या वस्त्राने विणतो कोण?

सुरेखा सतीश निपसे
गुरुवार, 9 मे 2019

हातमागांच्या आवाजाच्या लयीत बालपण गेले. त्याचे ताणे-बाणे अजूनही प्रेरणा देतात.

हातमागांच्या आवाजाच्या लयीत बालपण गेले. त्याचे ताणे-बाणे अजूनही प्रेरणा देतात.

माझे माहेर पाथर्डीला. आम्ही कसबा पेठेत राहत होतो. माझ्या आजोबांचा साड्या विणण्याचा व्यवसाय होता. मोठ्या वाड्यामध्ये मागच्या बाजूला कारखाना व जोडूनच पुढे घर. पंधरा हातमागांवर साडी विणण्यासाठी बसलेले विणकर अजूनही आठवतात. पंधरापैकी फक्त एकाच मागावर एक स्त्री विणकर होती. एरवी स्त्रियांना फक्त कांड्या भरण्याचे काम देत असत. त्या विणकरणीचे नाव होते, चंद्रकला. नावाप्रमाणेच सुंदर, उंच. नऊवारी साडी, कपाळी मोठे कुंकू. चंद्रकलेचा डोक्‍यावरचा पदर मागावर साडी विणतानासुद्धा खाली पडत नसे. तिच्या कामाचा वेग आणि साडी विणण्याचे कौशल्य हे पुरुष विणकरांनाही मागे टाकणारे होते. सहावार, नऊवार सुती साड्या विणल्या जात. सकाळी नऊ वाजता माग सुरू व्हायचे. तो मागांचा आवाज अजूनही कानात घुमतोय. संध्याकाळी साडेपाचला कारखाना बंद व्हायचा. सर्व विणकर एक-दोन दिवसांत प्रत्येकी एक साडी विणत असत. बुधवारी आठवड्याचा बाजाराचा दिवस असल्याने आदल्या दिवशी संध्याकाळीच सर्व विणकरांना पगार वाटप केला जात असे.
साडी विणण्याचे सूत आजोबा नगरहून मागवायचे. सुतावर विविध प्रक्रिया केल्या जात असत. सुतावर रंगणी करून खळ वापरून कांजी करणे. सूत उकळून त्याच्या कांड्या भरणे. याच कांड्या हातमागांवरील धोट्यांमध्ये गुंतवून साडी विणली जात असे. साडीचा काठ, पदरास रेशीम मसराई व कृत्रिम रेशीम वापरून नक्षीकाम केले जात असे. साड्या विणून झाल्यावर त्यांच्या घड्या घालून त्या प्रेस मशिनखाली ठेवायच्या, त्यांना खाकी कव्हर घालून पॅक करायच्या व नंतर त्यांचे गठ्ठे बांधून विक्रीसाठी पाठवायच्या. कालांतराने हातमागाची जागा यंत्रमागाने घेतली आणि हा व्यवसाय हळूहळू कमी होऊन पाथर्डीत तरी संपला. मात्र अजूनही माहेरी गेले, की वाड्यातील एका कोपऱ्यात थोडेसे हातमागाचे साहित्य दिसले, की आजही त्या आठवणींचे उभे-आडवे धागे मनातल्या मनात गुंफून एक सुंदर असे आठवणरूपी वस्त्र जीवन जगण्यास प्रेरणा देत आहे.

Web Title: muktapeeth article written by surekha nipse