नन्हीं परी...

स्वप्ना माडीवाले
गुरुवार, 25 एप्रिल 2019

बाळ घरात आले, की सारे घर त्या बाळाभोवती नाचू लागते. बाळलीलांमध्ये गुंतून जाते.

बाळ घरात आले, की सारे घर त्या बाळाभोवती नाचू लागते. बाळलीलांमध्ये गुंतून जाते.

लेकीने सांगितले, की ती आई होणार आहे; तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. आईच्या नात्यांमधून आजीच्या नात्यांत बढती मिळणार असते तेव्हा मनात काय भावना निर्माण होते, हे कागदावर उतरविणे खरेच कठीण आहे. मन उल्हासित झाले. शरीरात एकदम उत्साह संचारला. तिला काय खायला द्यायचे, याची यादी सुरू झाली. मुलगी नोकरी करीत असल्याने तिला वेगळे काही स्वतः करून खायला शक्‍य नव्हते. तिला अधून-मधून होणारी मळमळ, लागलेले डोहाळे पाहत तिच्यामध्ये होणारे शारीरिक-मानसिक बदल मला खूप सुखावून जात होते. सुदैवाने तिला बाहेरचे हॉटेलमधले खायची अजिबात इच्छा होत नव्हती. या बदलामुळे तर मी खूशच झाले. ती होणाऱ्या बाळासाठी व्यवस्थित आहार घ्यायला लागली होती. मी व तिच्या सासूबाईंनी हौसेने तिचे डोहाळजेवण केले. सोनोग्राफी, मधुमेह, एन. एस. टी. या चाचण्यांनी खरे तर ती वैतागली होती. पण, सोनोग्राफीमध्ये बाळाची वाढ, त्याची हालचाल बघायला लेक व जावई किती उत्सुक असायचे, हे त्यांच्या चेहऱ्यावर बघण्यासारखे असायचे.

सर्व व्यवस्थित होईपर्यंत मनामध्ये थोडी काळजी, तणाव होता. सारे व्यवस्थित पार पडून तिने एका छोट्या परीला जन्म दिला. माझी कन्या गोंडस परीला घेऊन घरी आली. तिच्या स्वागतार्थ आम्ही दारात रांगोळी, तिच्या खोलीत फुगे, झिरमिळ्या लावून सुशोभित करून तिचे स्वागत केले. घरातील वातावरण पालटले. सर्व घर परीभोवती नाचू लागले. तिची अंघोळ, उठणे-झोपणे, ढेकर काढणे, जागरणे इत्यादी सुखद अनुभव मी घेत होते. नातीत मी इतकी गुंतून गेले, की माझे काही दुसरे विश्‍वच उरले नाही. तिचा निरागस चेहरा न्याहाळताना तिच्या हुंकार देण्याने, गोड हसण्याने चैतन्य निर्माण होई. परीराणीचे थाटात बारसे झाले अन्‌ ती तिच्या घरी गेली. मग घर एकदम सुनेसुने झाले. आता ती मला आजी म्हणून कधी हाक मारेल, याची वाट पाहते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by swapna madiwale