काळ्या पाण्याची शिक्षा

- वामन भुरे
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

निळ्या पाण्याचा समुद्रकिनारा पाहायला अंदमानला गेलो. दोन दिवस मजा केली आणि मग सजा सुरू झाली. तेथील नील बेटावर असताना वादळाचा जीवघेणा अनुभव घेतला. अगदी काळ्या पाण्याचीच सजा जणू!

निळ्या पाण्याचा समुद्रकिनारा पाहायला अंदमानला गेलो. दोन दिवस मजा केली आणि मग सजा सुरू झाली. तेथील नील बेटावर असताना वादळाचा जीवघेणा अनुभव घेतला. अगदी काळ्या पाण्याचीच सजा जणू!

स्वच्छ असा समुद्रकिनारा, निळे पाणी, स्वच्छ हवा हे पाहायचे असेल, तर अंदमान- निकोबारची सहल करायला हवी. आम्ही चौघे सकाळी सात वाजता पोर्ट ब्लेअरला उतरलो. नंतरचा दिवस गडबडीत गेला. प्रसिद्ध सेल्युलर जेल व तेथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्यांवर आधारित असणारा लाईट शो पाहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आठची बोट पकडून अकरा वाजता नीलला पोचलो. हॉटेल समुद्रकिनाऱ्यावर होते. समुद्र शंभर फुटांवर. संध्याकाळी खाली बीचवरच होतो. वातावरणात सकाळपासूनच बदल होत होता; पण याची कल्पना आम्हाला नव्हती. स्थानिकांना ते नक्की जाणवलेले होते, हे आम्हाला नंतर लक्षात आले. 

संध्याकाळी बीचवरून आलो आणि थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. पहिल्यांदा आम्हाला विशेष काही वाटले नाही. पण, थोड्याच वेळात त्याने उग्र रूप धारण केले. जोरदार वारा, मुसळधार पाऊस, लाटांचा भयानक आवाज हे आमच्यासाठी पहिल्यांदाच होते. आनंदाची जागा भीतीने घेतली होती. वादळाचा धिंगाणा रात्रभर सुरूच होता. आम्ही सर्वच जण पुण्या-मुंबईहून आलेलो होतो. रात्र सर्वांनीच जागून काढली. सकाळी झाडे मोडलेली दिसली. हॉटेलची बाग पाण्याने भरली होती. पाऊस थांबला होता. म्हणून आम्ही सकाळी फिरायला निघालो. लक्ष्मणपूर, भरतपूर आणि सीतापूर ही तीन ठिकाणे. अवघ्या आठ किलोमीटरचे हे अंतर. एवढे लहान बेट. रुंदी एक किलोमीटरसुद्धा नसावी. त्या दिवशी दुपारी पुन्हा पाऊस सुरू झाला. अशात भूकंपाची बातमी येऊन धडकली. आम्हाला सुनामी आठवली. बेटाबाहेर संपर्क होत नव्हता, की बाहेरचे काही कळत नव्हते. आदल्या दिवशीपासूनच प्रवासी वाहतूक बंद आहे हे आम्हाला समजले. समुद्र शांत झाल्याशिवाय काहीही करता येणार नाही, हे हॉटेल व्यवस्थापक सांगत होता. जोरदार वारा, भयंकर पाऊस, समुद्राच्या लाटांचा प्रचंड आवाज यामुळे आम्ही मात्र भेदरून गेलो होतो. आता हॉटेलच्या तळमजल्यावर पाणी शिरले होते. दोन दिवस झाले तरी तांडव चालूच होते. मग कधीतरी थोडी उघडीप, पुन्हा पाऊस. दिवसभर हा खेळ सुरू होता. रात्री जेवत असताना हॉटेल व्यवस्थापकाने सूचना दिली, की ‘हाय अलर्ट मिळाला आहे, कोणीही हॉटेलच्या बाहेर पडू नये. जोरदार पाऊस आणि वारा येणार असा पोलिस यंत्रणेकडून इशारा मिळाला आहे.’

वारा-पावसाचा जोर ओसरला. परिस्थिती सुधारेपर्यंत सरकारी पाहुणे झालो होतो. जेवण व हॉटेल यांची सोय सरकारने केली होती. पण, इथून सुटायचे कसे? त्याला उत्तर नव्हते. आमचे विमान दुसऱ्या दिवशी सकाळी होते. वाट बघण्यापलीकडे हातात काहीच नव्हते. आम्हाला दुपारी पोलिसांचे बोलावणे आले. सामान अगोदरच बांधलेले होते. बोटीकडे निघालो. तेवढ्यात ज्या गाडीतून जात होतो, तिच्या खाली जोरदार आवाज झाला. ड्रायव्हरने गाडी जागेवर थांबवली. पाहिले तर खाली रॉड तुटला होता. काही क्षणांत दुसरी गाडी आली आणि आम्ही त्या गाडीने बोटीकडे धावलो. तिथे पाहतो तर त्या ठिकाणी जवळपास चारशे ते पाचशे लोकांची गर्दी. साधारण सत्तर प्रवासी घेऊन जाईल एवढी बोट होती. ती भरली आणि गेली. विमानाच्या वेळेनुसार प्रवासी सोडण्याचे काम पोलिस करीत होते. तेवढ्यात एक बोट आली; पण गेटपर्यंत पोचणे अवघड होते. सामान घेऊन कसा तरी आम्ही आत प्रवेश केला. त्या वेळी गड जिंकल्याचा आनंद झाला. एकजण कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करीत होता. बोटीवर लगेज घेऊन चढणे खूपच अवघड होते. बोटीवरील कर्मचारी कोणीही मदतीला येत नव्हते. बायकांचे खूप हाल होत होते. 

जे हार्ट पेशंट आहेत, वयस्कर आहेत, त्यांनी प्रवास करू नये, अशी सूचना पोलिसांनी दिली होती. मी मात्र हार्ट पेशंट आहे हे जाणीवपूर्वक विसरलो होतो, त्याचे भय मनात होतेच. बोटीचा प्रवास सुरू झाला. खिडकीतून नीलला नमस्कार केला. काही क्षणांतच बोट हेलकावे घेऊ लागली. त्याबरोबर लोकांच्या उलट्या चालू झाल्या. ऐंशी टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लोकांना उलट्या चालू झाल्या. जे नेहमी प्रवास करीत होते तेही घाबरले. खिडकीतून लाटा आपल्या वर गेलेल्या दिसायच्या. लहान मुले, महिला, पुरुष सर्वांनाच त्रास होत होता. लहान मुले मोठमोठ्याने रडत होती. कोणी कोणाला मदत करण्याच्या परिस्थितीत नव्हते. 

हा जीवघेणा प्रवास संपवून आम्ही पोर्टब्लेअरला पोचलो, त्या वेळी आम्ही वाचलो याचा आनंद झाला. पण, फार काळ हा आनंद टिकला नाही, कारण सूचना आली होती, की उद्या अकरा वाजता जोरदार वारा आणि पाऊस येणार आहे. आमचे विमान सकाळीच होते. एकदाचे पुण्यात पोचलो. 
या चार दिवसांतच पुरते उमगले, अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा का म्हणत असत!

Web Title: muktpeeth artical vaman bhure