ते तसे वागले म्हणून...

- सुरेश मोहन गांधी
गुरुवार, 5 जानेवारी 2017

एखाद्याने आयुष्यात फार वाईट वागणूक दिलेली असते, ती लक्षात ठेवायची? की, त्या व्यक्तीने काही काळ का होईना, आपल्या जगण्याचा प्रश्‍न सोडवलेला होता हे ध्यानात घ्यायचे? पुढे त्या व्यक्तीच्या गरजेच्या वेळी मदत करायची, की त्याला आणखी अडचणीत टाकायचे?  
 

एखाद्याने आयुष्यात फार वाईट वागणूक दिलेली असते, ती लक्षात ठेवायची? की, त्या व्यक्तीने काही काळ का होईना, आपल्या जगण्याचा प्रश्‍न सोडवलेला होता हे ध्यानात घ्यायचे? पुढे त्या व्यक्तीच्या गरजेच्या वेळी मदत करायची, की त्याला आणखी अडचणीत टाकायचे?  
 

माणसाच्या आयुष्यात काही काही घटना अशा घडतात, की त्यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. इतकेच नाही, तर केव्हा केव्हा त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी माझ्याही आयुष्यात अशीच एक घटना घडली. त्या सुमारास मी एका राष्ट्रीयीकृत बॅंकेमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होतो. संध्याकाळी चारच्या सुमारास बॅंकेचे नित्याचे व्यवहार संपवून काही महत्त्वाच्या खातेदारांना भेटण्यासाठी मी केबीनबाहेर पडलो होतो; परंतु केबीनच्या दारातच नवनीतशेठ उभे असलेले मला दिसले होते. त्यांनी मला नमस्कार करून कर्ज मिळण्यासंबंधी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्यांना महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातोय असे सांगून दुसऱ्या दिवशी बोलावले. ते गेल्यानंतर दहा वर्षांपूर्वीचे नवनीतशेठ व भूतकाळ डोळ्यांसमोरून सरकून गेला.

तसा मी मूळचा कोकणातला. वडील लहानपणीच वारलेले. अकरावीला बऱ्यापैकी गुण मिळाल्याने मेहुण्यांनी पुण्यात शिकायला आणले. मेहुण्यांची परिस्थिती जेमतेमच. त्यामुळे अर्धवेळ का होईना, नोकरी करणे भाग होते. नवनीतशेठच्या तयार कपड्यांच्या दुकानात नोकरी मिळाली. कामाची वेळ दुपारी तीन ते नऊ. पगार रुपये तीस. महाविद्यालय व नोकरी या धावपळीमध्ये दिवस भराभर जात होते. दिवाळीचा सण आला.

महाविद्यालयाला सुटी लागली होती. चार दिवस गावी जाऊन आईला भेटून यावे असे वाटत होते. पण, नवनीतशेठनी रजा नाकारली होती. दिवाळी म्हणजे त्यांच्या धंद्याचा सीझन होता. मी गावी जाणे टाळले होते.

वर्ष संपले. वार्षिक परीक्षा जवळ आली. पुन्हा रजेचा प्रश्‍न आला. यावेळीही त्यांनी रजा नाकारली होती. मीसुद्धा जिद्दीने अभ्यास करून पहिला वर्ग व स्कॉलरशिप मिळवली. पण, माझ्या यशाचे शेठना काहीच कौतुक नव्हते. अभ्यास जसा मन लावून करता, तशी दुकानातली कामंही मन लावून करा, असा उपदेशाचा डोस त्यांनी मला दिला होता. नवनीतशेठच्या अशा कठोर वागण्याचे बरेच लहान-सहान प्रसंग डोळ्यांपुढे येत होते. पदोपदी झालेला अपमान आठवून अंगातले रक्त तापून सळसळत होते. एकदा तर त्यांनी कहरच केला. त्या वेळी नाणेटंचाई होती. त्यांनी मला दहा रुपयांची मोड आणण्यासाठी पाठवले होते. त्यात दहा पैशांचे एक नाणे कमी होते. मोड देणाऱ्या माणसाने त्याचे कमिशन कापून घेतले होते. परंतु, नवनीतशेठनी सरळसरळ माझ्यावर चोरीचा आरोपच केला. आजपर्यंत मी सर्व सहन करीत आलो होतो; परंतु या प्रसंगाने माझ्या सहनशक्तीची परिसीमा गाठली होती, माझा स्वाभिमान दुखावला गेला होता. खिशात होते- नव्हते तेवढे पैसे त्यांच्या अंगावर भिरकावून मी रागाने दुकानाबाहेर पडलो होतो.

त्यानंतरच्या पाच-सहा वर्षांच्या कालावधीमध्ये नवनीतशेठसारखे बरेच लोक माझ्या जीवनात आले होते. मी मनाशी ठरवून टाकले, अशा प्रवृत्तीच्या लोकांवर मात करून आपण मोठे व्हायचे. माझी मनीषा पूर्ण झाली. बी.कॉम.ला पहिला वर्ग मिळून मला बॅंकेत चांगली नोकरी लागली होती.

या कडू आठवणीमुळे माझ्या जखमेवरच्या खपल्या पुन्हा निघाल्या. मी बेचैन झालो. घरी आल्यावर माझी बेचैनी पत्नीच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. तिने विचारताच मी तिला भूतकाळातल्या सर्व कटू घटना कथन केल्या. तसेच, नवनीतशेठ उद्या बॅंकेत आल्यावर त्यांना सर्व काही सुनावून माझ्या अपमानाचा सूड घ्यायचा व त्यांचे कर्ज प्रकरण नामंजूर करून असुरी आनंद मिळवायचा निर्धारही तिला सांगितला.

तिने माझे बोलणे शांतपणे ऐकून घेतले. समजावणीच्या सुरात मला म्हणाली, ‘‘तुम्ही घाईने असा टोकाचा निर्णय घेऊ नका. प्रत्येक घटनेला दुसरी बाजू असते व ती आपण विचारात घेतली पाहिजे. नवनीतशेठ एकेकाळी तुमचे अन्नदाता होते, त्यांनी अल्प प्रमाणात का होईना; पण तुमच्या चरितार्थाचा प्रश्‍न सोडवला होता. तसेच, नवनीतशेठ व त्यांच्यासारखे जे जे निष्ठूर लोक तुमच्या जीवनात आले, त्यांच्यामुळेच आपण शिकून मोठे व्हावे अशी ईर्षा तुमच्या मनात निर्माण झाली. त्या सर्वांनी केलेल्या मानहानीमुळेच तुमची महत्त्वाकांक्षा फोफावली गेली. तुमचे जीवन घडविण्यात या लोकांचाच अप्रत्यक्षपणे हातभार लागला. खऱ्या अर्थाने हेच लोक तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत.’’

पत्नीच्या या सकारात्मक विचारांमुळे माझी शेठकडे बघण्याची दृष्टीच बदलून गेली. माझी बेचैनी संपली. दुसऱ्या दिवशी शेठना बॅंकेत बोलावून घेऊन त्याचे काम अग्रक्रमाने करायचे, असा निश्‍चय करून मी शांतपणे झोपी गेलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktpeeth artical suresh gandhi