काश्‍मिरी टेकड्यांवर

- मृणालिनी भणगे
गुरुवार, 26 जानेवारी 2017

काश्‍मीर सुंदर आहे. भारताचं आहे. तेथील सर्वसामान्य लोकांनाही आपल्याविषयी अगत्य आहे. भारताविषयी प्रेम आहे. पण आता हे चित्र बदलतंय का? काश्‍मीरविषयी आपल्या मनात नेमके काय विचार असतात?

काश्‍मीर सुंदर आहे. भारताचं आहे. तेथील सर्वसामान्य लोकांनाही आपल्याविषयी अगत्य आहे. भारताविषयी प्रेम आहे. पण आता हे चित्र बदलतंय का? काश्‍मीरविषयी आपल्या मनात नेमके काय विचार असतात?

काश्‍मीरविषयी रोजच ऐकू येते. तेथील बर्फाविषयी आणि थंडगार कळ काळीजभर उसळवणाऱ्या हत्यांविषयी. भारतीय प्रजासत्ताकाचाच एक भाग असलेला काश्‍मीर; पण सध्या परदेश असल्यासारखा वाटतो. इतके परकेपण कसे दाटत गेले इतक्‍या वर्षांत. बारा वर्षांपूर्वी गेले होते काश्‍मिरला, तेव्हाही तिथे दहशतवादाचे सावट होतेच, पण तेथील माणसांमध्ये आपुलकी टिकून होती. आपल्यावरचा विश्‍वास व्यक्त होत होता. त्यांना भारत व भारतीय परके वाटत नव्हते. पण अलीकडे हे चित्र बदललेले दिसते आहे. तिथल्या हवेत बंदुकीच्या दारूचा वास तरतो आहे. वाऱ्याच्या सूं सूं आवाजात दगडफेकीचा आवाज मुरतो आहे. बर्फाखाली अबलांचा आवाज दबतो आहे.

भारताविरुद्धच्या घोषणांनी तरुणाईचा आवाज चिरकतो आहे. या आणि रोज वर्तमानपत्रांत येणाऱ्या सीमेवरच्या गोळीबाराच्या बातम्या वाचून मन विषण्ण होतं. ‘वारस होऊ अभिमन्यूचे’ हे अनुराधा गोरे यांचे पुस्तक वाचल्यापासून तर हे फारच जाणवते आहे. कोणा दहशतवाद्यांमुळे आपले तरुण जवान मारले जात आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

आम्ही सुमारे बारा वर्षांपूर्वी काश्‍मीरला गेलो होतो. तेव्हा नुकताच जम्मूतील रघुनाथ मंदिराजवळ रॉकेटस्‌चा मारा झाला होता. जम्मूत पोचल्यावर रघुनाथ मंदिरात गेलो. दुसऱ्या दिवशी श्रीनगरच्या विमानाचे बुकिंग होते, पण रात्रीत निसर्गाची लहर फिरली. जोरात वाहणारे थंड वारे, धो धो पाऊस यामुळे विमानांची उड्डाणे रद्द झाली होती. व्हॅलीमध्ये दरडी कोसळल्या होत्या. हवामान खराबच होते. शिकाऱ्याचे बुकिंग असल्यामुळे श्रीनगरला जाणे महत्त्वाचे होते. ज्या शिकाऱ्याचे बुकिंग होते, त्या हाफीजभाईचा फोन आला होता, ‘‘हॉटेलमालकांच्या ओळखीची मोटार घ्या व हमरस्त्यानेच श्रीनगरला या, म्हणजे संध्याकाळी जवाहर टनेल पार कराल.’’ 

विमानाचे बुकिंग रद्द केले होते. हॉटेलवाल्याने विश्‍वासू ड्रायव्हर व मोटार दिली. सकाळी लवकर निघालो. हा प्रवास म्हटले तर सुरक्षित नव्हता. एका बाजूला उंच कडे, तर दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या. कोठेही कठडे नाहीत. वाटेत दरडी कोसळलेल्या, घरे पडलेली. तेथेही आपले सैनिक रस्ते मोकळे करत होते. एकीकडे अस्मानी संकट, तर दुसरीकडे दहशतवाद्यांची धास्ती. प्रवास सुरूच होता. गटागटाने वाहने निघाली होती. सैनिकांच्या गाड्या मागेपुढे होत्या. संध्याकाळी सातच्या आत जवाहर टनेल ओलांडायची घाई होती.

टनेलपाशी पोचलो. तेथे चेकिंग होते. तापमान खूपच खाली गेलेले. कदाचित उणेच असावे. स्वेटर, शाल, मफलर यात स्वतःला गुंडाळून घेऊन आम्ही गाडीतून खाली उतरलो. थंडीने कुडकुडत होतो. दातावर दात वाजत होते. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता. पु. ल. म्हणाले असते, ‘‘बोलायला गेलो तर शब्दाचा बर्फ होऊन तोंडातून बाहेर पडत होता.’’ चेकिंग ऑफिसर ही गंमत पाहत होता. उंच कड्याकडे हात दाखवत तो म्हणाला, ‘‘आप को इतनी ठंड लग रही है, लेकीन उस पहाडीपर देखो, हमारे जवान खडे होकर देश की रक्षा कर रहे हैं। उनकी सोचो.’’ आम्हाला आमचीच लाज वाटली, निसर्गाने रस्ते उखडले, आहेतच सैनिक ते साफ करायला; देशावर संकट आले, आमच्या मुलांच्या वयाचे तरुण जवान थंडी-पावसात पहारा करीत आहेतच सज्ज. त्यांना मनोमन सॅल्यूट ठोकला.

श्रीनगरला पोचलो तर वीज गेली होती. त्या काळोखातच शिकाऱ्यात पोचलो. काश्‍मीरचे हे प्रथम दर्शन लोभावणारे नव्हते. पण शिकाऱ्यात पोचल्यावर हॉफीजभाईंनी गरम चहा, जेवण देऊन स्वागत केले. अंथरुणात ठेवायला गरम पाण्याच्या बाटल्या दिल्या. त्यांचे कुटुंबीय फार मायेने आमची बडदास्त ठेवत होते. पैसे देऊनही इतके अगत्य प्रथमच पाहायला मिळाले. त्यांनी दिलेल्या ड्रायव्हर व गाडीतून काश्‍मीर पाहिले. जेवणाचा गरम डबाही तेच देत असत. वाटेत जेवण घेताना कुठलाही दगाफटका होऊ नये ही त्यामागची काळजी. त्यांच्याकडून आम्ही पश्‍मिना शाली घेतल्या. ‘‘त्यांचे पैसे तुम्ही पुण्याला गेल्यावर ड्राफ्टने पाठवा,’’ असे त्यांनी सांगितले. अस्थिर परिस्थितीत पैसे जवळच राहू द्या, असेही त्यांनी सांगितले. केवढा विश्‍वास! कदाचित तिथल्या अस्थिर जीवनामुळे, संकटांमुळे तर त्यांना माणसाची किंमत कळली नसेल? इतक्‍या सुंदर स्वभावाच्या, प्रेम करणाऱ्या या लोकांच्या वाट्याला हे अस्थिरतेचं, असुरक्षिततेचं दुःख का यावं, असं वाटलं.
रोज डोकेफिरू शत्रूच्या हल्ल्यामुळे जखमी, शहीद होणाऱ्या तरुण मुलांबद्दल, जवानांबद्दल तर काय बोलावं? ते व त्यांचे कुटुंबीय यांचे आम्हा सर्वांवर खूप उपकार आहेत. त्यांना कितीही प्रणाम केले तरी त्यांचे ऋण फिटणार नाही. ही परिस्थिती पाहून आम्ही आमच्या क्षुल्लक अडचणींबद्दल किती त्रासतो, किती आरडाओरड करतो याचीच कधी कधी लाज वाटते.

Web Title: muktpeeth artical mrunalini bhanage