सासुरवाडीची माया

शाल्मली सरदेसाई
शनिवार, 29 जून 2019

सासुरवाडीला येतानाच सुनांना सासूंची भीती वाटायला लागावी अशी परंपरा होती. पण आता सुनांना सांभाळून घेणाऱ्या सासूबाई भेटत असतात.

सासुरवाडीला येतानाच सुनांना सासूंची भीती वाटायला लागावी अशी परंपरा होती. पण आता सुनांना सांभाळून घेणाऱ्या सासूबाई भेटत असतात.

लग्न होऊन मुंबईहून पुण्यात आल्यावर सर्वच नवीन होते. लग्नाआधी मी नोकरी करत होते. सासूबाईंनी मला म्हटले, नवीन काहीतरी शिक म्हणजे त्याचा तुला उपयोग होईल. मी काही कोर्सेसची चौकशी करत असतानाच नोकरीचा योग आला. नोकरदार स्त्रियांना घराची आणि कार्यालयाची जबाबदारी सांभाळावी लागते. दोन्ही गोष्टींचा मेळ साधणे कठीण जाते. सासूबाईंनीही त्यांच्या लग्नानंतर अशी कसरत केली होती. त्यामुळे त्यांनी माझ्यावर अशी वेळ येऊ दिली नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आपल्याला आईच महत्त्वाची वाटत असते. मनातले सारे काही सांगायचे ते आईला. आमच्या सासूबाईदेखील मला आईसारखीच माया लावतात आणि कधी कधी आमच्या भल्यासाठी आईसारख्या रागावतातही. कधी कधी काही गोष्टी पटत नाहीत. परंतु त्या अशा पटवून देतात की आपोआप पचनी पडतात.

मी कुठल्याही प्रकारची व्रतवैकल्ये, उपवास करावेत हा त्यांचा आग्रह नाही. आपल्याला जसे जमेल तसे करावे हे त्यांचे कायम सांगणे असते. फक्त सकाळी लवकर उठून सर्व कामे पटपट उरकून आपापल्या कामासाठी मार्गस्थ व्हावे हा एकमेव हट्टाग्रह असतो. त्या अत्यंत शिस्तप्रिय. त्यामुळे गडबड, बेशिस्त, वेळ न पाळणे याचा मनापासून राग. एखादी गोष्ट आवडली नाही की स्पष्ट बोलून दाखविणे हा एक गुण. तसेच त्यांना वाचनाची व शास्त्रीय संगीताची खूप आवड आहे. त्यांच्या नीटनेटकेपणाचा, शिस्तीचा मला फायदा झाला. थोडक्‍यात त्यांना "मॅनेजमेंट गुरू' म्हणायला हरकत नाही. उद्या करावयाच्या कामांची यादी आदल्या रात्रीच तयार असते. घरातल्या वाणसामानाच्या डब्यांवरदेखील त्यांची नजर असते. त्याचे कसे नियोजन करावे, स्वयंपाकघर कसे सांभाळावे अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकले. थोडक्‍यात एका हातात मायेच्या उबेची तर दुसऱ्या हातात शिस्तीची काठी घेतलेल्या, काहीही नवीन करायला कायम प्रोत्साहन देणाऱ्या, अडचणींवर धैर्याने, मनाचा तोल ढळू न देता संयमाने कशी मात करायाची हे कृतीतून आम्हाला शिकविणाऱ्या, माया लावणाऱ्या...आईसमान सासूबाई.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by shalmali sirdesai