वळचण (मुक्तपीठ)

अभिजित बाबर
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

कित्येक शब्दांनी समजावूनही कळले नसते, माणुसकी म्हणजे काय? आजोबांच्या कृतीने मनात ठसले कायमचे.

आजोबांना सारखा चहा लागायचा म्हणून नेहमी थर्मास भरून चहा घेऊन रानात जायचो. त्या दिवशी मी आणि आजोबा सपरात वैरण तोडत बसलेलो. बाहेर पावसाने चकांदळ केली होती. जोरजोरात वारे वाहत होते. सपरावरचे झाड झुंकूळ घेत होते. विजा चमकत होत्या. अचानक मोठा आवाज झाला. आजोबा बोलले, मुऱ्याकडें वीज पडली कुठेंतरी. आणि त्या आवाजासरशी...

आमच्या कानावर लहान मूल रडल्याचा आवाज आला. बाहेर काहीतरी खसपस ऐकायला येत होती. बाहेर भयंकर पाऊस होता आणि आम्ही आत. आजोबांनी झाप उघडून बाहेर बघितले. बाहेर वळचणीला कातकरी जोडपे लहान मुलाला उराशी कवटाळून एकमेकांना सावरत उभे होते. आजोबांनी त्यांना आत सपरात बोलावले. त्या लहान बाळाचे अंग पुसायला डोक्‍यावरचा पटका दिला. खाटल्यावर झोपवायला सांगितले. त्याच्या अंगावर वाकळ टाकली. बाळ शांत झोपले. थर्मासमधला चहा त्या दोघांना थोडा थोडा दिला आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारायला लागले. मी सगळे छोट्या डोळ्यांनी पाहात होतो. त्या लोकांच्या अंगाला एक वेगळाच वास येत होता. सारखे पाण्यात असतात, कधी खेकडे तर कधी मासे पकडण्यासाठी. त्यामुळे तो वास येत असावा.

पाऊस थांबल्यावर ते गेले. मी आजोबांना विचारले, ‘‘आपण त्यांना सपरात का घेतले? आणि वर चहासुद्धा दिला, का?’’ आजोबांनी सांगितले, ‘‘आपल्या वळचणीला आलेल्या जिवाला कधी हकलायचं नाही, त्याला आसरा द्येयाचा, त्याच्या डोक्‍यावर जर छप्पर आसतं तर ते आपल्या वळचणीला आलं आसते का? नाही ना! आणि हो, त्यांना चहाची जास्त गरज होती. जगातल्या प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाचा अधिकार असतोच, ज्याचा त्याला शेर मिळाला. आपण निमित्तमात्र आहोत. आपण त्याला काही देऊन उपकार नाही केले. त्यांनी आपल्यावर उपकार केले, कारण त्यांना काहीतरी मदत करू शकलो. मदत करणे ही गोष्ट सर्वांच्या नशिबात नसते.’’ 
अजूनही ती वळचण मनात घर करून बसली आहे!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Abhijit babar