूपांतरित व्हायचा. मधल्या काही दिवसांत इमारतीच्या टेरेसवर जाणं झालंच नाही. आज आलो तर ही स्थिती. झाडाखालच्या इमारतीवर पानं झडून पडलेली. मातकट रंगाच्या पानांचा खच पडलेला. काही पिवळसर पानं अजूनही डहाळ्यांवर हट्टानं लटकून असलेली. वृक्षांचे शेंडे ओरबडून काढल्यासारखे झालेले. केवळ काटक्‍या उरलेल्या. झाडांचा सतेजपणा लोपलेला. जणू या करपट उन्हांनं त्याचं रसरशीतपण पिऊन टाकलेलं. 
झाड पानगळीला सामोरं जात असलेलं. त्याचं प्रत्येक पान सजीवाच्या तीनही अवस्थांतून जात असलेलं. वर्षभरापूर्वी झाडावरचं प्रत्येक पान उत्पत्तीस आलेलं. नंतर विविध स्थितीतून गेलेलं. आता लयाला जात असलेलं. म्हणजे मरणच. पण, झाडाला पुन्हा उत्पत्तीचं वरदान मिळालेलं. कात टाकल्यासारखी जुन्या पानांची वस्त्रं त्यागणाऱ्या झाडाला आता पुन्हा नवपालवी फुटणार. तांबूस कोवळी पानं डोकावणार. मूल जन्माला यावं तसा हा जन्मसोहळा. माणूस गाजावाजा करतो. झाडंही करत असावीत. पण, माणसांना ती भाषा कळत नाही. पक्षी मात्र त्या आनंदात सहभागी होत असावेत. झाडं आणि पक्ष्यांइतकं सख्य अन्य कुणाचंच नसावं बहुधा. पान तुटताना त्याचा शेवटचा श्‍वास पक्ष्यांनाच ऐकू येत असावा. जिवाभावाचा हात निसटल्यासारखं पक्ष्यांना वाटत असावं. एकमेकांकडे बोललेली सुखदुःखं त्यांना आठवत असावीत. आठवणींची पानं त्यांच्या मनात फडफडत असतील. आपल्या पंखावर फिरलेल्या पानांचे क्षण पक्ष्यांना व्याकूळ करत असतील. आईच्या पंखानंतर इतका मायाळू स्पर्श त्यांना क्वचितच होत असावा. पिंपळपानांच्या सावलीतला प्रत्येक क्षण त्यांच्या डोळ्यांपुढे तरळत असावा. पाखरांबरोबर मलाही गहिवरून येतंय आतून या उजाड झाडाकडे पाहताना. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com