आनंदाचा ठेवा

- अश्‍विनी वर्मा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

शरीराने अपंग असो वा मानसिक पातळीवरची अपंगता, ही मुले स्वतःतच रमत जातात. ती जगाशी संवाद साधू नाही शकत; पण त्यांचा आंतरिक संवाद चालत असेलच. त्यांच्या जीवनात गाणे फुलवायचे असेल तर संगीतोपचार प्रभावी ठरतात. 

‘तारे जमीं पर’ पाहताना त्यातील ‘त्या’ मुलाची होणारी आंतरिक ओढाताण आणि त्याला जाणणारा शिक्षक भेटल्यावर नवे पंख लाभलेल्या फुलपाखरासारखे त्याचे नव्याने भिरभिरणे हे आपल्याला आत कुठेतरी भिडले होते ना? ‘ब्लॅक’मधील हेलनच्या डोळ्यासमोर सगळा अंधार असतो.

शरीराने अपंग असो वा मानसिक पातळीवरची अपंगता, ही मुले स्वतःतच रमत जातात. ती जगाशी संवाद साधू नाही शकत; पण त्यांचा आंतरिक संवाद चालत असेलच. त्यांच्या जीवनात गाणे फुलवायचे असेल तर संगीतोपचार प्रभावी ठरतात. 

‘तारे जमीं पर’ पाहताना त्यातील ‘त्या’ मुलाची होणारी आंतरिक ओढाताण आणि त्याला जाणणारा शिक्षक भेटल्यावर नवे पंख लाभलेल्या फुलपाखरासारखे त्याचे नव्याने भिरभिरणे हे आपल्याला आत कुठेतरी भिडले होते ना? ‘ब्लॅक’मधील हेलनच्या डोळ्यासमोर सगळा अंधार असतो.

ती प्रचंड आक्रस्ताळी, चिडखोर, हट्टी मुलगी असते. डोळ्यासमोरच्या अंधारावरचा सारा राग ती समोर येईल त्याच्यावर काढत असते. मग तिला समजावून घेणारा शिक्षक मिळतो. तो तिला शिकविण्याचा अट्टहास करतो. तिच्या समोर नवे जग यायला लागते, डोळ्यासमोरच्या अंधारातून उजेडाची तिरीप तिला भेटू लागली. ती शांत होत गेली. तिचे आक्रस्ताळेपण संपले. तिचा हट्टीपणा संपला.

हे असे घडते हा माझाही अनुभव आहे. अशा मुलांना आपण समजून घेतले पाहिजे इतकेच. 

गेली काही वर्षे मी शारीरिक व मानसिक अपंगता, मतिमंद, स्वमग्नता, सेरेब्रल पाल्सी यांसारख्या समस्यांनी पीडित बालके यांना संगीत शिकविण्याचे कार्य करीत आहे. या मुलांना संगीत शिकवताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, की जगामध्ये जन्माला येताना परमेश्‍वराचा अंश असलेली व आपल्याच विश्‍वात रमणारी अशी ही मुले असतात. मात्र सामाजिक जीवनात लोकांशी संवाद साधताना सर्वांशी मिळून-मिसळून राहण्यात ती थोडी वेगळी ठरतात. त्यांचे स्वतःचे एक वेगळे भावविश्‍व असते. त्यात काही गोष्टी त्यांच्या आवडीच्या असतात, तर काही घटना त्यांना विचलित करतात. कोणताही अचानक झालेला बदल त्यांना गोंधळात टाकतो. संगीत शिकताना या मुलांना आनंद मिळत असतो. संगीतातील लय, ताल यांची त्यांना आवड असते आणि ती त्यांच्या देहबोलीतून समजतेही. तर कधी कधी मात्र गाणे सुरू झाले, की ही मुले कानावर हात ठेवून गाणे नकोय असे सांगतात, तर आवडीचे गाणे ऐकून उत्साहाने भारावून जातात. शरीराने, मनाने विकलांग असणे हे केवळ इतर लोकांसाठी असते. परंतु आपल्या स्वतःच्या दुनियेत मात्र अतिशय परिपूर्ण व समृद्ध असतात ही मुले.

आजकालच्या जीवनात दुर्मिळ वाटणारे छोटे आनंद हे या बालकांचे स्वनिर्मित क्षण असतात. आपल्या शिक्षकांशी एकनिष्ठ असलेली ही मुले कधी कधी आपल्यातील खाऊ शिक्षकांना देतात. इतक्‍या छोट्याशा कृतीतून त्यांच्या विश्‍वात आपल्याला पूर्ण जागा देतात. निखळ प्रेम असते त्यांच्या या वागण्यात. संगीत शिकवण्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करताना लक्षात येते, की यातील प्रत्येक बालकाची गरज वेगळी आहे. गाणे शिकवायला सुरवात करण्याआधी प्रत्येक बालकाचा सकारात्मक पैलू शोधून काढायचा, त्यासाठी अविरत प्रयत्न करून नवीन प्रयोगशील व रचनात्मक अभ्यास करून मुलांचा पिंड कसा आहे व त्याची आवड-निवड कशी आहे हे समजून घ्यावे लागते. त्यानंतर त्याचा पिंड लक्षात घेऊन त्यावर काम करावे लागते. असे हे छोटे दोस्त मला संगीत शिकविण्यासाठी मिळाले हे माझे भाग्यच आहे. हीच शक्ती मला सदैव प्रेरणा देत राहते व अजून खूप काही मला त्यांच्यासाठी काही करायचे आहे अशी भावना माझ्या मनात कायम राहते.

संगीत शिकविताना मी हे अनेकदा अनुभवलेले आहे, की अशा या विशेष बालकांना एखादी गोष्ट भावली, की त्यांना आपण खूप आनंद देऊन जातो. उदाहरणार्थ, त्यांच्या आवडीच्या गाण्याची ओळ त्यांचा अगदी नाचरा मोर करणारी ठरते. त्यासाठी संगीत हे माध्यम खूपच परिणामकारक ठरते. जेव्हा अशा प्रत्येक मुलाच्या आवडीचा असा एक धागा सापडतो, तेव्हा अक्षरशः समाधानाचा ठेवाच जणू समोर येतो. 

म्युझिकल थेरपिस्ट म्हणून गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम करते आहे. असे लक्षात येते, की कोणत्याही प्रकारचे अपंगत्व असो, संगीताचा सकारात्मक परिणाम या मुलांच्यात जाणवतो. शाळेत थेरपी देताना किंवा वैयक्तिक शिक्षण देताना नवीन संगीत शिकणारी मुले, आणि काही महिन्यांत त्यांच्यात झालेला बदल त्यांच्या पालकांशी बोलताना जाणवतो. प्रत्येक ऋतूची एक खासियत असते, जसे थंडीतील धुके, उन्हाळ्यातील उष्मा, पावसाळ्यातील रिमझिम सरींचा लपंडाव प्रत्येकजण अनुभवतात. तसेच थंडीतील धुक्‍याच्या पलीकडील स्वच्छ वाट, उन्हाळ्यातसुद्धा तग धरून राहणारी फुलझाडे, तर पावसाळ्यात ऊन-पावसाच्या लपंडावानंतरचे इंद्रधनुष्य बघता येण्याची क्षमता या मुलांच्यात आणि त्यांच्या पालकांमध्ये ओतप्रेत भरलेली आहे. आणि म्हणूनच मुलांचे पालक आणि आमच्या शाळेतील विशेष मुले माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आणि समाधान देणारी आहे. आणि कायमच चांगला मार्ग दाखविणारी ठरतील, असा मला विश्‍वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical ashwini varma