दुधावरची साय

विजया साठे
शुक्रवार, 17 मे 2019

लहान असताना न समजलेले काही अर्थ आजी झाल्यावर उमगतात आणि आठवत राहते आपल्या आजीच्या मायेची साय.

लहान असताना न समजलेले काही अर्थ आजी झाल्यावर उमगतात आणि आठवत राहते आपल्या आजीच्या मायेची साय.

माझ्या वडिलांच्या अचानक मृत्युमुळे माझी आजी (आईची आई) आमच्याकडे राहायला आली. शाळेतून आल्यावर आजीने केलेल्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेत मी आजीला शाळेतल्या गंमतीजंमती सांगत असे. मैत्रिणींशी धरलेला अबोला, नंतर पुन्हा झालेली गट्टी. एक ना दोन. आजीने लक्ष देऊन ऐकले नाही तर मी रुसून बसायची. मग आजी माझी समजूत घालायची. माझी आई उरुळी कांचनला निसर्ग उपचाराचा कोर्स करायला गेली होती, तेव्हा तर मी सारखी आजीच्या मागे मागे असायची. आमची चांगलीच गट्टी जमली होती. तिला पुस्तकातले धडे वाचून दाखव, कविता म्हणून दाखव असे चाले. माझ्याकडून कविता पाठ करून घेण्याचे कामही आजी करीत असे. आजी म्हणाली, ""कवितेचा अर्थ लक्षात घेऊन कविता सुरात मोठ्यांदा म्हटली की लवकर पाठ होते.''

त्या दिवशी आजीला म्हणाले, ""आजी आम्हाला एक धडा वाचून यायला सांगितला आहे. मी तुला वाचून दाखविते हं.'' मी धडा वाचायला सुरवात केली. तेव्हा आजी म्हणाली, ""असे सपाट वाचू नये. प्रसंगानुसार वाचताना आवाजात चढउतार पाहिजे. ते ते भाव व्यक्त व्हायला हवेत. ऐकणाऱ्याच्या डोळ्यांसमोर ते चित्र उभे राहायला पाहिजे.'' मी तसे वाचायला सुरवात केली. धड्याचे नाव, "दुधावरची साय'. त्यात एक वाक्‍य आले, "दुधापेक्षा दुधाच्या सायीला जपले पाहिजे.' मी म्हणाले, ""म्हणजे काय गं, आजी?'' तिने हसून माझ्या केसावरून हात फिरवला. पटकन कुशीत घेतले व म्हणाली, ""तू माझी दुधावरची साय!'' त्या वयात मला त्याचा अर्थ फारसा समजला नाही. माझ्या मुलांना हाच धडा शाळेत होता. वाचताना मला त्या प्रसंगाची आठवण यायची. आजीचा प्रेमळ स्पर्श आठवून रोमांच उभे राहायचे. कितीतरी वेळ मी आजीच्या सहवासातील आठवणींनी हरखून जायची. मी आजी झाले तेव्हा मला, "दुधापेक्षा दुधावरच्या सायीला जपले पाहिजे' याचा अर्थ उमजून आला.

Web Title: muktapeeth article written by vijaya sathe