यूएसए कॉलिंग!

के. बी. सारडा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

अमेरिका अनेक अंगांनी खुणावत असते. तेथील मंदिरांतील पावित्र्य आणि वाचनालयातील पुस्तकसंग्रह बोलावत असतो. तेथील शिक्षणही विचारांना चालना देणारे आहे. 

अमेरिका अनेक अंगांनी खुणावत असते. तेथील मंदिरांतील पावित्र्य आणि वाचनालयातील पुस्तकसंग्रह बोलावत असतो. तेथील शिक्षणही विचारांना चालना देणारे आहे. 

अमेरिकेतला आमचा चार महिन्यांचा मुक्काम अगदी आनंदात गेला. आमच्या घरापासून एक मैलाच्या अंतरावर बालाजी मंदिर होते. तेथे रामनवमीनिमित्त वाल्मीकी रामायणाचे सामुदायिक वाचन चालू होते. यामध्ये शुक्रवार, शनिवार व रविवार अशा तीन दिवशी चाळीस-पन्नास तरुण भारतीयांनी भाग घेतला होता. या वेळी रामायणात वर्णन केल्याप्रमाणे रामसीता विवाह सोहळाही झाला. असा विधी यापूर्वी मी तिरुपतीमध्ये बालाजीच्या विवाह सोहळ्यात पाहिला होता. जोधपूरमध्ये गोवत्स राधाकृष्ण महाराज यांनी साजरा केलेला राधाकृष्ण विवाह सोहळाही असाच होता. भव्यता हे त्या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते, पावित्र्य हे रामसीता विवाहाचे वैशिष्ट्य होते. 

या चार महिन्यांत विविध प्रकारची बरीच मंदिरे पाहिली. येथे स्वच्छता, शांतता व पावित्र्य हा प्रत्येक मंदिराचा आत्मा आहे. कोणत्याही मंदिरात घंटा नाही. कोणतीही गडबड नाही. सगळीकडे नीरव शांतता. कधीही मोबाईल फोनची रिंग वाजलेली ऐकली नाही. बोथल येथील बालाजी मंदिरात व एल. व्ही. टेंपल या दोन मंदिरांमध्ये साजरा होणारा अभिषेक सोहळा पाहिला. हे अभिषेक जवळ जवळ चार तास चालू होते. हा अभिषेक सोहळा तिरुपतीमधील सहस्र कलश अभिषेकाच्या धर्तीवर होता. सर्वच मंदिरात धार्मिक विधीनंतर सामुदायिक प्रसाद असतो. एका हैदराबादच्या जोडप्याने (वय अंदाजे तीस-पस्तीस) असे सांगितले, ‘‘काका, आम्ही पाच दिवस पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत विविध प्रकारची कामे करत असतो. त्याचा आलेला थकवा व पुढील आठवड्यात काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा शनिवारी किंवा रविवारी मंदिरात दोन-तीन तास घालवल्यास मिळते.’’ 

मी व माझा हैदराबादी मित्र सहकुटुंब सियाटलमधील ग्रीन ग्रास पार्क पाहण्यासाठी गेलो. बाहेर पडताना चुकीच्या रस्त्याने बाहेर पडलो. या रस्त्याच्या जवळपास कोठेही बस स्टॉप दिसत नव्हता. त्यामुळे आम्ही बाजूस पार्किंग एरियामध्ये असलेल्या एका मोटारीतील अमेरिकन गृहस्थाला बस स्टॉपची माहिती विचारली, आम्ही नवीन आहोत व रस्ता चुकलो आहे. हे त्याच्या लक्षात आले, तेव्हा तो आम्हाला म्हणाला, ‘‘मला तिकडेच जायचे आहे. मी तुम्हाला सोडतो.’’ त्याने आम्हाला आग्रहपूर्वक मोटारीत बसवले व योग्य ठिकाणी उतरवले. खरे तर तो फक्त आम्हाला सोडण्यासाठी आला होता.

अमेरिकेत सार्वजनिक वाचनालये खूप आहेत. वेलव्हिवमध्ये मी एक वाचनालय क्रॉसरोडसारख्या व्यापारी संकुलात पाहिले. सियाटलमधील वाचनालय अकरा मजली आहे. त्याची रचना पुस्तकावर पुस्तक ठेवल्यासारखी आहे. या वाचनालयामध्ये एका कर्मचाऱ्याने स्वतः उठून आठव्या मजल्यापर्यंत येऊन मला हवे असलेले पुस्तक काढून दिले.

अमेरिकन माणसाची दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे समोरची व्यक्ती काय बोलते हे शांतपणे ऐकून घेतो. त्याची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. 

मी चाळीस वर्षे गणित व विज्ञान शिक्षक म्हणून काम केले. त्यामुळे मला वॉशिंग्टनमधील शिक्षण पद्धती आवडली. माझ्या नातवाच्या शाळेने भरवलेले विज्ञान प्रदर्शन पाहावयास गेलो होतो. ते प्रदर्शन पाहून मी खूपच भारावून गेलो. त्यातील सर्वांत जास्त आवडलेले मॉडेल म्हणजे मधुमेहासंबंधी माहिती देणारे मॉडेल होय. मधुमेहाचे दुष्परिणाम मला माहीत होते, पण कोणत्या पेशीवर कोणता परिणाम झाल्यामुळे कोणता रोग होतो हे मला ते मॉडेल पाहिल्यावर समजले. ते दुष्परिणाम होऊ नये म्हणून त्या विद्यार्थ्याने स्वतंत्रपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने काही उपाय सुचवले होते. प्रत्येक उपायामागील कारणीमीमासा ही सांगितली होती. एखादा अकरावी-बारावीचा विद्यार्थी स्वतंत्रपणे एवढा विचार करू शकतो हे पाहिल्यावर अमेरिकन लोकांना नोबेल का मिळतात हे समजले.

अमेरिकेमध्ये पासष्टपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तीला ‘सीनियर सिटिझन’ समजले जाते. अशा व्यक्तीला बसने प्रवास करावयाचा झाल्यास त्याला सवलत मिळते. ही सवलत मिळविण्यासाठी एक कार्ड घ्यावे लागते. त्याला ‘ऑर्का कार्ड’ असे म्हणतात. मी व माझ्या मित्राने एकाच वेळी अर्ज केला. मला तीन दिवसांत कार्ड मिळाले, पण मित्राला आठ दिवस झाले तरी कार्ड मिळाले नाही. म्हणून तो पासपोर्टची झेरॉक्‍स घेऊन संबंधित ऑफिसात चौकशीसाठी गेला. त्याने तेथील व्यक्तीला कार्ड मिळाले नाही असे सांगितले, तेव्हा त्याने त्यांच्याकडील माहिती तपासून पाहिली तर कार्ड पाठवलेले आढळले. पण ज्या अर्थी माझा मित्र कार्ड मिळाले नाही असे म्हणतो, त्याअर्थी कार्ड मिळालेच नाही हे मान्य करून पाच मिनिटांत नवीन कार्ड दिले. विशेष म्हणजे या कार्डावर छायाचित्र नाही. पण त्याचा गैरवापर होणार नाही याची सरकारी यंत्रणेला खात्री आहे. अमेरिका अशी अनेक अंगांनी खुणावत असते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical k. b. sarada