चेन्नई एक्‍स्प्रेस

अभिनेत्री गात
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

सहलीला सगळेच जातात, पण मैत्रिणींबरोबर दक्षिण भारतात हुंदडायला जाण्यात वेगळीच धमाल होती.

सहलीला सगळेच जातात, पण मैत्रिणींबरोबर दक्षिण भारतात हुंदडायला जाण्यात वेगळीच धमाल होती.

लहान असताना आई-बाबांबरोबर दक्षिण भारतात सहलीला गेले होते. पण या वेळेस वेगळीच मजा होती, ती म्हणजे मैत्रिणींबरोबर धमाल करायची. आम्ही चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यावर पोचलो, तेव्हा बरेच कोळी एकत्र येऊन जाळे वर खेचत होते. त्या भल्या मोठ्या जाळ्यात छोटे-मोठे मासे फसत होते. ते बघताना व फेसाळणारा समुद्र, रेतीवरचे छोटे-छोटे खेकडे, पाण्यानी केलेली नक्षी बघताना मन अगदी हरखून गेले होते. शांत व तृप्त मनाने आम्ही निघालो ते ‘दक्षिण चित्रा’ या स्थानाला भेट देण्यासाठी! चेन्नईपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर १९९६ मध्ये हे संग्रहालय बांधले गेले. मद्रास क्राप्ट फाउंडेशनतर्फे ते चालवले जाते. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटक या चार राज्यांची पूर्ण माहिती, तिथली घरे, संस्कृती, समाज, व्यवसाय, इतिहास खजिनाच सापडतो. क्वाल्टचे प्रदर्शन पाहिले. आपल्याकडच्या गोधडीचेच हे स्टायलिश रूप! 

कांचीपुरमला मनसोक्त साडी खरेदी हाच हेतू होता, पण पहिल्यांदा तिथली विस्तीर्ण व इतिहासाची साक्ष पटवणारी मंदिरे पाहिली. कांचीकामकोटी शंकराचार्यांच्या मठात श्रीशंकर विजयेन्द्र सरस्वतीस्वामी हे स्फटिकररूपी शंकराची पूजा करीत होते. त्यांची आज्ञा झाल्यावर आम्ही देवीची, शंकराची व गणपतीची भजने आळविली. शंकराचार्यांच्या समोर बसून गान-सेवा केल्याचा आनंद झाला. कांचीपुरमला छोटी-मोठी बरीच मंदिरे आहेत.

त्यापैकी सर्वांत प्राचीन शिवमंदिर एकांबरेश्‍वराचे. उंचच उंच गोपुरे व देवी-देवतांच्या मूर्ती स्थापलेल्या आहेत. मोठमोठ्या देवतांच्या मूर्ती व मंदिराच्या दारांवर कोरले गेलेले शिलालेख, जागोजागीच्या रांगोळ्या हे दक्षिणेकडच्या मंदिराचे मुख्य आकर्षण. इथे मुघलांचे आक्रमण कमी झाल्याने मंदिराचे सौंदर्य अबाधित आहे. सर्वांत शेवटी आम्ही सोन्या-चांदीच्या पाली असलेले श्रीवरदेश्‍वर मंदिर बघायला गेलो. दोन राक्षसांचे शापामुळे पालींमध्ये रूपांतर झाले. स्वामी वरदराज यांच्या कृपेमुळे त्यांना शापापासून मुक्ती मिळाली. त्या पालींना हात लावल्याने आपल्यालाही मुक्ती लाभते, अशी दंतकथा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muktpeeth Article Abhinetri Gat